Wednesday, July 23, 2025
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

घरगुती व लहान स्तरावरील राडारोडा वाहून नेणारी ‘डेब्रीज ऑन कॉल’ सेवा आता ऑनलाईन, अधिक जलद आणि पर्यावरणपूरक

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
13/12/2024
in राज्य
Reading Time: 1 min read
घरगुती व लहान स्तरावरील राडारोडा वाहून नेणारी ‘डेब्रीज ऑन कॉल’ सेवा आता ऑनलाईन, अधिक जलद आणि पर्यावरणपूरक

५०० किलोग्रॅमपर्यंतची डेब्रीज संकलन सेवा मोफत, त्यावरील संकलनासाठी माफक दर

‘डेब्रीज ऑन कॉल’ करिता मुंबई शहर व पूर्व उपनगरांसाठी १८००-२०२-६३६४ आणि पश्चिम उपनगरांसाठी १८००-२१०-९९७६ हा टोल फ्री क्रमांक

‘मायबीएमसी’ मोबाईल ऍपवरुनही मागणी नोंदवण्याची लवकरच सुविधा

पुढील २० वर्षांसाठी डेब्रीज संकलन, वाहतूक, निष्कासन व शास्त्रशुद्ध प्रक्रिया करण्यासाठी कंत्राटदार नियुक्त

जागा, भांडवली गुंतवणूक, परिरक्षण व तत्सम बाबींवर महानगरपालिकेचा कोणताही भांडवली खर्च नाही

क्षमता लक्षात घेता महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या क्षमतेचा शास्त्रोक्त राडारोडा प्रक्रिया प्रकल्प तर ऑनलाईन सुविधा देणारा भारतातील पहिलाच प्रकल्प

अनधिकृतपणे राडारोडा (डेब्रीज) टाकण्याचे प्रकार टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजना

मुंबईतील ‘डेब्रीज ऑन कॉल’ सेवेची मागणी नोंदवण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने मुंबई शहर व पूर्व उपनगरांसाठी १८००-२०२-६३६४ आणि पश्चिम उपनगरांसाठी १८००-२१०-९९७६ हा टोल फ्री क्रमांक सकाळी ८.०० ते संध्याकाळी ८.०० या वेळेत उपलब्ध करुन दिला आहे.तर, ‘मायबीएमसी’ मोबाईल ऍपच्या माध्यमातून लवकरच ऑनलाईन पर्याय कार्यान्वित करण्यात येणार आहे जो २४ तास उपलब्ध असेल. राडारोडा संकलनापासून ते प्रक्रियेपर्यत ऑनलाईन प्रणालीद्वारे हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याने ही सेवा अधिक सुलभ, जलद होणार आहे. संपूर्ण भारतातील अशा प्रकारचा ‘ऑनलाईन’ सेवा असलेला हा पहिलाच उपक्रम आहे. तर प्रतिदिन १२०० टन प्रक्रिया ही क्षमता लक्षात घेता महाराष्ट्रातील सर्वात मोठा असा हा प्रकल्प आहे.

विशेष म्हणजे, या प्रकल्पात ५०० किलोग्रॅमपर्यंतची डेब्रीज संकलन सेवा विनामूल्य पुरवण्यात येणार आहे. त्यामुळे घरगुती व लहान स्तरावरील डेब्रीज संकलनाचे प्रमाण तर वाढेलच पर्यायाने अनधिकृतपणे डेब्रीज टाकण्यापासून संबंधित घटक परावृत्त होतील व अशा प्रकारांना आळा बसेल, याची महानगरपालिका प्रशासनाला खात्री आहे.

मुंबईतील घरगुतीस्तरावरील बांधकाम आणि पाडकाम यातून निर्माण होणारा राडारोडा (डेब्रीज) उचलून वाहून नेण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून ‘डेब्रीज ऑन कॉल’ ही सेवा सन २०१४ पासून पुरवली जाते. घरगुती तसेच लहान स्तरांवरील बांधकाम, पाडकाम, दुरुस्तीची कामे यातून निर्माण होणारे डेब्रीज संकलन करुन वाहून नेण्यासाठी ही सेवा माफक दरात कार्यरत आहे. रस्त्यावर तसेच इतरत्र टाकून देण्यात येणारे डेब्रीजचे प्रकार टाळण्यासाठी सुरु केलेली ही सेवा अल्पावधीत नागरिकांच्या पसंतीस उतरली. महानगरपालिकेच्या सर्व प्रशासकीय विभाग कार्यालय (वॉर्ड) निहाय ही सेवा उपलब्ध आहे. वॉर्डनिहाय पुरवलेल्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर ही सेवा पुरवली जाते.

