<
फैजपूर-(प्रतिनिधी) – येथील तापी परिसर विद्या मंडळ फैजपूर संचलित धनाजी नाना कनिष्ठ महाविद्यालय फैजपूर येथे दिनांक 01/09/2023 रोजी ‘विशाखा’ समिती अंतर्गत ‘मासिक पाळी व्यवस्थापन’ या संदर्भात एक दिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए.आय.भंगाळे हे होते तर प्रमुख अतिथी व मार्गदर्शक डॉ.सौ.एकता सरोदे उपस्थित होत्या. वक्त्यांनी चर्चासत्रात वाढत्या वयाबरोबर मुलींच्या शरीरात अनेक बदल होतात, या बदलांची जाणीव प्रत्येक मुलींना असायला हवी, मासिक पाळीमुळे स्त्रियांचे आरोग्य चांगले राहते ,त्यासाठी मुलींनी मासिक पाळीचा कोणताही बाऊ करू नये किंवा घाबरून जाऊ नये. ती एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्यासाठी या काळात प्रत्येक मुलींनी आपल्या शरीराची योग्य काळजी घ्यावी,नियमित योगा आणि प्राणायाम करावा.
आहारात पालेभाज्यांचा वापर करावा, दुग्धयुक्त व प्रोटीन युक्त पदार्थ खावेत. तसेच आजच्या काळात स्त्रियांमध्ये अनेक आजार बळावत आहेत. त्यासाठी प्रत्येक स्त्रियांनी समतोल आहार करून आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी असे सांगितले, चर्चासत्रात मुलींनी विचारलेल्या वैयक्तिक समस्यांचे निराकरण करण्यात आले. तसेच विविध प्रश्नांवर व समस्यांवर चर्चा करण्यात आली. प्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक ‘विशाखा’ समितीचे चेअरमन प्रा.तिलोतमा चौधरी यांनी, सूत्रसंचालन प्रा.अर्चना वराडे व आभार प्रा.जयश्री सरोदे यांनी मानले, कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.उत्पल चौधरी पर्यवेक्षक कनिष्ठ महाविद्यालय, प्रा.कविता भारुडे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष सहकार्य केले.