<
जळगाव – महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 साठी दि. 21 ऑक्टोबर, 2019 रोजी मतदान घेण्यात आले. जिल्ह्यातील अकरा विधानसभा क्षेत्रात दिव्यांग मतदारांनी 42.79 टक्के इतके मतदान केले. जिल्ह्यात दिव्यांग मतदारांची संख्या 12 हजार 762 अशी असून 5 हजार 462 दिव्यांग मतदारांनी मतदान या निवडणूकीत मतदान केले आहे. दिव्यांग मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी प्रशासनाने आयोगाच्या निर्देशप्रमाणे रॅम्प, त्यांची ने-आण करणे, व्हील चेअरवरून मतदान कक्षापर्यंत घेऊन जाणे आदि सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. त्याचबरोबर जिल्ह्यात मतदानाचा टक्का वाढावा याकरीता मुक्ती फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री. मुकुंद गोसावी, श्रीमती मिनाक्षीताई निकम यांची दिव्यांग मतदारांचे जिल्हा आयकॉन म्हणून नियुक्ती केली होती. त्यांच्यामार्फतही जिल्ह्यात चांगल्या प्रकारे जनजागृती करण्यात आल्याने दिव्यांग मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदान प्रक्रियेत सहभाग घेऊन आपले मतदानाचे कर्तव्य पार पाडले.