असे असले तरी, मुंबई महानगराचा विस्तार पाहता, त्या तुलनेत घरगुती व लहान स्तरावर निर्माण होणा-या डेब्रीजचे अधिकाधिक संकलन व्हावे, त्याचप्रमाणे रस्त्यांच्या कडेला व इतरत्र टाकून देण्यात येणा-या अनधिकृत डेब्रीजचे प्रकार रोखता यावेत तसेच शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करुन सदर डेब्रीज पुनर्प्रक्रिया करुन वापर करण्याकरीता उपलब्ध व्हावे, यासाठी ही सेवा अधिक सुलभ, वेगवान व काळानुरुप ऑनलाईन पर्यायांसह उपलब्ध करुन देण्याची गरज निर्माण झाली होती. याबाबतचा अभ्यास करुन लोकाभिमुख, अधिक कार्यक्षम व्यवस्था उभी करण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांनी दिले होते. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प विभागाने ‘डेब्रीज ऑन कॉल’ सेवेचा लोकाभिमुख विस्तार केला आहे, अशी माहिती श्री. किरण दिघावकर उपआयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) (प्रभारी) यांनी दिली आहे.

या नवीन ‘डेब्रीज ऑन कॉल’ सेवेची ठळक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत.

१) टोल फ्री क्रमांक- घरगुती व लहान स्तरावरील बांधकाम, दुरुस्ती, पाडकाम यातून निर्माण होणारा राडारोडा (डेब्रीज) वाहून नेण्यासाठी मुंबईकरांना आता प्रशासकीय विभाग कार्यालय (वॉर्ड) निहाय दूरध्वनी क्रमांक लक्षात ठेवून त्यांच्यावर संपर्क साधण्याची गरज नाही. त्याऐवजी, ‘डेब्रीज ऑन कॉल’ करिता मुंबई शहर व पूर्व उपनगरांमधील नागरिकांनी १८००-२०२-६३६४ या टोल फ्री क्रमांकावर व पश्चिम उपनगरांतील नागरिकांना १८००-२१०-९९७६ या टोल फ्री सकाळी ८.०० ते संध्याकाळी ८.०० या वेळेत क्रमांकावर संपर्क साधता येईल. त्यामुळे संपर्काची सुविधा सुटसुटीत झाली आहे. परिणामी, वॉर्डनिहाय क्रमांकाऐवजी या दोन क्रमांकांवरुन संपूर्ण मुंबई महानगरातील नागरिकांना सेवा पुरवली जाईल.

२) ‘मायबीएमसी’ मोबाईल ऍप- बृहन्मुंबई महानगरपालिकेचे ‘मायबीएमसी’ हे मोबाईल ऍप नागरी सेवा-सुविधांशी संबंधित आहे. या मोबाईल ऍपमध्ये नागरिकांना ‘डेब्रीज ऑन कॉल’ चा पर्याय लवकरच उपलब्ध केला जाणार आहे. त्या पर्यायावर प्रवेश केल्यानंतर त्यामध्ये मुंबई शहर व पूर्व उपनगरांसाठी एक तर पश्चिम उपनगरांसाठी दुसरा असे दोन पर्याय आढळतील. योग्य पर्याय निवडल्यावर ‘डेब्रीज ऑन कॉल’ शी संबंधित स्वतंत्र मोबाईल ऍप इन्स्टॉल करता येईल. त्या ऍपमध्ये सर्व माहिती भरल्यानंतर महानगरपालिकेकडे मागणीची नोंद होईल.

३) जलद गतीने होणार कार्यवाही- महानगरपालिकेकडे मागणी प्राप्त झाल्यानंतर संबंधित कनिष्ठ पर्यवेक्षक (Junior Supervisor) प्रत्यक्ष ठिकाणी भेट देवून पाहणी करुन खातरजमा करतील. तसेच डेब्रीज नेण्यासाठी करावयाच्या कार्यवाहीचा अंदाज घेतील. त्यांच्याकडून मागणी मंजूर होवून लागू असणारे शुल्क ऍपद्वारे कळवले जाईल. तसेच, मागणी मंजूर केल्याचे संबंधित नागरिकांस मोबाईल ऍपवर, व्हॉटस्ऍपवर कळवले जाईल. लागू असलेले शुल्क भरणा केल्यानंतर ४८ तासांच्या आतमध्ये डेब्रीज संकलन करुन वाहून नेण्यात येईल.

