<
जळगाव दि. 2 (प्रतिनिधी) – ‘जन्मभूमी अर्थात भारताच्या समृद्धीसाठी आणि शाश्वत व आनंदासाठी युवकांनी गांधीजींच्या, विचार-तत्त्वांचा अंमल करणे अत्यंत गरजेचे आहे.’ असे आवाहन आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अणू शास्त्रज्ञ तथा गांधी रिसर्च फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांनी केले.
महात्मा गांधीजींच्या 150व्या जयंतीच्या औचित्याने काढलेल्या ‘अहिंसा सद् भावना शांतीयात्रेचे’ महात्मा गांधी उद्यानातील समापन सभेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर महात्मा गांधीजींचे पणतू तुषार गांधी, जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, जिल्हा परिषद सीईओ डॉ. बी. एन. पाटील, जळगाव महानगर पालिका आयुक्त डॉ. उदय टेकाळे, गांधी रिसर्च फाउंडेशनचे विश्वस्त सेवादास दलिचंदजी ओसवाल, अशोक जैन, ज्योती जैन, जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष अनिल जैन, अंबिका जैन, सर्व धर्मांचे धर्मगुरू उपस्थित होते.
गांधी विचारांतून समृद्ध भारत कसा घडू शकतो यावर भाष्य करताना डॉ. अनिल काकोडकर पुढे म्हणाले की, खेडी स्वावलंबी होण्यासाठी गांधी विचारातून ग्रामीणस्तरावर निर्यात वाढविण्यासाठी प्रोत्साहन दिले गेले पाहिजे. आव्हानात्मक परिस्थीतीत आपल्या कल्पनांतून तरूणांनी संधी निर्माण करावी. यासाठी प्रत्येकाने गांधी विचारांचा अंमल केला पाहिजे. मानवाच्या कल्याणासाठी गांधीजींनी सांगितलेल्या शाश्वत मूल्यांचे आचरण करावे. गांधीजींच्या तत्वांतून स्वत: ला, समाजाला सोबतच देशाला आणि विश्वाला समृद्ध करणे हे आपले कर्तव्य असल्याचेही यावेळी ते म्हणाले.
गांधी विचारातूनच खेडी स्वावलंबी होऊ शकतात यासाठी प्रत्येकाने मनाने स्वच्छ होणे महत्त्वाचे आहे असे जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणेंनी मनोगत व्यक्त केले.
आरंभी मान्यवरांच्याहस्ते महात्मा गांधी, कस्तुरबा आणि लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. अनुभूती स्कूलच्या विद्यार्थ्यांनी, ‘वैष्णव जन तो…’ भजन गायन केले. गांधी रिसर्च फाउंडेशनच्या अंबिका जैन यांनी प्रास्ताविकात गत वर्षभरात संस्थेने केलेल्या वाटचालीचा आढावा घेतला. याच बरोबर चालणारे कार्य व भविष्यातील संकल्पाबद्दल माहिती दिली. तुषार गांधी यांनी उपस्थितांना विश्व अहिंसा दिनानिमित्त प्रतिज्ञा दिली. भुजंगराव बोबडे यांनी आभार मानले. आश्विन झाला यांनी सुत्रसंचालन केले. दरम्यान संपुर्ण भारतात गांधी संस्कार परिक्षा घेण्यात आली. यामध्ये 1 लाख विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
वाढदिवस आणि गांधी दुर्मिळ छाया चित्रप्रदर्शन
गांधीजींचा जन्मदिवस हा प्रमुख विषय घेऊन गांधी उद्यानातील ‘मोहन ते महात्मा’ चित्रप्रदर्शनाशेजारी दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शनदेखील मांडले होते. त्याचे उद्घाटन डॉ. अनिल काकोडकर, तुषार गांधी व मान्यवरांच्याहस्ते करण्यात आले. यात 1933 ते 2 ऑक्टोबर 1947 च्या काळातील जन्मदिवसाचे दुर्मिळ क्षण टिपलेले छायाचित्रं प्रदर्शनात मांडले आहे. त्याचे विश्लेषण आश्विन झाला यांनी केले.
आर्टिस्ट आनंद पाटील यांचे चित्रप्रदर्शन
दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शनासमवेत जैन इरिगेशनचे आर्टिस्ट आनंद पाटील यांनी गांधीतीर्थच्या विविध स्थळांचे वॉटर कलरने चित्र साकारलेले त्याचप्रमाणे ‘चौकटी पलीकडचे गांधी’ या विषयावर सुत, कॉटन कपडा व चौकट यांचा उपयोग करून सुंदर असे इन्स्टॉलेशन केले. तो जणू सेल्फीपॉइंटच झाला. या प्रदर्शनास उत्तम प्रतिसाद मिळाला.