<
गांधी रिसर्च फाऊंडेशनद्वारा डॉ. भवरलालजी जैन स्मृति व्याख्यानमाला संपन्न
जळगाव दि. 26 (प्रतिनिधी) – कृषी संस्कृती हे भारताचे वैभव असून शेतकरी स्वत: संशोधकवृत्तीने काम करतो. कुठलेही प्रयोग शाळेतील संशोधन जितके महत्त्वाचे आहे, तितकेच निसर्गाकडे डोळसपणे पाहून जे शेतातील आहे तेच मातीत टाकले तर जमीन सूपीक ठेवता येईल. यात जमीनीची शेती न करता सूर्य प्रकाशाची शेती करावी, त्यासाठी व्हिजन असलेली दूरदृष्टी हवी हे व्हिजन शेतकऱ्यांमध्ये भवरलाल जैन यांनी निर्माण केले. त्यांच्या जीवनातील प्रयोगशिलता हाच शेतकऱ्यांसाठी शाश्वत विकासाचा मार्ग आपण सर्वांनी स्विकारावा असे आवाहन पर्यावरण कार्यकर्ता व अभ्यासक दिलीप जोशी यांनी केले.
गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे ‘बंजर भूमि और बंजर मन से मुक्त पृथ्वी’ या विषयावर डॉ. भवरलालजी जैन स्मृति व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प त्यांनी गुंफले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी गुजरात विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सुदर्शन अय्यंगार होते. त्यांच्यासोबत गांधी रिसर्च फाऊंडेशनचे संचालक अनिल जैन, जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन व्यासपीठावर उपस्थित होते. मान्यवरांच्याहस्ते दीपप्रज्वलन झाले. आरंभी अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मेरी भावना ही प्रार्थना आणि नमोक्कार मंत्र सादर केले.
प्रास्ताविक अनिल जैन यांनी केले. त्यात ते म्हणाले, ‘जगाला दिशा देण्याचे काम भारत करत आहे. भारतातील शेतकऱ्यांमुळेच संवेदनशिल समाजनिर्मिती होत आहे. शेत, शेतकरी यांच्यात सकारात्मक बदल कसा होईल, याचा ध्यास भवरलालजी जैन यांनी घेतला. ज्ञान विज्ञानातून पुढे आलेले संशोधन थेट सहजसोप्या भाषेत शेतकऱ्यांपर्यंत पोहचेल यासाठी अव्याहतपणे त्यांनी कार्य केले. आपल्या मातीशी आत्मीयता ठेवावी हाच संस्कारातून ‘पाणी थेंबाने पिक जोमाने’ हे ब्रिद तंत्रज्ञानाच्या रूपात शेतकऱ्यांपर्यंत पोहचविले. संशोधन पोहचवित असताना शाश्वत पर्यावरण कसे सांभाळे जाईल याचीही काळजी घेतली. हाच संस्कार घेऊन निसर्गाकडून जे घेतले त्याहीपेक्षा अधिक सुंदर कसे करता येईल, यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजे.
‘बंजर भूमि और बंजर मन से मुक्त पृथ्वी’ या विषयावर पुढे मार्गदर्शन करताना दिलीप जोशी यांनी निसर्गाकडून जे संसाधन आपल्याला प्राप्त होतात ते कसे चांगले राहतील यासाठी निरीक्षणातून समजून घेतले पाहिजे. रोगमुक्त, परिपुर्ण शेती करण्यासाठी निसर्गाशी एकरूप कसे होता येईल यासाठी प्रयत्न केले पाहिजे. शेती हे विज्ञान आहे हे समजून घेतले पाहिजे. देशातील प्रत्येक शेतकरी हा प्रयोगशील शेतकरी आहे. फक्त कुठेलेही जगातील नवीन संशोधन जे शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल आणतील ते शास्त्र, ज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचविणे अपेक्षित असून हेच काम भवरलालजी जैन यांनी केले. त्यांनी सृजनशक्तीचा वापर करून बंजर जमीन सुजलाम् सुफलाम् केली आणि आजही पुढची पिढी शेतकऱ्यांसाठी ते काम करीत आहे. शेतीत भविष्य असून यातील उदासिनता दूर करणे हाच भवरलालजी जैन यांचा धर्म राहिला. आपल्या मातीशी एकनिष्ठ राहून, भूमिची सेवा विज्ञान व माहिती तंत्रज्ञानातून, प्रयोगातून त्यांनी केली. पर्यावरण अभ्यासक व कार्यकर्ते तसेच एनआयडी पहिल्या बॅचचे पदवीधारक असलेले दिलीप जोशी यांनी दाभोळकरांच्या प्रयोग परिवाराने केलेले शेतीविषयक संशोधन आणि त्यांनी त्यात केलेले कार्य सादरीकरणातून सांगितले. यानंतर मुक्तसंवादामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे निरसनही दिलीप जोशी यांनी केले.
अध्यक्षीय भाषणात डॉ. सुदर्शन अय्यंगार यांनी मानवता टिकविण्यासाठी शेतकऱ्यांमधील स्थिरता महत्त्वाची असून प्रयोगशिलतेतून भवरलाल जैन यांनी हे स्थैर्य शेतकऱ्यांच्या जीवनात आणले. शेती करताना शाश्वत उत्पादन क्षमता कशी वाढेल यासाठी प्रयत्न केले पाहिजे असेही ते म्हणाले. डॉ. अश्विन झाला यांनी सूत्रसंचालन केले. गिरीष कुळकर्णी यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने व्याख्यानमालेची सांगता झाली.