नाशिक रोड-(प्रतिनिधी) – आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त २० आणि २१ जून रोजी येथील मध्यवर्ती कारागृहात प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय, रोटरी क्लब आणि आर्ट ऑफ लिविंग यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय योग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नाशिक मध्यवर्ती कारागृहाच्या अधीक्षका सन्माननिय श्रीमती अरुणा मुगुटराव मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात वक्ता म्हणून पत्रकार ब्रह्माकुमार दिलीप बोरसे, बी के सुधा माता आणि सुनीता माता आदी योग शिक्षक उपस्थित होते. तसेच आर्ट ऑफ लिविंगतर्फे योग शिक्षक अशोक गवळी व राजेश साळी आणि रोटरी क्लब ऑफ नाईन हिल्सचे कैलास सोनवणे, विश्वास शिंपी, अजय चव्हाण इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन आणि समन्वयन कारागृहाचे शिक्षक बालाजी म्हेत्रे गुरुजी यांनी केले.

दिनांक २० जून रोजी योग दिनाच्या पार्श्वभूमीवर येथील कैदी बांधवांसाठी राजयोग ध्यान, योगासन आणि प्राणायाम यांचे विशेष सत्र ठेवण्यात आले होते. आंतरराष्ट्रीय योग दिन २०२६ चे घोषवाक्य “एक पृथ्वी, एक आरोग्य यासाठी योग” हे समोर ठेवून अधिकृत योग प्रोटोकॉलनुसार कैदी बांधवांकडून विविध योगासने करून घेण्यात आली. यामध्ये सर्वप्रथम प्रार्थना आणि मान, खांदे, हात, गुडघे व घोटे यांचे हलके व्यायाम करून शिथिलीकरण क्रिया करण्यात आल्या. त्यानंतर ताडासन, वृक्षासन, पादहस्तासन, अर्धचक्रासन, त्रिकोणासन ही उभी राहून करायची आसने आणि भद्रासन, वज्रासन, उष्ट्रासन, शशांकासन, उत्तान मंडूकासन ही बसून करायची आसने घेण्यात आली. पुढे मकरासन, भुजंगासन, शलभासन, सेतुबंधासन, पवनमुक्तासन व शवासन करून घेण्यात आले, तसेच कपालभाती, अनुलोम-विलोम (नाडीशोधन), शीतली आणि भ्रामरी या प्राणायामांचा सराव करून घेऊन सत्राचा शेवट ध्यान आणि संकल्पाने करण्यात आला.
या प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना मुख्य वक्ता ब्रह्माकुमार दिलीप भाई यांनी सांगितले की, मनुष्याच्या सुखी जीवनासाठी शरीर स्वास्थ्य अतिशय महत्त्वाचे आहेच, परंतु त्यासोबतच मानसिक स्वास्थ्य राखणे ही आजच्या काळाची मोठी गरज बनली आहे. समाजात सर्वदूर ताणतणाव, मानसिक रोग आणि सहनशीलतेचा अभाव मोठ्या प्रमाणात दिसत आहे आणि या पार्श्वभूमीवर शरीराच्या सोबतच मानसिक स्वास्थ्य उत्तम राहण्यासाठी ‘राजयोग मेडिटेशन’ अत्यंत सहाय्यभूत ठरू शकते. राजयोग मेडिटेशन म्हणजे असा योग जो आपल्याला आपल्याच इंद्रियांचा राजा बनवतो. आज माणूस इंद्रियलोलुपतेमुळे स्वतःच्याच इंद्रियांचा गुलाम झाला असून वेगवेगळ्या आजारांना सामोरे जात आहे, म्हणूनच या इंद्रियांवर विजय मिळवून अतींद्रिय सुखाचा अनुभव घेण्यासाठी प्रत्येकाने साप्ताहिक राजयोग मेडिटेशन केले पाहिजे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी, २१ जून रोजी येथील वरिष्ठ तुरुंगाधिकारी आणि कर्मचारी वर्गांसाठी विशेष योगा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. यात कारागृहातील सर्व अधिकारी वर्गासोबतच सर्व कर्मचारी बांधवांनी विविध आसने व प्राणायाम अत्यंत उत्साहाने केले. या सत्रासाठी खास उपस्थित राहिलेल्या योग शिक्षकांनी विविध आसने आणि प्राणायामांचे अचूक प्रात्यक्षिक दाखवले. या सत्राच्या शेवटी ब्रह्माकुमार दिलीप भाई यांनी ‘गाईडेड मेडिटेशन’द्वारे उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना अंतर्मनाची एक सुंदर सहल घडवून आणली.
तुरुंग अधीक्षका श्रीमती अरुणा मुगुटराव मॅडम यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सर्वांचे कौतुक करत सांगितले की, शरीर आणि मनासाठी अत्यंत उपयुक्त असलेला हा योग केवळ एक दिवस न करता प्रत्येकाने तो आपल्या दैनंदिन जीवनात दररोज केला पाहिजे, असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.









