<
जळगाव – (प्रतिनिधी) – हिंदुहृदयसम्राट वंदनिय बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या जयंती निमीत्त, च्या निमीत्ताने राज्यशासनाच्या वतीने आयोजित वंदनिय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला.
सदर कार्यक्रमास व्यासपिठावर उपस्थित कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महाराष्ट्र राज्याचे सन्माननिय मुख्यमंत्री मा. ना. एकनाथजी शिंदे साहेब, मा. अरोग्यमंत्री श्री. तानाजी सावंत साहेब, त्याचप्रमाणे संचालक आरोग्य सेवा संचालनालय मुंबई डॉ नितीन अंबाडेकर, उपसंचालक राज्य आरोग्य शिक्षण संपर्क विभाग पुणे डॉ कैलास बाविस्कर साहेब आदी मान्यवर उपस्थित होते.
सेवाकालावधी मध्ये अनुभव
मी गेल्या १८ वर्षापुर्वी शासकिय आरोग्य सेवेत रुजु झालो, त्यात पहिलीच नियुक्ती ही नंदुरबार या आदिवासी बहुल जिल्हयात देण्यात आली, त्यावेळी दळणवळणाची साधने नसलेले नर्मदा किना-यावरील डोंगराळ व अतिदुर्गम भागात दर्जात्मक आरोग्य सेवा देण्याचे एक आव्हाहन माझ्या समोर होते. परंतु म्हणतात ना परिस्थिती सर्व शिकवते ज्या लोकांना आरोग्य सेवा पुरविण्याचे आव्हाहन माझ्यासमोर होते त्या लोकांना आपलस वाटाव आणि त्यांना आरोग्य विषयीच्या समस्या सांगतांना मनात संकोच वाटु नये किंवा त्या आपल्याला कळाव्या यासाठी स्थानिक बोलीभाषा मी शिकुन घेण्याचा प्रयत्न केला त्यामुळे हळुहळु आदिवासी बांधवांचा विश्वास संपादन करण्यात मला यश आले, आणि त्यामुळेच. मी आरोग्य विभागाच्या सर्व योजना प्रभाविपणे राबवु शकलो, त्या आदिवासी बांधवांना दिलेली १० वर्षाची आरोग्य सेवा हा आजही माझ्यासाठी अविस्मरणीय कालावधी आहे. त्यानंतर माझी बदली जळगाव जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातंर्गत झाली या ठिकाणी विवीध प्रकारची कार्यासन सांभाळण्याची संधी मला मिळाली येथील सेवेमध्ये मला गोवर – रुबेला मोहिमेत उत्कृष्ठ काम केल्याबदद्ल जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये माझा गुणगौरव करुन, अभिनंदनाचा ठराव एकमताने मंजुर करण्यात आला तो क्षण मला अजुन प्रभाविपणे आरोग्य सेवा देण्यासाठी प्रोत्साहन देणारा ठरला.
त्यानंतर जगभरात कोवीड साथउद्रेकाने थैमान घातलेले असतांना सर्व नागरीक भेदरलेल्या अवस्थेत होते, विवीध संभ्रम आवस्था निर्माण झाल्या होत्या, ग्रामस्थांच्या मनातील भिती घालवण्याच्या दृष्टीने आणि कोवीड प्रतिबंधात्मक उपायोजना या विषयी माहिती देण्यासाठी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली मी विवीध प्रसिध्दी माध्यमांव्दारे जिल्हयाभरात जनजागृती करुन कोवीड साथउद्रेक आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले.
शासनाचा पाइक म्हणुन आरोग्य सेवक या नात्याने ग्रामिण भागात काम करतांना ग्रामस्थांच्या आरोग्याचे प्रश्न सोडविण्याची जबाबदारी आम्हा आरोग्य कर्मचा-यांवर असते. हि जबाबदारी पार पाडतांना अनेक चांगले व तो वाईट अनुभव येतात मात्र शेवटचा उपेक्षित घटक केंद्रबिंदु मानुन आरोग्य सेवेपासुन वंचित राहु नये यासाठी माझ्यासारखा प्रत्येक आरोग्य कर्मचारी झटत असतो.