<
जळगाव, दिनांक 18 – विधानसभा निवडणूकीसाठी जिल्ह्यात 21 ऑक्टोंबर, 2019 रोजी मतदान होणार आहे. मतदानाच्या दिवशी 11 विधानसभा मतदारसंघातील दुकाने व आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्नगृहे, व्यापारी आस्थापना, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती तत्रज्ञान कंपन्या, शॉपींग सेंटर्स, मॉल्स, रिटेलर्स इत्यादि आस्थापनांमध्ये कार्यरत असलेल्या मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी, असे निवडणूक आयोगाने एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे आदेशित केले आहे.
त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासन, उद्योग, उर्जा व कामगार विभागाकडून अधिसुचना व परिपत्रकाद्वारे सुचना प्राप्त झालेल्या आहेत. तसेच कामगार आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी पाठविलेल्या पत्रातूनही निर्देश प्राप्त झालेल्या आहेत. सदरच्या आदेशांची अंमलबजावणी होण्याचे दृष्टीने कामगार आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी जिल्हा स्तरावर नियंत्रण / दक्षता कक्ष स्थापन करण्याच्या सूचना केलेल्या आहेत.
या आदेशानुसार विधानसभा मतदारसंघाच्या मतदानाच्या दिवशी एकही कामगार मतदानापासून वंचित राहू नये. यासाठी मतदानाच्या दिवशी सर्व कामगारांना भरपगारी सार्वजनिक सुट्टी जाहिर केलेली असून अपवादात्मक परिस्थितीत ज्या औद्योगिक आस्थापना बंद ठेवल्याने त्यांचे नुकसान होत असेल अशा आस्थापनेतील कामगारांना मतदान करण्यासाठी किमान 2 ते 3 तासांसाठी सुट्टी देणे त्या संबंधित आस्थापनांना बंधनकारक करण्यात आलेले आहे.
ज्या आस्थापना कामगारांना मतदानासाठी 2 ते 3 तासांसाठी सुट्टी देत नसतील, अशा आस्थापनांच्या कामगारांनी मतदानाच्या दिवशी तक्रारी तथा दाद मागण्यासाठी सहाय्यक कामगार आयुक्त, यांचे कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्केट, टेलिफोन ऑफीस मागे, जळगाव येथील नियंत्रण कक्षात लेखी तक्रार करावी. हा नियंत्रण कक्ष 20 व 21 ऑक्टोबर, 2019 या दोन्हीही दिवशी सकाळी 9.30 ते संध्याकाळी 6.00 वाजेपर्यत कार्यरत राहणार असल्याची माहिती सहाय्यक कामगार आयुक्त चं. ना. बिरार यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.