<
विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासासाठी रावेर पंचायत समिती शिक्षण विभागाचा निर्णय
रावेर(प्रतिनीधी)- येथील पंचायत समिती शिक्षण विभागामार्फत जिल्हा परिषदेच्या शाळेत आठवड्यातून दोन दिवस सामुदायिक कवायत नियमित घेण्याची सूचना शाळांना देण्यात आली आहे.विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासासाठी व विद्यार्थ्यांच्या अंगी शिस्त, स्वच्छता, व्यायामाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आल्याचे गटशिक्षणाधिकारी विजय एस. पवार यांनी सांगितले. रावेर तालुक्यात शिक्षण विभाग अंतर्गत चौदा केंद्रातील एकूण १४९ शाळांना यात सहभागी करण्यात आले असून सुमारे पंधरा हजार विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळत आहे. बैठे कवायत पाच प्रकार आणि उभे कवायत आठ प्रकार यामध्ये विद्यार्थ्यांकडून करून घेण्यात येत आहे. सामुदायिक कवायत उपक्रम नियमित व उत्कृष्ट पद्धतीने राबविणाऱ्या शाळांचा प्रजासत्ताक दिनी गौरव करण्यात येणार असल्याची माहिती रावेर पंचायत समिती शिक्षण विभागातून देण्यात आली आहे. यासाठी शिक्षण विस्तार अधिकारी नवाज तडवी, शिक्षण विस्तार अधिकारी नईम शेख आणि सर्व केंद्र प्रमुख यांचे सहकार्य लाभले.