४) ५०० किलोग्रॅमपर्यंत विनामूल्य सेवा, त्यापुढील दरही माफक- ‘डेब्रीज ऑन कॉल’ सेवेमध्ये आता ५०० किलोग्रॅमपर्यंतच्या डेब्रीजसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. ती सेवा पूर्णपणे विनामूल्य असेल. त्यापुढील डेब्रीजसाठी देखील अत्यंत माफक दर आकारले जाणार आहेत.

५) ऑनलाईन पेमेंट सुविधा- ‘डेब्रीज ऑन कॉल’ सेवेसाठी रक्कम देखील ऑनलाईन पद्धतीने प्रदान करण्याची सुविधा नागरिकांना मिळणार आहे. संबंधित मोबाईल ऍपद्वारे रकमेचा भरणा करता येईल. त्याची पावती देखील ऍपमध्ये त्याचप्रमाणे व्हॉटस्ऍपद्वारे दिली जाईल. ज्यांना ऑनलाईन भरणा करण्याऐवजी रोखीने रक्कम द्यायची असेल, त्यांनी प्रत्यक्ष भेट देणारे महानगरपालिकेचे कनिष्ठ पर्यवेक्षक (Junior Supervisor) यांच्याकडे रक्कम दिल्यानंतर पावती देण्यात येईल. ती रक्कम संबंधित कनिष्ठ पर्यवेक्षक महानगरपालिकेकडे जमा करतील.

६) पुढील २० वर्षांसाठी कंत्राटदार नियुक्त- ‘डेब्रीज ऑन कॉल’ सेवेचा लोकाभिमुख विस्तार करताना महानगरपालिकेने पुढील तब्बल २० वर्षांच्या कालावधीसाठी कंत्राटदार नियुक्त केले आहेत. राडारोडा संकलन, वाहतूक, त्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया करणे, त्यासाठी जागा मिळवून प्रकल्प उभारणे, मनुष्यबळ व संयंत्रे इत्यादी यंत्रणा उभी करणे, या सर्व बाबींची जबाबदारी ही कंत्राटदारावरच सोपविण्यात आली आहे. परिणामी महानगरपालिकेवर प्रकल्प जागा, भांडवली गुंतवणूक, परिरक्षण व तत्सम भांडवली बाबीच्या खर्चाचा भार आलेला नाही.

यामध्ये, मुंबई शहर (कुलाबा ते शीव) व पूर्व उपनगरांसाठी (कुर्ला ते मुलूंड) मेसर्स मेट्रो वेस्ट हॅण्डलिंग प्रा. लि. यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा प्रकल्प हा शिळफाटा, डायघर गाव येथे पाच एकर जागेवर स्थित आहे. या प्रकल्पाची प्रक्रिया क्षमता ६०० टन प्रति दिन इतकी आहे.
तर पश्चिम उपनगरांसाठी (वांद्रे ते दहिसर) मेसर्स एजी एनव्हायरो इन्फ्रा प्रा. लि. यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा प्रकल्प हा दहिसर, कोकणीपाडा येथे पाच एकर जागेवर स्थित आहे. या प्रकल्पाची प्रक्रिया क्षमता ६०० टन प्रतिदिन इतकी आहे. म्हणजेच, दोन्ही कंत्राटदारांची एकत्रित सेवा लक्षात घेता, प्रतिदिन १२०० टन डेब्रीजवर प्रक्रिया होणार आहे. त्यादृष्टिने महाराष्ट्रातील हा सर्वाधिक क्षमतेचा प्रकल्प ठरला आहे.

या दोन्ही कंत्राटदारांची सेवा दिनांक ४ नोव्हेंबर २०२४ पासून सुरु झाली आहे.

