<
जळगाव दि.10 – एकांकिका या अभिनयाचा पाया असल्याने यामुळे व्यक्तीचे व्यक्तिमत्व अधिक खुलते यात शंका नाही या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक दिग्गज आज अभिनय क्षेत्रात नावलौकिक मिळवत आहे असे मत केसीई सोसायटीचे प्रशासकीय अधिकारी व सांस्कृतिक समन्वयक शशिकांत वडोदकर यांनी व्यक्त केले.
खान्देश कॉलेज एजुकेशन सोसायटी संचालित मूळजी जेठा महाविद्यालयाच्या कान्ह ललित कला केंद्र व महाराष्ट्रीय कलोपासक पुणे आयोजित पुरुषोत्तम करंडकाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी मंचावर केसीईचे सदस्य हरीश मिलवाणी,प्रा. चारुदत्त गोखले, प्राचार्य संजय भारंबे, कान्ह ललित कला केंद्राचे समन्वयक मिलन भामरे ,महाराष्ट्रीय कलोपासकचे राजेंद्र नागंरे,परिक्षक सुनील नाईक ,सुशील सहारे,दिलीप जोगळेकर,प्रा.हेमंत पाटील उपस्थित होते.
कलाकारांना सक्षम माध्यम उपलब्ध व्हावे याकरिता पुरुषोत्तम करंडक आपण गेली पाच वर्ष भरवत आहोत त्यातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो आणि त्यांना आपली कला सादरीकरण करावयासाठी संधी उपलब्ध होते. असे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष हरीश मिलवाणी यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश महाले यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हेमंत पाटील, वैभव मावळे, देवेंद्र गुरव,कपिल शिंगाणे,दिनेश माळी,योगेश शुक्ल हे परिश्रम घेत आहेत.आजच्या प्रथम व द्वितीय सत्रात सहा एकांकिका झाला.यावेळी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उद्या सादर होणार्या एकांकिका – एम.जी.एस.एम.संचालित कला शास्त्र व वाणिज्य महविद्यालय चोपडा एकांकिका लाज द्यावी सोडून ,झुलाल भालीजीराव पाटील महाविद्यालय धुळे- उष:काल होता होता,प्रताप महाविद्यालय –हायब्रीड ,पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय-द डोअर स्टेप,एम.जी.एस.एम महाविद्यालय –पडदा ,देवगिरी महाविद्यालय औरंगाबाद –आम्ही सगळे,शासकीय अभियांत्रिकी महविद्यालय औरंगाबाद भानगड या एकांकिका सादर होणार आहेत.
कार्यक्रमच्या बक्षीस वितरण कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती स्वामी समर्थ या मालिकेतील प्रमुख स्वामी समर्थ भूमिका साकारणारे सुप्रसिद्ध अभिनेते अक्षय मुडावदकर यांची उपस्थिती राहणार आहे.
प्रथम सत्रामध्ये डॉ. जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालयाने “कोवळी फुले” एकांकिका सादर केली.
या आधुनिक युगात आपल्या मुलीनी शिकून मोठे व्हावे यासाठी पालक प्रवर्ग पराकाष्ठा करीत असतात परंतु समाजात वावरत असणारी वासनांध पुरुषी मानसिकतेची गिधाडे एकट्याने किंवा टोळीने मुलींच्या अनुची लक्तरे तोडण्यासाठी तयार असतात. याचेच उदाहरण दिल्ली, कोपर्डी, हैद्राबाद सारख्या घटना आहेत. याच घटनांना आणि सामाजिक परिस्थितीला समोर ठेऊन हि एकांकिका आहे. यात स्वच्छंदी आयुष्य जगणाऱ्या ,अवखळ तेव्हड्याच आपल्या धेय्याप्रती समर्पित असणाऱ्या मुलींवर सामुहिक बलत्कार होतो आणि त्यांचे आयुष्य संपते. या आशया भोवती फिरणारी एकांकिका आहे.
