<
जळगाव – महाराष्ट्रातील महिला बचत गटांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणे, महिला उद्योजकांची संख्या वाढविण्यासाठी हिरकणी- नवउद्योजक महाराष्ट्राची हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. महिलांमध्ये असलेल्या कल्पना, महिलांना आर्थिक स्वातंत्र्य व राज्याच्या विकासात सहभाग देण्यासाठी हिरकणी-नवउद्योजक महाराष्ट्राची या स्पर्धेमुळे महिलांना हक्काचे व्यासपीठ मिळणार आहे. हिरकणी-नवउद्योजक महाराष्ट्राची या योजनेंतर्गत जळगाव जिल्ह्यातील महिला बचतगटांच्या सदस्यांना, महिलांच्या कल्पनांना व्यासपीठ उपलब्ध करुन दिले जाणार असून प्रत्येक तालुकास्तरावर शिबिरांचे आयोजन करण्यांत येऊन त्यातून निवड झालेल्या उत्कृष्ट महिला बचत गटांना जिल्हास्तरीय कल्पना सादरीकरण करण्यासाठी संधी मिळणार आहे.महाराष्ट्र राज्य नाविन्यपूर्ण स्टार्ट-अप धोरण 2018 च्या अनुषंगाने राज्यातील महिला बचत गटांना स्टार्ट-अपच्या माध्यमातून उद्योजक बनण्यास प्रोत्साहित करणे हा मुख्य उददेश आहे. यात प्रामुख्याने राष्ट्रीय ग्रामीण जीवन्नोती अभियान (एनआरएलएम), राष्ट्रीय शहरी जीवन्नेाती अभियान (एनयूएलएम) व महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) अंतर्गत किमान एक वर्षापूर्वी स्थापन करण्यांत आलेले व राष्ट्रीय जीवन्नोती अभियानातील पंचसूत्री / दशसूत्रीचे पालन करणारे महिला बचत गट या योजनेचे लाभार्थी असतील.तालुकास्तरीय गट निवडतांना आरोग्यसेवा, कृषि, तंत्रज्ञान, सामाजिक प्रभाव, पर्यावरण आणि स्थिरता या क्षेत्रात नाविन्यपूर्ण संकल्पनांचे सादरीकरण करणे अपेक्षित आहे. संपूर्ण जिल्ह्यात तालुकास्तरावर तहसिलदार यांचे अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय समितीची स्थापना करण्यांत आलेली आहे. योजनेच्या तालुकास्तरीय जनजागृती, प्रचार, प्रसार व प्रसिध्दीसाठी 23 व 24 जुलै, 2019 असे दोन्ही दिवस तालुकास्तरीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तद्नंतर हिरकणी-नवउद्योजक महाराष्ट्राची कार्यक्रमात सहभागी झालेल्या महिला बचत गटांसाठी नाविन्यपूर्ण संकल्पना प्रदर्शित करण्यासाठी तालुकानिहाय30 व 31 जुलै, 2019 रोजी मंच उपलब्ध करुन दिला जाईल. महिला बचत गटांव्दारा सादर होणा-या नाविन्यपूर्ण संकल्पनांचे तालुकास्तरीय समितीव्दारे परीक्षण करण्यांत येईल. समितीच्या परीक्षणाअंती निवडयोग्य ठरलेल्या नाविन्यपूर्ण संकल्पनांमधून उत्कृष्ट नाविन्यपूर्ण संकल्पनांची प्रत्येक तालुक्यातून 10 याप्रमाणे संपूर्ण जिल्ह्यातून एकूण 150 महिला बचत गटांची निवड करण्यांत येईल. प्रत्येक तालुक्यातून निवड केलेल्या उत्कृष्ट संकल्पना प्रत्यक्ष साकारण्यासाठी आणि आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी प्रत्येक प्रकल्पास 50 हजार रुपयांच्या मर्यादेत अर्थसहाय्य करण्यात येईल. या निवड झालेल्या 150 महिला बचत गटांना त्यांचे नाविन्यपूर्ण संकल्पना प्रदर्शित करण्यासाठी जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या जिल्हास्तरीय समितीच्या परीक्षणाअंती निवडयोग्य ठरलेल्या नाविन्यपूर्ण संकल्पनांमधून निवड केलेल्या उत्कृष्ट 10 महिला बचत गटांना उत्कृष्ट संकल्पना प्रत्यक्ष साकारण्यासाठी आणि आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी प्रत्येक प्रकल्पास दोन लाख रुपयांच्या मर्यादेत अर्थसहाय्य करण्यात येईल. जिल्हास्तरीय मंचावर नाविन्यपूर्ण संकल्पना प्रदर्शित करण्यासाठी 6 व 7 ऑगष्ट, 2019 रोजी जळगांव येथे नियोजन हॉल/अल्पबचत भवन या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. जिल्हास्तरीय मंचावर नाविन्यपूर्ण संकल्पना प्रदर्शित करण्यासाठी तालुकास्तरावर निवड केलेल्या महिला बचत गटांना रु.2 हजार 500 च्या मर्यादेत प्रोत्साहन भत्ता अदा करण्यात येईल. असे श्रीमती अनिसा तडवी, सहाय्यक संचालक, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगांव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.