७) पर्यावरणपूरक उपक्रम- ‘डेब्रीज ऑन कॉल’ सेवेसाठी नियुक्त कंत्राटदारांच्या प्रकल्पांमध्ये राडारोडा नेल्यावर त्याठिकाणी डेब्रीजवर शास्त्रोक्त प्रक्रिया केली जाईल. त्यातून तयार होणारे वाळूसदृश्य घटक हे पेवर ब्लॉक, दुभाजक, पदपथांसाठी लागणारे दगड, बाक (बेंच) यासारख्या संरचनाविरहीत (नॉन स्ट्रक्चरल) बाबींच्या निर्मितीसाठी संबंधित उद्योगांना वापरात येवू शकतील. ही जबाबदारी देखील संबंधित कंत्राटदारांवर सोपवण्यात आली आहे. त्यामुळे ही नवीन ‘डेब्रीज ऑन कॉल’ सेवा जशी लोकाभिमुख आहे, तशीच ती पर्यावरणपूरक देखील ठरणार आहे.

८) भारतातील पहिलाच प्रकल्प- विशेष म्हणजे, वर नमूद केलेल्या वैशिष्ट्यांसह ‘डेब्रीज ऑन कॉल’ सेवा असलेला भारतातील हा पहिलाच प्रकल्प आहे ज्यामध्ये राडारोडा संकलनापासून ते प्रक्रियेपर्यंत ‘ऑनलाईन’ प्रणालीद्वारे राबविण्यात येणार आहे. स्वाभाविकच अशी सेवा पुरवणारी बृहन्मुंबई महानगरपालिका ही भारतातील पहिलीच संस्था ठरली आहे.

नव्या स्वरुपात सुरु केलेली ‘डेब्रीज ऑन कॉल’ सेवा नुकतीच सुरु झालेली असून प्रारंभीचा कालावधी हा प्रायोगिक स्वरुपाचा आहे. नागरिकांना या सेवेमध्ये येणारे अनुभव लक्षात घेवून, त्यांच्या सूचना विचारात घेवून त्यात अधिकाधिक सुधारणा करण्यात येतील, मुंबईकरांनी या ‘डेब्रीज ऑन कॉल’ सेवेला अधिकाधिक प्रतिसाद द्यावा, असे आवाहन उपआयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) (प्रभारी) श्री. किरण दिघावकर यांनी महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Twitter
  • Facebook
  • Telegram
  • WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

जळगाव जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांनी अनुभवली राष्ट्रपतीची संस्मरणीय भेट

Next Post

मशीद बंदर रेल्वे स्थानकाजवळील कर्नाक पुलाच्‍या लोखंडी तुळईचे ८३ टक्‍के सुटे भाग प्रकल्‍पस्‍थळी दाखल…

Next Post
मशीद बंदर रेल्वे स्थानकाजवळील कर्नाक पुलाच्‍या लोखंडी तुळईचे ८३ टक्‍के सुटे भाग प्रकल्‍पस्‍थळी दाखल…

मशीद बंदर रेल्वे स्थानकाजवळील कर्नाक पुलाच्‍या लोखंडी तुळईचे ८३ टक्‍के सुटे भाग प्रकल्‍पस्‍थळी दाखल...

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

जि. प. च्या आरोग्य विभागात १००% बायोमेट्रिक हजेरी प्रणाली पूर्णतः कार्यान्वित

जि. प. च्या आरोग्य विभागात १००% बायोमेट्रिक हजेरी प्रणाली पूर्णतः कार्यान्वित

Private:

माध्यमिक शिक्षण विभागाला माहिती अधिकार कायद्याचा विसर – ॲड. दिपक सपकाळे

शारदा प्राथमिक व माध्यमिक विद्यालय सुप्रीम कॉलनी,जळगाव मोफत नेत्र वं आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

शारदा प्राथमिक व माध्यमिक विद्यालय सुप्रीम कॉलनी,जळगाव मोफत नेत्र वं आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

Private:

दहिगाव ग्रामपंचायत कडून माहिती अधिकार कायद्याला केराची टोपली

ज्येष्ठ नागरिकांना ७ हजार मानधन, ५ लाखांपर्यंत मोफत आरोग्य सेवा;नवीन विधेयक सादर

ज्येष्ठ नागरिकांना ७ हजार मानधन, ५ लाखांपर्यंत मोफत आरोग्य सेवा;नवीन विधेयक सादर

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

Video Player
https://youtu.be/TzzuE2yX3DI
00:00
00:00
03:54
Use Up/Down Arrow keys to increase or decrease volume.

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Select Category

    Powered By Tech Drift Solutions.

    No Result
    View All Result
    • Home
    • रोजगार
    • लैंगिक शिक्षण
    • माहितीचा अधिकार २००५
    • शैक्षणिक
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • लेख
    • संपादकीय

    Powered By Tech Drift Solutions.

    whatsapp-logo
    %d

      Notifications