नूतन मराठा महाविद्यालयाने बुजगावणे ही एकांकिका सादर केली. वयाची अट संपत आलेल्या पोलीस भरती करणाऱ्या मुलाची ही गोष्ट आहे. बापानं रानात बुजगावण्यासमोर गळफास लाऊन जीव दिलेला असतो त्यामुळे कथेचा नायक त्याला सरकार म्हणून संबोधत असतो नायकाला वर्दीचा थाट माट वैभव क बघून नाही तर देशसेवेसाठी पोलिसात भरती व्हायचं असत त्याच्या आईचा हेका असतो की त्याने शेती करावी कारण ती पण देशसेवा आहे असं तिला वाटत नायक बुजगावण्याशी म्हणजे प्रतिकात्मक सरकारशी संवाद साधतो प्रश्न उपस्थित करतो. कथेच्या अंती नायकाचा मित्र भोला जातवर्गवरीच्या आधाराने कमी मार्क पडून देखील भरती होतो मात्र गणा- नायक भरती होत नाही आई आणि बहिणीला वाटत की गणा जीवाच काही बरं वाईट करणार म्हणून ते त्याला समजावतात गणा शेवटी बुजगावण्याचे प्रश्नांकित केलेले मुख फावड्याने फोडतो व तो आत्महत्या नाही करणार असा विश्वास आई बहिणीला देतो व सकारात्मक विचार मनात घेऊन शेताची वाट धरतो.
भुसावळ कला विज्ञान आणि पु. ओ. नाहाटा वाणिज्य महाविद्यालय, भुसावळ यांनी
आचार्य अत्रे यांच्या कथेवर आधारित बत्ताशी नावाची एकांकिका १९४७ च्य फाळणीनंतरच्या होणाऱ्या हिंदू- मुस्लीम यांच्या नरसंहारावर असून याची योग्य अशी मांडण करण्यात आली. यात प्रत्येक धर्माचे प्रतिनिधीत्व करणारे पात्र असून ते आपला स्वा कसा साधतात याचे सादरीकरण यात दाखवण्यात आले आहे. मुळात बत्ताशी नावाची कोठेवाली ही कोणत्याही धर्माचे प्रतीक नसून ती केवळ आपला देश आपली भूमी आणि आपले अस्तित्व जागवण्यासाठीचा प्रयत्न करत असते. परंतु, फाळणीन जेव्हा प्रत्येक धर्माच्या माणसावर वाईट प्रसंग येतो, त्यावेळी हीच बत्ताशी आपल्या जीवा पर्वा न करता त्यांचा जीव वाचवण्यात यशस्वी ठरते. मुळात एका स्त्रीची भावना आणि तीचे श्रीकृष्णासाठीचे असलेले उत्कट प्रेम यात दाखवण्य आले असून बत्ताशी जरी मुस्लीम समाजाची असली तरी तिचा देवता हिंदू असल्याचे दाखवून सहिष्णूतेचा उत्तम समन्वय यात साधण्यात आला आहे.
गुलाबराव देवकर कॉलेज ऑफ फार्मसी, यांनी ब्रेन हि एकांकिका सादर केली अलीकडच्या काळात अनेक कट्टर धर्माधता पसरवणाऱ्या संघटनांचा उद्रेक होत आहे. त्यात विशेष आपल्याच समाजाला अनेकांकडून दाबलं जात असल्याची भीती ही बऱ्याच तरुणांना शांत बसू देत नाही, मग ते आपल्या डोक्याची दार बंद करून कानांच्या माध्यमातून कुण्या एका व्यक्तीकडून काही कानमंत्र घेण्यात मग्न होतात. आणि आपसूकच मानवतावादाच्या विरोधात उभे राहून, आपण जे करतोय ते योग्यच हा अविर्भाव आणतात. मात्र अश्यात काही विरोधाभासी तरुणही असतात की, जे काहींची चुक ही सान्या समाजाला मारक ठरतेय त्याचा शोध घेतात, आणि त्यांच्यात पुन्हा जगण्याची उमेद निर्माण करू पाहतात, त्यांना कुटुंबवत्सल असल्याची जाणीव करून देतात. ब्रेन या एकांकिकेत याच धर्माध आणि मानवता हिताचे द्वंद्व दर्शविले आहे.
