<
जळगांव, दि. 26 (प्रतिनिधी) – आनंदाची उधळण करत येणारा, प्रत्येक घराघरात चैतन्य देणारा सण म्हणजे दिवाळी. या उत्सवाच्या काळात प्रत्येक जण आपलं घर, परिसर उजळण्यासाठी कार्यरत असतो. मंगलदायी असणारा हा सण बाजारपेठेत चैतन्य आणतो. विविध प्रकारची खरेदी करण्यासाठी नागरिकांची पावले बाजारपेठेकडे वळतात. या दिवाळी सणाच्या काळात शहरातील महापुरूषांची पुतळे, चौक, उद्याने हे विद्युत रोषणाईने उजळावी यासाठी गेल्या दोन वर्षांपासून भवरलाल आणि कांताबाई जैन फाउण्डेशन यांच्यावतीने आकर्षक रोषणाई करण्यात येते.
या काळात लाल बहादूर शास्त्री, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, जवाहरलाल नेहरू, छत्रपति शिवाजी महाराज, महात्मा गांधी, विनायक सावरकर आदि महापुरुषांच्या पुतळ्यांवर अत्यंत आकर्षक व देखणी रोषणाई करण्यात आली आहे. यासह जळगावची ओळख असलेले शास्त्री टॉवर तसेच महात्मा गांधी उद्यान आणि भाऊंच्या उद्यानाचा परिसर सुशोभित करण्यात येऊन विविधरंगी रोषणाई करण्यात आली आहे. प्रेरणा देणाऱे महापुरूषांचे पुतळे या दीपोत्सवात रोषणाईने अधिकच प्रेरणादायी वाटतात.
वर्षभर विविध औचित्याच्या निमित्ताने जैन इरिगेशन सिस्टिम्स् लि. व भवरलाल आणि कांताबाई जैन फाउण्डेशन यांच्यावतीने काव्यरत्नावली चौक सुंदर, आकर्षक संदेश देणाऱ्या फलकांद्वारे सुशोभित करण्यात येतो. दीपावलीच्या या पर्वातही काव्यरत्नावली चौकात दीपोत्सवाच्या अनुषंगाने आकर्षक, सुंदर संदेशासह फलक लावण्यात आले असून या चौकाच्या चारही बाजूला देखणे आकाश कंदील लावण्यात आल्याने हा चौक रोषणाईने न्हाऊन निघालेला आहे.