<
जळगाव – (प्रतिनिधी) – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विचारधारा प्रशाळे अंतर्गत कवयित्री बहिणाबाई चौधरी अध्ययन व संशोधन केंद्राच्या वतीने विद्यापीठ नामविस्तार दिन आणि बहिणाबाई जयंतीच्या अनुषंगाने सन्माननीय कुलगुरू महोदय प्राध्यापक व्ही एल माहेश्वरी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष कार्यक्रमांतर्गत कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विचारधारा प्रशाळेचे संचालक तथा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. म.सु. पगारे होते तर प्रमुख अतिथी म्हणून विद्यापीठाचे वित्त व लेखाधिकारी श्री रविंद्र पाटील उपस्थित होते. याप्रसंगी व्यासपीठावर कवयित्री बहिणाबाई चौधरी अध्ययन आणि संशोधन केंद्राचे विभाग प्रमुख डॉ. नितीन बडगुजर उपस्थित होते. कवी संमेलनासाठी आंबेजोगाई येथील प्रसिद्ध मंचिय कवी श्री अविनाश भारती तसेच मसावद येथील जेष्ठ कवयित्री विमल वाणी तथा मु जे महाविद्यालय येथील प्राध्यापिका संध्या महाजन उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून करण्यात आले. त्यानंतर प्रस्ताविक करताना कवयित्री बहिणाबाई चौधरी अध्ययन आणि संशोधन केंद्राचे विभाग प्रमुख डॉ. नितीन बडगुजर यांनी बहिणाबाई चौधरी यांना अक्षरांची ओळख नसली तरी त्यांच्या नावाने विद्यापीठ चालविले जाते यामध्ये बहिणाबाईंच्या साहित्याची महती आपल्याला कळते असे सांगताना बहिणाबाईंच्या ओव्यांमध्ये, कवितांमध्ये आणि साहित्यामध्ये मानवी जीवनाचे तत्वज्ञान दडलेले आहे, त्याचबरोबर बहिणाबाईंच्या साहित्यामध्ये समाजशास्त्र, अर्थशास्त्र, मानसशास्त्र इत्यादी वैज्ञानिक शास्त्रांची देखील मांडणी आपल्याला दिसून येते व त्या अनुषंगानेच विद्यापीठाचे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ असे नामकरण झाल्याचे डॉ. बडगुजर यांनी सांगितले.
यानंतर आंबेजोगाई येथील अविनाश भारती, कवयित्री विमल वाणी आणि कवयित्री प्रा. संध्या महाजन यांनी आपल्या कविता याप्रसंगी सादर केल्या. श्री अविनाश भारती यांनी मातीतल्या कवीचा आणि त्याची समाजाची असलेली नाड या विषयावर आधारित कविता सादर करताना बहिणाबाई चौधरी ह्या आपले प्रेरणास्थान असल्याचे सांगितले कारण बहिणाबाईंच्या कविता या मातीतल्या कविता आहेत आणि म्हणून बहिणाबाईंच्या कवितांचा प्रभाव हा त्यांच्यावर आहे असे त्यांनी सांगितले. विमल वाणी यांनी देखील आपल्या कविता सादर करताना बहिणाबाईंच्या ओव्या या सातत्याने त्यांना प्रेरित करतात व त्या अनुषंगाने त्यांना कविता सुचते देखील असे सांगितले. याप्रसंगी त्यांनी बहिणाबाईंच्या बोली भाषेतील भारुड सादर केले त्यास रसिकांनी चांगली दात दिली. तर संध्या महाजन यांनी देखील आपल्या कवितांमधून बहिणाबाईंचा जीवनपटच उलगडून दाखविला त्यात त्यांनी बहिणाबाईंच्या जीवनातील प्रसंगानुरूप कविता व बहिणाबाईंच्या कवितांचा अर्थ समजावत त्याचा प्रत्येकाच्या जीवनाशी कसा संबंध आहे हे स्पष्ट केले. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना डॉ.म.सु. पगारे यांनी बहिणाबाई हे एक नाव नसून ते एक चालतं बोलतं विद्यापीठ होते म्हणुनच बहिणाबाईंचे नाव विद्यापीठाला दिले असावे असे सांगतानाच त्यांनी शासनाचे आभार देखील व्यक्त केले. त्याचबरोबर मराठी साहित्य आणि मराठी कविता यामध्ये बहिणाबाई यांचे योगदान हे अविस्मरणीय आहे असे सांगत त्यांनी बहिणाबाईंच्या कवितेतील मर्म यावर भाष्य केले.
बहिणाबाईंच्या कवितेतील सौंदर्य या विषयावर बोलताना डॉ. म सु पगारे यांनी बहिणाबाईंच्या कवितेतील सौंदर्य कशा रीतीने प्रकट होते याविषयी अतिशय सुरेख शब्दांमध्ये मांडणी केली. याप्रसंगी विद्यापीठाचे वित्त व लेखा अधिकारी श्री रविंद्र पाटील यांनी देखील आपल्या भावना व्यक्त करीत सर्व कवींना दाद दिली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विचारधारा प्रशाळेचे समन्वयक गौरव हरताळे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक नेत्रा उपाध्ये यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राध्यापक दीपक खरात, प्राध्यापक संधानशिव श्री चंद्रकांत वानखेडे श्री श्रीराम पाटील, बिराडे यांनी परिश्रम घेतले.