<
वाकडी, ता. चाळीसगाव येथील विद्यमान सरपंच प्रकाश यशवंत पाटील यांनी व ईतर दोन जणांनी सावदा, ता. रावेर येथील हाजी ईमदाद अली अख्तर हुसेन या पेट्रोल पंपांचे मालक शब्बीर हुसेन अख्तर हुसेन उर्फ बाबुशेठ यांना, “आम्ही बॉम्बे व्हिजीलन्स स्क्वॉडचे अधिकारी असुन मुंबई येथून आलेलो आहोत, तुम्ही पेट्रोल व डिझेल मध्ये रॉकेल भेसळ करतात, अशी तुमच्याविरुद्ध मंत्रालयापर्यंत तक्रार आहे, तुमचा पेट्रोल पंप सील करावा लागेल,” अशा धमक्या देउन दि.०५-११-२००८ पुर्वीच्या एक वर्षाच्या कालावधीत वेळोवेळी रु.१,१५,०००/- खंडणीची रक्कम वसुल केली. शेवटी दि.०५-११-२००८ रोजी या तिघां आरोपींना फिर्यादी शब्बीर हुसेन अख्तर हुसेन यांनी सावदा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक निलेश माईनकर यांच्या मदतीने सापळा रचून सावदा येथील त्यांचे पेट्रोलपंपाच्या कॅबिनमध्ये रु.५०,०००/- खंडणीची रक्कम स्विकारताना रंगेहाथ पकडले, त्यावेळी पोलिसांनी आरोपींकडून पेट्रोल पंपांचे लेबल असलेले रोख रु.५०,०००/-चे बंडल, दोन मोबाईल, डायरी असा ऐवज हस्तगत केला, अशी फिर्याद शब्बीर हुसेन अख्तर हुसेन यांनी दि.०५-११-२००८ रोजी सावदा पोलिस स्टेशन, ता. रावेर येथे दाखल केली. त्यानुसार सावदा पोलिस स्टेशनला आरोपी प्रकाश यशवंत पाटील व ईतर दोघांविरुद्ध गु. र. नं.९१/२००८ अन्वये गुन्हा दाखल झाला होता.
सदर खटला चौकशीवेळी रावेर न्यायालयात सरकारपक्षातर्फे फिर्यादी शब्बीर हुसेन अख्तर हुसेन, घटनास्थळ व जप्ती पंच अफजलखान, पेट्रोल पंपाचा मॅनेजर सतीश जोशी आणी तपासाधिकारी सपोनि निलेश माईनकर यांच्या साक्षी नोंदविण्यात आल्यात. चौकशीअंती रावेर न्यायालयाने आरोपी प्रकाश यशवंत पाटील यांना दोन वर्षे सक्तमजुरी रुपये आणि दहा हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली. ईतर दोन्ही आरोपींना रावेर न्यायालयाने निर्दोष सोडले होते.
सदर शिक्षेच्या निकालाविरोधात व्यथित होऊन अपेलंट प्रकाश यशवंत पाटील यांनी भुसावळ येथील जिल्हा व सत्र न्यायालयात फौजदारी अपील क्र.६६/२०१६ दाखल केले होते. आरोपीतर्फे व सरकार पक्षातर्फे अशा दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून भुसावळ येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. आर. एम. जाधव यांनी आरोपी प्रकाश यशवंत पाटील यांची, रावेर कोर्टाने दिलेली दोन वर्षाच्या सक्तमजुरी व रु.१००००/- दंड ही शिक्षा रद्द करून आरोपी/अपेलंट प्रकाश यशवंत पाटील यांस सदर गुन्ह्यातून निर्दोष मुक्त केले.
आरोपी/अपेलंटतर्फे जळगाव येथील ॲड. निरंजन वसंत ढाके यांनी आरोपीची बाजू मांडली. सरकारपक्षातर्फे ॲड. भोंबे आणि फिर्यादीतर्फे ॲड. जगदीश कापडे यांनी काम पाहिले.