<
नॅशनल गांधीयन लिडरशिप कॅम्पचे उद्घाटन; गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम
जळगाव-(प्रतिनिधी)- महात्मा गांधीजींचे नेतृत्व समजण्यासाठी त्यांनी दिलेल्या सत्य, अहिंसा, स्वच्छता अशा तत्वांचे आचरण केले पाहिजे. गांधीजींच्या विचारांमधुनच चांगल्या राष्ट्राचे निर्माण होऊ शकते. युवक ही भारताची मोठी ताकद असून गांधी विचारामधुन उज्ज्वल भारत घडविण्यासाठी तरूणांनी पुढे आले पाहिजे; असे सांगत स्वच्छतेचा संस्कार आपण कृतितून अंगिकारावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी केले.
गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे ‘बा-बापू 150’ अंतर्गत आजपासून दहादिवसीय नॅशनल गांधीयन लिडरशिप कॅम्पचे आयोजन केले आहे. नेपाळ सह भारतातील 13 राज्यांतून 68 विद्यार्थ्यांचा सहभाग असलेल्या कॅम्पच्या उद्घाटनाप्रसंगी डॉ. अविनाश ढाकणे बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर गांधी रिसर्च फाउंडेशनचे विश्वस्त सेवादास दलिचंदजी जैन, माजी कुलगुरू डॉ. के. बी. पाटील उपस्थित होते.
गांधीजींचे विचार सोप्या भाषेत समजण्याचे महत्त्वाचे ठिकाण म्हणजे गांधी तीर्थ. ही वास्तु निर्माण करण्याचे महान कार्य डॉ. भवरलालजी जैन केले ही बाब इतिहासात नोंद घेण्यासारखी आहे, असे सांगत डॉ. अविनाश ढाकणे यांनी गांधीजींच्या नेतृत्व कौशल्यावर भाष्य केले. आपण स्वत: केलेल्या परिश्रमातून समाज बदलविण्याची क्षमता गांधीजींच्या नेतृत्वगुणांमध्ये होती. उज्जवल भारत घडविण्यासाठी आपण स्वच्छेता संस्कार अंगिकारला पाहिजे, त्याचे आचरण केले पाहिजे. नवीन तंत्रज्ञान, सोशल मिडीयाचा वापर करताना सजग राहिले पाहिजे. यामाध्यमातून सकारात्मक विचारांचा प्रचार-प्रसार करावा जेणे करून दिशादर्शक समाज घडविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे मत जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
नेतृत्व जनसेवेसाठी असावे- डॉ. के. बी. पाटील
गांधीजींचे विचार कृषी, ग्रामीण, राजकीय, शिक्षण, व्यवस्थापन यासह प्रत्येक क्षेत्रात दिशा देणारे असून त्यामुळेच ते महात्मा आहेत. महात्मा गांधी यांच्यासह स्वातंत्र्यपुर्व काळातील सर्व नेत्यांच्या नेतृत्वामध्ये संवाद कौशल्यामध्ये स्वातंत्र मिळण्याची, जनसेवेची भावना होती. सध्यांच्या नेतृत्वांमध्ये समाजपयोगी नेतृत्वांचा देखावा केला जातो मात्र प्रत्यक्ष आचरण वेगळेच असते. हे बदलविण्यासाठी युवकांना गांधीजींचे विचार आत्मसात करून त्यांना अपेक्षित असलेले नेतृत्व कौशल्य विकसीत करावे, त्याचे आचरण करावे असे मार्गदर्शन माजी कुलगुरू डॉ. के. बी. पाटील यांनी केले.
गांधीजींना अभिप्रेत असलेल्या नेतृत्वासाठी त्याग महत्वाचा- दलिचंद जैन
भाषा, प्रांत हे विसरून माझा भारत आणि मी भारताचा हा संदेश देण्यासाठी त्याग, समर्पणाची भावना आवश्यक असते. ही भावना गांधीयन कॅम्पमध्ये विकसीत होते. यातून स्वावलंबासह गांधीजींना अपेक्षित असलेले नेतृत्व घडू शकते असे मत गांधी रिसर्च फाऊंडेशनचे विश्वस्त सेवादास दलिचंदजी जैन यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे उद्घाटन दीपप्रज्वलनाव्दारे झाले. मान्यवरांचे स्वागत गीता धरमपाल यांनी सुतीहाराने केले. सुरवातीला अनुभूती इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी गांधीजींना प्रिय असे ‘वैष्णव जन..’ हे भजन म्हटले. जॉन चेल्लादूराई यांनी प्रास्ताविक केले. मान्यवरांचा परिचय भुजंगराव बोबडे यांनी करून दिला. अश्विन झाला, विद्या कृष्णमूर्ति यांनी सुत्रसंचालन केले. गीता धरमपाल यांनी आभार मानले. यावेळी अंबिका जैन, समन्वयक उदय महाजन व सर्व सहकारी उपस्थीत होते. गांधी रिसर्च फाउंडेशनचे विश्वस्त अशोक जैन यांच्या मार्गदर्शनानुसार गांधी रिसर्च फाउंडेशनचे सहकारी गांधीयन लिडरशिप कॅम्पच्या यशस्वीतेसाठी सहकार्य करीत आहेत.
आम्ही पहिल्यांदा समाजाचे सेवक हा संदेश
नेपाळ, मणिपूर, त्रिपूरा, मेघालय, आसाम, तामिनाळु, पश्चिम बंगाल, केरळ, झारखंड, उडिसा, उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र या राज्यातून आलेल्या विद्यार्थ्यांनी पोस्टरद्वारे ‘We leaders are the first Servants’ हा इंग्रजीतून संदेश दिला. आम्ही नेतृत्व करणारे पहिल्यांदा समाजाचे सेवक आहोत, या आत्मशुद्धतेसह राष्ट्रनिर्माणासाठी सत्य, अहिंसेचे विचार घेऊन नेतृत्व विकसीत करणार असल्याचा संदेश दिला.
विविध विषयांवर होईल मंथन
गांधी रिसर्च फाउंडेशनद्वारे सुरू झालेल्या नॅशनल गांधीयन लि़डरशिप कॅम्प युवकांना गांधी विचार समजावे अहिंसा, सत्य या विचारांचे नेतृत्व कौशल्य निर्माण व्हावे, यासाठी मुल्यवर्धित शिक्षण-प्रशिक्षण देत आहे. गांधीयन लिडरशिप कॅम्पमध्ये प्रभात फेरी, योगा, शेती, स्वच्छता, गोशाळा, पक्षीनिरीक्षण, पिसवॉक यामध्ये श्रमदान, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. तसेच गांधीजींचे पणतू तुषार गांधी, विश्वास पाटील, पर्यावरण तज्ज्ञ दिलीप कुलकर्णी, कृष्णा खैरनार, जगदीश रतनानी अशा मान्यवरांचे मार्गदर्शन लाभणार आहे.