<
“आपण त्यांच्या समान व्हावे, तरुणाईसाठी महात्मा जोतिबा फुले…
लेखन-योगेश माळी
एकोणिसाव्या शतकात महाराष्ट्रात होऊन गेलेल्या समाजसुधारकांमध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांचे कार्य उल्लेखनीय ठरते. आद्य समाजसुधारक, भारतातील स्त्री शिक्षणाचे जनक, तसेच समाज परिवर्तनासाठी आयुष्यभर प्रतिगामी विचारांच्या समाजाशी लढा देऊन, त्यांनी समतेची चळवळ सुरू केली. या चळवळीत यशस्वी झाले. म्हणूनच त्यांना “समाजक्रांतीचे जनक” या नावाने त्यांचा उल्लेख केला जातो.
अस्पृश्यता निर्मूलन आंदोलनाची पायाभरणी महात्मा फुले यांनी केली. या मुक्तिसंग्रामाचे मूळ स्त्रोत महात्माजिंच्या शैक्षणिक व सामाजिक कार्यातच आढळतात. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी महात्मा फुलेंचा गौरव करताना म्हणतात, हिंदु समाजातील बहुजन समाजात आत्मप्रत्यय व आत्मवलोकन उत्पन्न करणारा पहिला माणूस म्हणजे महात्मा फुले.
समाजातील वंचित शोषित, पिढीत घटकांसाठी त्यांचे कार्य मोठ्याप्रमाणात उल्लेखनीय ठरते. महात्मा फुले यांनी समाजकार्यास सुरूवात करताना सर्वप्रथम स्त्रीशिक्षणास प्राधान्य दिले. १८४८ पुण्यात बुधवार पेठेतील भिड्यांच्या वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. त्यांनतर ३ जुलै १८५१ बुधवार पेठेतील चीपळूणकरांच्या वाड्यात मुलींची दुसरी शाळा महात्मा फुलेंनी सुरू केली. त्यांनतर १७ सप्टेंबर १८५१ रास्ता पेठेत मुलींची तिसरी शाळा सुरू केली. सोबतच १५ मार्च १८५२ वेताळ पेठेत त्यांनी मुलींची शाळा सुरू केली. मुलींच्या शाळा सुरू करण्यामागील महात्मा फुलेंच्या कार्यामागे अहमदनगरच्या मिस फरार यांनी मुलींसाठी सुरु केलेल्या शाळेची प्रेरणा होती. स्त्रीशिक्षणाविषयी महत्व सांगताना, “जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धरी” असे फुले म्हणत.
तसेच त्यांनी अस्पृश्यता निर्मूलन, बालहत्या प्रतिबंधक गृह, विधवा विवाह, केशवपन पद्धतीस विरोध, वाघ्या व मुरळी प्रथा, अस्पृश्यांसाठी शाळा, व्यसनमुक्तीसाठी प्रयत्न, सत्यशोधक समाजाची स्थापना, सार्वजनिक सत्यधर्म यांसारख्या अनेक घटकांवर महात्मा फुलेंचे कार्य उल्लेखनीय दिसून येते. महात्मा फुलेंनी शिक्षणाला तिसरे नेत्र म्हंटले आहे. शिक्षणाच्या अभावामुळे मनुष्य नैतिक व बौद्धिकदृष्ट्या पंगू होतो. मुठभर लोकांना शिक्षित करून सर्वसामान्य माणसाच्या जीवनात काहीच फरक पडणार नाही. शुद्रातिशुद्र विद्यार्थ्याला पण शिक्षण घेता आले पाहिजे. थोडक्यात शिक्षण हे सार्वजनिक व प्राथमिक शिक्षण हे सक्तीचे असावे, असे त्यांचे मत होते.
महात्मा फुले यांनी स्त्री आणि अतिशूद्रनच्या केलेल्या उद्धाराच्या कार्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या स्थितीतही परिवर्तन करण्याचे कार्य केलेले मोठ्याप्रमात दिसुन येते. महात्मा ज्योतिबा फुलेंनी समाजासाठी तळागळातील सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी सोबतच वंचीत, शोषित पिढीत घटकांसाठी केलेल्या त्यांच्या कार्यामुळे ११ मे १८८८ रोजी मुंबई शहरात नागरिकांची एक जाहीर सभा मांडवी, कोळीवाडा हॉलमध्ये आयोजित करण्यात आली. या सभेत शेतकरी व कामगारांचा सहभाग होता.
शहरातील प्रतिष्ठीत नागरिक, दुकानदार, कारखानदार व मजूर सर्वमिळून पंचवीस हजार लोक जमले होते. या सभेमध्ये रावसाहेब वड्डेदार यांच्यातरफे फुले यांना “महात्मा” ही पदवी देण्यात आली.
फुलेंना ही पदवी त्यांनी कनिष्ठ जमातीसाठी अव्याहतपणे काम केले म्हणून देण्यात आली. तेव्हापासून ते महात्मा म्हणून ओळखले जाऊ लागले.
खरतर आजच्या तरुणाईने महात्मा फुले यांच्या कार्याचा आदर्श व प्रेरणा घेऊन समाजातील शेवटच्या वंचित, शोषित, पिढीत घटकांसाठी त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व त्यांच्या न्याय हक्कासाठी कार्य करण्याची व लढा देण्याची गरज. प्रत्येक मानवाने इतरांशी बंधुभावाने वागावे आणि सत्यधर्माचे आचरण करावे. हि भावना फक्त एका समाजकार्य विद्यार्थ्याचीच…