<
लोहारा ता.पाचोरा जि.जळगाव (रिपोर्टर ईश्वर खरे)
लोहारा येथून जवळ असलेले म्हसास येथे”शाळा व्यवस्थापन समिती व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा म्हसास” यांच्यातर्फे आज दिनांक 4 सप्टेंबर रोजी म्हसास शाळेचे “माजी मुख्याध्यापक श्री रत्नाकर पाटील सर व उपशिक्षक श्री प्रवीण भालेराव सर” यांची ऑनलाईन संगणकीय बदली झाल्याने त्यांना आज शाळेतर्फे निरोप देण्यात आला.
आजच्या या कार्यक्रमासाठी म्हसास व रामेश्वर गावचे सरपंच,उपसरपंच, पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य तसेच दोन्ही गावातील शिक्षण प्रेमी, लोहारा केंद्र अंतर्गत सर्व शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक, विद्यार्थी या सर्वांच्या उपस्थितीने कार्यक्रम यशस्वी संपन्न झाला. आजच्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी म्हसास गावचे सरपंच श्री ज्ञानेश्वर दादा पाटील हे होते. प्रास्ताविक म्हसास शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर जाधव सर यांनी केले.
या कार्यक्रमाप्रसंगी प्राजक्ता जळतकर मॅडम, महेश रोकडे सर व शिवाजी बोरसे सर या शिक्षकांनी मनोगते व्यक्त केली. विद्यार्थी व गावातील शिक्षणप्रेमी यांनी पण आपले मनोगत व्यक्त केले. शाळेतर्फे श्री रत्नाकर पाटील सर व प्रवीण भालेराव सर यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व प्रतिमा भेट देऊन सत्कार करण्यात आला. उपस्थित सर्व मान्यवरांनी दोघेही निरोपार्थी व सत्कारमूर्ती शिक्षकांचे स्वागत केले. तसेच ऑनलाईन संगणकीय बदलीने म्हसास शाळेत नुकतेच रुजू झालेले श्री ज्ञानेश्वर जाधव सर व पंकज पालीवाल सर यांचाही शाळेतर्फे व मान्यवरांतर्फे स्वागत करण्यात आले. सात वर्ष सेवाकाळ बजावताना आलेले अनुभव श्री रत्नाकर पाटील सर व प्रवीण भालेराव सर यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.भाषणाने सर्व श्रोते गण भावूक झाले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री पंकज पालीवाल सर व आभार प्रदर्शन श्री शिवाजी बोरसे सर यांनी केले.सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष,सदस्य,तथा शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक बंधू भगिनींनी सहकार्य केले.