तालुक्यात खर्या लाभार्थ्यांना उघड्यावर राहण्याची वेळ
जळगांव-(विशेष प्रतिनिधी) -तालुक्यातील अनेक गावांमध्ये विविध घरकुलातील लाभार्थ्यांना कागदपत्रांची योग्य पुर्तता न करता तसेच आवश्यक तपासणी न करताच रमाई, शबीर या योजनांतील घरकुलांचे वाटप होत असल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे जळगांव पंचायत समिती आंधळी झाली की काय असे वाटू लागले आहे. कारण सदर प्रकारांमुळे खरे लाभार्थ्यी लाभापासून वंचित झाले असल्याच्या तक्रारी अनेक सामाजिक कार्यकर्ते करीत आहेत.
दरम्यान, शासनाने प्रत्येक गरजू व्यक्तीला पक्के घर देण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र सदर योजना राबवितांना जळगांव पंचायत समितीकडून नियमांचं उल्लंघन झाल्याचे बोललं जात आहे. सदर योजनेतील लाभार्थ्यांची खरी वस्तुस्थिती न बघता आलेले कागदपत्रं न तपासता तसेच अपुरे कागदपत्रांच्या आधारे गरज नसलेल्या लाभार्थ्यांना सदर योजनेत सामिल केले जात असून अशा बोगस लाभार्थ्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी जोर धरत आहे.
जागेवर जावून पडताळणीची गरज सदर लाभार्थी हा खरच गरजू आहे का? योजनेच्या सर्व नियमांमध्ये तो बसतो का? याची शहानिशा करणे गरजेचे आहे. ग्रामपंचायतीने दिलेल्या कागदपत्रांच्या आधारावर घरकुल वाटप केले जातेय हे खरं आहे, मात्र हाच योग्य लाभार्थी आहे का? याची शहानिशा करण्यासाठी स्पोट व्हेरिफीकेशन गरजेचं मानलं गेलं आहे. या सर्व प्रकाराकडे पं.स.कडून दुर्लक्ष होतांना दिसत आहे.
अशा लाभार्थ्यांवर गुन्हा दाखल करावा खोटे कागदपत्रं देणं, शासनानाला चुकीची माहिती भरुन देणं हा गुन्हा आहे. असे प्रतिज्ञापत्र देखील लाभार्थ्यांकडून भरुन घेतलं जातं मात्र वेळ आल्यावर कोणतीही कारवाई होत नाही. म्हणून शासनाची फसवणुक करणार्या अशा बोगस लाभार्थ्यांवर थेट गुन्हे दाखल करण्याची मागणी काही समाजिक कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.