<
महापालिकेचे वैद्यकीय महाविद्यालय सध्या पूर्ण क्षमतेने सुरू झाले असून प्रथमवर्गात सद्यस्थितीत २०० विद्यार्थी एमबीबीएसचे शिक्षण घेत आहेत. वैद्यकीय महाविद्यालयामध्ये आवश्यक असलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पदभरतीबाबत, पुणे महापालिका वैद्यकीय शिक्षण ट्रस्टने मान्यता दिली होती. त्यानुसार वैद्यकीय महाविद्यालयास आवश्यक असणाऱ्या पदांचा आकृतीबंध व सेवाप्रवेश नियम तयार करून तो राज्याच्या नगर विकास विभागाकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आला होता.
त्यास महाराष्ट्र शासनाची नुकतीच मान्यता मिळाली असल्याने, ही पदे भरण्यासाठी लवकरच जाहिरात काढण्यात येणार आहे. सदर पदभरतीमध्ये विविध विभागाचे प्राध्यापक, सह्योगी प्राध्यापक अशा २४ जागा, सहाय्यक प्राध्यापकांच्या २६ जागांसह प्रशासकीय अधिकारी, ग्रंथपाल व अन्य शिक्षकेतर कर्मचारी अशा १०१ जणांची भरती करण्यात येणार आहे.
पुणे महापालिकेच्या भारतरत्न अटलबिहारी वाजेपयी वैद्यकीय महाविद्यालयाची उर्वरित पदे भरण्याच्या प्रस्तावास महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने मान्यता दिली आहे. यामुळे महाविद्यालयातील १०१ पदांची भरती प्रक्रिया राबविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.