<
अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळालेला नाही, अशा विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिक्षण घेता यावे यासाठी भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी शासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना 2016 -17 या शैक्षणिक वर्षापासून सुरु केली आहे.
पात्र विद्यार्थ्यांनी स्वाधार योजनेसाठी अर्ज सादर करावे, असे आवाहन समाज कल्याण नाशिकचे सहाय्यक आयुक्त सुंदरसिंग वसावे यांनी केले आहे.महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना ही राबवली जाते.
स्वाधार योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिक्षण घेता यावे, यासाठी भोजन, निवास आणि इतर शैक्षणिक सुविधा उपलब्ध होण्यासाठी संबंधित विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर निश्चित केलेली रक्कम उपलब्ध करुन देण्यात येते. नाशिक शहरासाठी विद्यार्थ्यांना भोजन भत्ता 28 हजार रुपये, निवास भत्ता 15 हजार रुपये आणि निर्वाह भत्ता 8 हजार रुपये असे एकूण रुपये 51 हजार प्रति विद्यार्थी लाभाचे स्वरुप आहे.
अर्ज सादर करण्याचे आवाहन:- या रकमेच्या व्यतिरिक्त वैद्यकीय व अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्षी 5 हजार रुपये व अन्य शाखेतील विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्षी 2 हजार रुपये इतकी रक्कम शैक्षणिक साहित्यासाठी अतिरिक्त स्वरुपात देण्यात येते. सन 2021-22 या शैक्षणिक वर्षापर्यंत जिल्ह्यातील एकूण 750 विद्यार्थ्यांना एकूण 37 लाख 50 हजार रुपये इतक्या रकमेचा लाभ अदा करण्यात आला आहे.
पात्र विद्यार्थ्यांनी आपले अर्ज सादर करण्यासाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, नासर्डी पुला जवळ, नाशिक पुणे रोड येथे सादर करावेत. अधिक माहितीसाठी कार्यालयाच्या 0253-2975800 या दूरध्वनी क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सुंदरसिंग वसावे यांनी केले आहे.
पात्रता:- दरम्यान योजनेच्या लाभासाठी लाभार्थ्यांला इयत्ता दहावी, बारावी, पदवी, पदव्युत्तर परीक्षेमध्ये 50 टक्क्यांपेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे.
विद्यार्थी अुन.जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील असावा. विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. विद्यार्थी स्थानिक असावा. त्याने स्वत:चे आधार क्रमांक राष्ट्रीयकृत बँकेशी संलग्न केलेला असावा.
बारावीनंतर पदविका, पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणारा मान्यताप्राप्त अभ्यासक्रम 2 वर्षापेक्षा कमी नसावा. अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील दिव्यांग विद्यार्थ्यांना गुणमर्यादा 40 टक्के आवश्यक आहे. विद्यार्थी वसतिगृहात प्रवेशित नसावा आणि जिल्ह्याच्या ठिकाणी म्हणजेच नाशिक मनपा हद्दीच्या 5 किमी परिसरातील महाविद्यालयात शिक्षण घेणारा असणे आवश्यक आहे.