<
जिथे तरुणाईला आपले मन मोकळे करता येईल आणि कुठलीही भीती न बाळगता मदत मागता येईल! अन हे ही संपुर्णतः गोपनीय आणि नि:शुल्क ….
“लग्नाआधी शारीरिक जवळीक झालेली चालते का? मला ते नकोसं वाटतं, आपण अजून तयार नाही वाटत. मात्र त्याची सतत चिडचिड होते. तो रुसतो. म्हणतो तुझं माझ्यावरती प्रेमच नाहीये. दिवसदिवस बोलत नाही. सारखा संशय घेतो. म्हणतो तुझा दुसरा कोणीतरी असणार. मी काय करावं?”
“आमच्या दोघांचं एकमेकांवर खरंखरं प्रेम होतं. टाईमपास नाही की कॅज्युअल नाही. एकमेकांच्या शपथा घेतलेल्या होत्या. पण शेवटी त्याची आई नाही म्हणाल्यावर तो फिरला. सगळं विसरला. 1 वर्ष झालं त्याचं लग्न होऊन, तरी अजून मधूनच रडायला येतं. मित्र-मैत्रिणी म्हणाल्या तो वाईटच होता, त्याला अक्कल नव्हती, तो भित्रा होता. पण मला त्याची आठवण येते, हातातलं काम गळून पडतं त्याचं काय करू?”
“नाते सुरु होण्याआधी आमची खूप घट्ट मैत्री होती. पण नाते सुरु झाल्यानंतरच्या सहा महिन्यांमध्ये तिने मला सारखे-सारखे मेसेजेस पाठवणे व माझी खबर ठेवणे सुरु केले. रोजच्यारोज भेटण्यासाठी तिचा आग्रह सुरु झाला आणि मला माझ्या मित्रांसमवेत संध्याकाळ घालवायची असल्यास धुसफूसही सुरु झाली. मला या सगळ्याचा त्रास होतो आहे मात्र याविषयी काय करावे ते कळत नाही?”
लैंगिकता आणि मन यांचा एकमेकांशी अगदी जवळचा संबंध आहे, हे आपल्याला सर्वांना माहीत आहेच. विशेषतः वयात येण्यापासून आपण ते अनुभवलेले आहे. तरीही लैंगिक स्वास्थ्य आणि मानसिक स्वास्थ्य, या दोन गोष्टी नेहमी वेगवेगळ्या ठेवून त्यांच्याकडे पाहिले जाते. खरे पाहता, त्या एकच जरी नसल्या तरीदेखील एकमेकींवर कमालीचा परिणाम करणार्या आहेत आणि आपले आरोग्य चांगले राहावे याकरिता दोन्हींमध्ये निरोगी संतुलन असणे आत्यंतिक गरजेचे आहे. या दोन्हींबद्दल मात्र खुलेपणाने बोलण्याची, चर्चा करण्याची आणि वेळ पडल्यास मदत मागण्याची मुक्त मुभा आपल्या समाजात असल्याचे दिसत नाही.
मानसिक आणि लैंगिक स्वास्थ्यासाठी मदत मागणे, हे आपल्याकडे अजून तितकेसे रूढ नाही. स्वास्थ्यासाठी मदत वा उपचार घेतले जातात, ते एखादा मोठा आजार झाल्यावरच. आपले दैनंदिन ताणतणाव व प्रश्न याविषयी बोलणे हेदेखील आपल्या स्वास्थ्यामध्येच येते, याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यास बऱ्याचदा कमी लेखले जाते; पण अशी मदत कुठेच उपलब्ध नसण्याचे परिणाम वाटतात तितके साधे नाहीत. हा ताण मात्र बऱ्याचदा नियंत्रणाबाहेर असू शकतो, त्यातून बाहेर पडण्यासाठी खूप काळ लागू शकतो आणि त्यातून स्वतःचे स्वतः बाहेर पडता येतेच, असे नाही. अशावेळी मोकळेपणाने मदत मागणे-देणे आणि मानसिक व लैंगिक स्वास्थ्याभोवती निर्माण झालेले निषिद्धतेचे, गूढतेचे आणि गुप्ततेचे वलय मोडून काढणे अत्यंत गरजेचे आहे.
‘नेस्टस् फॉर युथ’ हा तोच प्रयास आहे, जिथे तरुणाईला आपले मन मोकळे करता येईल आणि कुठलीही भीती न बाळगता मदत मागता येईल!
प्रयास आरोग्य गट, पुणे आणि ब्रिस्टलकोन इंडिया यांच्या सहयोगाने ‘नेस्टस् फॉर युथ’ या उपक्रमाची सुरुवात झालेली आहे. नेस्टस् फॉर युथ ही जागा तरुणाईला स्वतःच्या हक्क-जबाबदारीची जाणीव करून देणारी, आपल्या प्रश्नाचे स्वरूप समजून ते स्वतःचे स्वतः सोडवता यावेत, यासाठी मदत करणारी आहे. वेळ पडल्यास वैद्यकीय मदत कुठे आणि कशाप्रकारे मिळू शकेल, याचीही माहिती इथे मिळते.
18 ते 40 या वयोगटातील कुठलीही व्यक्ती या उपक्रमात भाग घेऊ शकते. भेटीची वेळ अगोदर ठरवून, पुण्यातील डेक्कन कॉर्नर येथे असणाऱ्या प्रयास आरोग्य गटाच्या कार्यालयात येऊन ‘नेस्टर’ची भेट घेऊ शकते. आपल्या मनातील सर्व प्रश्न विचारू शकते आणि मन मोकळे करून बोलू शकते. एक तरुण संवेदनशील नेस्टर त्यांच्या मदतीस तत्पर असेल. या भेटी संपुर्णतः गोपनीय आणि नि:शुल्क असतील. तुम्ही भेटीची वेळ ठरवण्यासाठी 7775004350 या क्रमांकावर संपर्क करू शकता.
प्रयास आरोग्य गटाबाबत व ज्या संशोधनातुन नेस्टरची कल्पना साकार झाली त्याबाबत अधिक जाणून घेण्यासाठी खालील लिंकला भेट द्या. http://www.prayaspune.org/health/ http://www.prayaspune.org/health/index.php/ongoing-research/216-yit.html
‘स्रोत- तथापि ट्रस्ट निर्मित Let’s Talk Sexuality – सेक्स आणि बरंच काही’