<
जळगाव-(जिमका)-महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 साठी मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे. मतमोजणीसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांची सरमिसळ जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात करण्यात आली. याप्रसंगी निवडणूक निरिक्षक पार्थ सारथी मिश्रा, गौरव बोथरा यांच्यासह अपर जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे, जिल्हा विज्ञान व सुचना अधिकारी प्रमोद बोरोले, उप जिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे, निवडणूक तहसीलदार बाबासाहेब गाढवे यांच्यासह निवडणूक शाखेतील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. यानंतर मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांचे राजे संभाजी नाट्यगृह येथे दुसरे प्रशिक्षण संपन्न झाले. त्यानंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना बसने त्यांच्या मतदान केंद्राकडे रवाना करण्यात आले. जिल्ह्यात विधानसभेचे अकरा मतदार संघ असून या मतदार संघातील मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासनाने 1 हजार 254 अधिकारी, कर्मचारी यांची नेमणूक केली आहे. मतमोजणी 24 ऑक्टोबर रोजी सकाळी 8.00 वाजता संबंधित मतदार संघाचे निवडणूक निरिक्षक, निवडणूक निर्णय अधिकारी, सूक्ष्म निरिक्षक यांच्या उपस्थितीत होणार आहे. संपूर्ण मतमोजणी प्रक्रियेदरम्यान निरीक्षक उपस्थित राहतील. फेरीनिहाय मतमोजणीची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी करतील. सर्वसामान्यांना मतमोजणीची माहिती मिळावी यासाठी मतमोजणी केंद्राबाहेर ध्वनिक्षेपक लावण्यात आले आहेत. मतमोजणीच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. तसेच प्रत्येक पॉईंटवर हजर असलेल्या व्हीडिओग्राफरकडून घडणाऱ्या प्रत्येक हालचालींचे चित्रीकरण करण्यात येऊन त्यावर बारकाईने लक्ष ठेवण्यात येणार आहे. मतमोजणी केंद्रावर पुरेसा पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. विधानसभा क्षेत्रनिहाय मतमोजणी होणार असलेली ठिकाणे – चोपडा- महाराष्ट्र वखार महामंडळ, गोडवून क्रमांक 2, चोपडा, रावेर – नवीन प्रशासकीय इमारत, तहसील कार्यालय, रावेर, भुसावळ- प्रशासकीय इमार, प्रभाकर हॉलसमोर, भुसावळ, जळगाव शहर- महाराष्ट्र वखार महामंडळाचे गोडवून क्रमांक 26, जळगाव, जळगाव ग्रामीण- महाराष्ट्र वखार महामंडळ, गोडवून क्रमांक 2, धरणगाव, अमळनेर- छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल, प्रताप कॉलेज, अमळनेर, एरंडोल- डीडीएसपी कॉलेज, तरणतलावाजवळ, म्हसावद रोड, एरंडोल, चाळीसगाव- वायएन चव्हाण महाविद्यालय, हिरापूर रोड, चाळीसगाव, पाचोरा-गिरणाई क्रेडिट सोसायटी गोडावून क्रमांक 3, मोंढाळा रोड, पाचोरा, जामनेर- शासकीय खाद्यनिगम गोडवून क्रमांक 3, मार्केट कमिटीच्या पश्चिम बाजूला, जामनेर, मुक्ताईनगर-श्री संत मुक्ताबाई महाविद्यालय इनडोअर स्टेडियम, मुक्ताईनगर येथे होणार आहे.