<
चाळीसगाव-(किरण पाटील)- महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील रस्त्यांची अत्यंत दुर्दशा झाली असून गेली कित्येक दिवसांपासून ग्रामीण जनता या खराब झालेल्या रस्त्यांवरून वावरत आहे, याचा मोठा त्रास त्यांना सहन करावा लागत आहे. भारतास स्वातंत्र्य मिळून कित्येक वर्षे झाली मात्र अजूनही ग्रामीण रस्त्यांच्या विकासाकडे पाहिले जात नाही. राज्यात महामार्गाच्या रस्त्यांचा चांगल्या प्रकारे विकास होताना दिसत आहे हे खरे आहे यात शंका नाही, मात्र महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील रस्त्यांची खूप मोठी दुर्दशा झालेली असून यामुळे स्थानिक लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. गेल्या कित्येक दिवसापासून ग्रामीण भागातील रस्त्यांचा विकास खुंटला आहे. वीस-पंचवीस किलोमीटर पर्यंत या रस्त्यांची दुरवस्था पाहायला मिळत आहे. सर्व रस्ते उधडलेल्या अवस्थेत आहेत. ग्रामीण भागात रस्त्यांची समस्या गंभीर स्वरूपाची आहे. परिसरातील अनेक गावांना जोडणाऱ्या रस्त्यांची दैनावस्था होऊन त्यावरून जाणे म्हणजे तारेवरची कसरत झाली आहे. गावामधील अंतर्गत रस्तेही उखडून माती बाहेर आली आहे तर काही ठिकाणी खड्डे तयार झालेत. त्या रस्त्यांना अधूनमधून मुरूमाची मलमपट्टी करण्याची प्रक्रिया सुरू असते. तर काही ठिकाणी तेही दिसत नाही. खड्यांच्या ठिकाणी वापरण्यात आलेला मुरूमही कमी प्रतीचा असतो म्हणून पावसाच्या पाण्यात रस्तेच वाहून जातात मग परिस्थिती ‘जैसे थे’ होते. अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे, ती सायगाव ते टाकळी प्र दे या एकूण १० किमी रस्त्याची. हा रस्ता पुर्ण उखडला गेला असून त्याला मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. अत्यंत दुर्दैवी अशी अवस्था या रस्त्याची झाली आहे. या रस्त्यावर खड्डे चुकवताना लहान मोठे अपघात होत असल्याने या रस्त्यावरून जाताना लोकांना आपला जीव हा मुठीत घेऊन जाव लागत आहे. येथील लोकांना मणक्याचे, पाठदुखीचा, कमरेचा त्रास हा सहन करावा लागत आहे. मात्र बांधकाम विभाग याकडे डोळे बंद करून बसले आहे. याकडे बांधकाम विभागाने गांभीर्याने लक्ष द्यावे व रस्त्याची दुरुस्ती लवकरात लवकर करावी अशी मागणी स्थानिक नागरिक, वाहन धारक, प्रवाशी यांच्याकडून होत आहे. तसेच यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात यावी, असे येथील स्थानिक नागरिकांना वाटू लागले आहे.