श्रीमती प. क. कोटेचा महिला महाविद्यालय, भुसावळ यांनी एल हि एकांकिका सादर केली.
एल. (L) या एकांकीकेचे शिर्षक हे इंग्रजीतल्या LGBTQ मधल्या L कड़े निर्देश करते. ही एकांकीका ही दोन लेस्बीयन स्त्रीयांचे नाते भुतकाळ वर्तमानकाळात उलगडत जाते. ह्यातली क्लिया ही पुरातत्वशास्त्रज्ञ आहे तर श्रेया ही आधुनिक सुखसोयीकडे आणि बाजारपेठेकडे आस्थेने पहाणारी स्त्री आहे. दो वयांमध्ये अंतर असल्याने त्या एकमेकींचे नाते जनरेशन गॅप मध्ये पडताळून पहातात. क्लियाचा समकालाला दिला जाणार प्रतिसाद हा काहीसा निराशेने भरलेला आणी संभाव्य भीतीविषयी चर्चा करणारा आहे तर श्रेयाचा जगाला दिला जाणारा प्रतिसाद आस्थेचा आणि आशावादाचा आहे.
एका दीर्घ मुदतीनंतर त्या दोघी एका दिवसासाठी खजुराहोच्या मंदीरांच्या परिसरात भेटतात आणि आपल्या नात्यांच्या जुन्या आठवणी आणि सध्याची परिस्थीती यावर चर्चा करतात. श्रेया त्या दोघिंचे नाते नव्या मितीत शोधण्यासाठी उत्सुक आणि क्रियाशील आहे, क्लियाचा तिला दिलेला प्रतिसाद हा मात्र संशोधन आणि सामाजिक शास्त्राच्या अंगाने जातो. आधुनिकता प्राचिन असु शकते का? खजुराहोची कामुक शिल्पे असणारी मंदीरे व्यक्तीस्वातंत्र्याचे प्रतिक आहेत की त्याचे सामाजिक अर्थ काही वेगळे आहेत? खजुराहोत समलिंगी स्त्रीयांच्या शिल्पांचा अर्थ नेमका काय असेल? खजुराहोची निर्मिती करणाऱ्या तत्कालीन चंडेल सामाज्याचे यामागचे नेमके हेतु वा उद्देश काय असतील? अशा विविध प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न आपल्या अभिनेत्रींच्या मार्गाने ही एकांकीका करते.
मूळजी जेठा महाविद्यालयाने कंदील मराठी (अहिराणी) एकांकिकासादर केली.जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील दीपनगर गाव. या गावात औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प असल्याने रोज अकराशे मेगा वीज तयार होत असते. परंतु, ही निर्मिती होत असताना जी वीजनिर्मितीची राख पडते, त्याचा येथील नागरिकांना भयंकर त्रास सहन करावा लागतो. यातील एक अनुभव म्हणजे ही एकांकिका कंदील आहे. अगदी ३ वर्षापूर्वीची गोष्ट आहे. दीपनगर गावात औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्पाच्या बाजूला काही शेतकर्यांची शेती होती.
वीज तयार होताना भोंगा वाजला की, उडणाऱ्या राखेपासून शेतकरी आपले पीक वाचवण्यासाठी नानाविध क्लुप्त्या लढवत असत. त्यातच त्या गावात वीज नसल्याने भयंकर उदासीनता होती. लोकप्रतिनिधी यांना सांगूनही काही उपयोग होत नसे. यावर कंदील एकांकिका ही जळजळीत केलेले भाष्य आहे..