<
जळगाव – (प्रतिनिधी) – येथील विवेकानंद प्रतिष्ठान संचलित इंग्लिश मीडियम स्कूलच्या शिक्षिका सौ. रत्नमाला विरेश पाटील यांना समाजकार्य विषयातून नुकतीच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडून पीएच.डी पदवी प्रदान करण्यात आली.
सौ. रत्नमाला पाटील यांनी एच.डी संशोधनासाठी देशभरातील आणि विशेषतः महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात गाजलेला परंतु ज्वलंत अशा “ थकीत गुंतवणुकीमुळे ज्येष्ठ नागरिकांवर होणाऱ्या आर्थिक आणि सामाजिक परिणामांचे अध्ययन ” ( विशेष संदर्भ : जळगाव जिल्ह्यातील नागरी सहकारी पतसंस्था ) या विषयावर संशोधन पूर्ण केले त्यांना जळगाव येथील लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. उमेश वाणी यांचे मार्गदर्शन लाभले.
सौ. रत्नमाला पाटील यांनी केलेले संशोधन हे जळगाव जिल्ह्यातील नागरी सहकारी पतसंस्थांमध्ये गुंतवणूक केलेल्या ज्येष्ठ नागरिक आणि तसेच त्यांचे कुटुंबीय व नातेवाईक यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा, आपुलकीचा आणि जिव्हाळ्याचा होता. जळगाव जिल्ह्यात गेल्या १० ते १२ वर्षात अनेक पतसंस्था डबघाईस आल्या होत्या. आयुष्यभराची जमा केलेली आर्थिक पुंजी ज्येष्ठ नागरिकांनी पतसंस्थांमध्ये गुंतवणूक केल्याने व त्या पतसंस्थांमधे गैरव्यवहार झाल्याने व अनियमितीमुळे अनेक पतसंस्था या आजारी पडल्या काही बंद पडल्या, त्यामुळे ठेवीदारांच्या आर्थिक जीवनावर व पर्यायाने सामाजिक जीवनावर देखील त्याचे दूरगामी व प्रतिकूल परिणाम पाहावयास मिळाले. या ठेवी ठेवल्या मागे ठेवण्यामागे ज्येष्ठ नागरिकांचे भविष्यातील नियोजन अवलंबून होते त्यात त्यांच्या मुलींचे लग्न, मुलांचे शिक्षण, म्हातारपण आजारपण स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न इत्यादी सारख्या बाबींचा विचार होता परंतु पतसंस्थांमधील घोटाळ्यामुळे / पतसंस्था बंद पडल्यामुळे उपरोक्त बाबींवर अतिशय वाईट परिणाम झाल्याचे वास्तव सौ. रत्नमाला पाटील यांनी आपल्या संशोधनातून मांडले आहे. हक्काचा पैसा पतसंस्थांमध्ये अडकून पडल्याने मुलं शिक्षणापासून वंचित राहिले, मुलींची लग्न थांबली मानसिक खच्चीकरण झाले. एकटया जळगाव जिल्ह्यात ४९ ठेवीदारांचे आर्थिक सामाजिक व मानसिक धक्क्याने निधन झाल्याचे संशोधनातून समोर आले आहे.
सौ. रत्नमाला पाटील यांनी सदर संशोधनासाठी जळगाव जिल्ह्यातील १५ तालुक्यातील तालुक्यातील ८६६ पतसंस्थापैकी अडचणीत असलेल्या १७८ पतसंस्थांमधील ३०० ज्येष्ठ नागरिकांचा नमुना म्हणून अभ्यास केला. सदर अध्ययनासाठी संशोधिकेने उपनिबंधक कार्यालय, ग्राहक मंच न्यायालय, ठेवीदार संघटना यांचेशी स्वतः प्रत्यक्ष संपर्क साधून ज्येष्ठ नागरिकांशी चर्चा / संवाद करून माहितीचे संकलन केले. सदर माहितीच्या आधारे संशोधनातून आलेले निष्कर्ष हे समस्येची वास्तवता व त्यातून ज्येष्ठ नागरिकांना सामोर जावे लागणाऱ्या आर्थिक व सामाजिक परिणामांचा यथायोग्य उहापोह केला आहे. संशोधनातील बहुतांश ज्येष्ठ नागरिक हे ६६ ते ७० वयोगटातील असून या वयात त्यांना भयावह परिणामांना सामोरे जावे लागल्याचे अध्ययनातुन स्पष्ट झाले आहे. थकीत गुंतवणूक करणारे ३६.१ ज्येष्ठ नागरिक हे ग्रॅज्युएट आहेत हे विशेष. व त्यापैकी जवळपास ८६ प्रतिशत जेष्ठ नागरिक हे सेवानिवृत्त, छोटा-मोठा व्यवसाय करणारे, शेतकरी व शेतमजूर आहेत त्यामुळे त्यांच्या आर्थिक व सामाजिक जीवनावर झालेल्या प्रतिकूल परिणामांचे चित्रण संशोधिकेने आपल्या संशोधनातून मांडले आहे. संशोधनातील ३९ प्रतिशत ठेवीदारांचा पतसंस्थेतील आर्थिक गुंतवणुकीमुळे कुटुंबात वादविवाद, चिडचिडेपणा, ताणतणाव होतात व त्यामुळे मानसिक समस्या निर्माण झाल्याचे संशोधनातून पुढे आले आहे. सदर संशोधनातील बहुतांश उत्तरदात्यांकडून म्हणजे ५६ प्रतिशत निवेदकांच्या मते त्यांना पत्संस्थेत गुंतविलेल्या रकमेपैकी काही रक्कम परत मिळाली नाही असे निर्दशनास आले आहे. ७८ प्रतिशत ज्येष्ठ नागरिकांनी ठेवी परत मिळण्यासाठी तक्रार करून देखील त्यांना ठेवी परत मिळाले नसल्याचे व न्याय मिळाला नसल्याचे अध्ययनातून स्पष्ट झाले तसेच शासनाकडून देखील कोणतेही आर्थिक साहाय्य मिळाले नसल्याचे सत्य समोर आले आहे, मात्र विविध संघटनांचा नैतिक व मानसिक आधार व पाठिंबा प्राप्त झल्याचे संशोधनातून समोर आले आहे.
सौ. रत्नमाला पाटील यांचे सदर विषयावरील संशोधन हे वास्तवदर्शी तर आहेच परंतू सदर संशोधनातून पुढील आर्थिक धोरण निश्चित करणेसाठी शासन, सहकार विभाग, बँका यांना देखील महत्वाचे ठरणारे असे आहे. सदर विषयाशी संबंधित अधिकारी, कर्मचारी व वाणिज्य व व्यवस्थापन विभागातील जाणकार, समाजशास्त्रज्ञ, मानसशास्त्रज्ञ, अर्थतज्ञ यांचेसाठी महत्त्वपूर्ण आहे. संशोधिकेने सदर संशोधन पूर्ण झाले असे न मानता सदर बाबतीत पुढील पाठपुरावा देखील करणार असल्याचे त्यांनी आपल्या संशोधनातून मांडले आहे.
सौ. रत्नमाला पाटील यांच्या या यशाबद्दल कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रोफेसर पी.पी. पाटील, प्र-कुलगुरू पी. पी. माहुलीकर, डॉ. अमूलराव बोरसे, डॉ. ए. बी. चौधरी, सौराष्ट्र विद्यापीठाचे डॉ. रमेश वाघाणी, डॉ. विष्णू गुंजाळ, डॉ. संभाजी देसाई, श्री. दुर्योधन साळुंखे यांनी अभिनंदन केले.