<
चौधरीवाड्यातील बहिणाई स्मृती संग्रहालयात 68 वास्मृतीदिन साजरा
जळगाव-(प्रतिनिधी) – आपल्या जीवनातील प्रत्यक्ष अनुभव लेखक, कवी, साहित्यिक सातत्याने मांडतो. ते जीवनाचे साहित्य होते. अनुभवातून आलेले साहित्य इतरांना आपले स्वत:चे अनुभव वाटतात. त्याला आत्मकेंद्रीत साहित्य म्हणावे. जीवनाचे गणित सुकर-सुलभ पध्दतीने मांडणाऱ्या खान्देश कन्या कवयित्री बहिणाबाईं चौधरी यांचे साहित्य हे विश्वाशी नाते सांगणारे आहे. असे मनोगत ज्येष्ठ साहित्यिक प्रा. बी. एन. चौधरी यांनी व्यक्त केले.
बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्टतर्फे जळगाव येथील चौधरी वाड्यातील बहिणाई स्मृती संग्रहालयात बहिणाईंच्या 68व्या स्मृती दिनानिमीत्त त्यांना वंदन करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी प्रा. बी. एन. चौधरी बोलत होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून साहित्यिक डॉ. संजीवकुमार सोनवणे, बहिणाबाई चौधरी यांच्या नातसुन पद्माबाई चौधरी उपस्थित होते. बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्टचे विश्वस्त ज्योती जैन, स्मिता चौधरी, दिनानाथ चौधरी, विलास हरी चौधरी, पोलिस पाटील प्रभाकर पाटील, कैलास चौधरी, किरण चौधरी, प्रकाश चौधरी, रंजना चौधरी, इंदुबाई चौधरी, शोभाबाई चौधरी, लक्ष्मीबाई चौधरी, कांचन चौधरी, वैशाली चौधरी यांच्यासह चौधरीवाड्यातील रहिवासी उपस्थित होते. अनुभूती इंटरनॅशनल रेसिडेंशियल स्कूलचे इयत्ता 8वीचे विद्यार्थी शिक्षक परशुराम माळी यांच्यासह उपस्थित होते. विद्यापीठ सिनेट सदस्या मनिषा चौधरी, प्रज्ञा नांदेडकर, अनुभूती स्कूलचा विद्यार्थी तेजेस जैन, प्रकाश पाटील यांनी बहिणाईंच्या कविता सादर करून स्मृती जागवल्या. तर आर्टिस्ट विजय जैन, बालसाहित्यीक गिरीष पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा. बी. एन. चौधरी यांनी ‘मन वढाय वढाय’ ही कविता लयीत सादर करून प्रभावी सादरीकरण कसे असावे याचे प्रात्यक्षिक दिले.
बोलीभाषा समृद्ध करणारे साहित्य – डॉ. संजीवकुमार सोनवणे
साहित्य क्षेत्रात नवनवीन प्रयोग होत असतात. परंपरा बदलत गेल्या. परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. परंतु मातीतुन बहिणाबाई चौधरी यांचे साहित्य फुलले. ते शाश्वत आहे. मौखिक साहित्याचे त्या कुलगूरू असुन बोलीभाषा समृद्ध करणारे त्यांचे साहित्य हे दिशादर्शक आहे असे मनोगत डॉ. संजीवकुमार सोनवणे यांनी व्यक्त केले. चौधरी वाड्यातील शंकर हरी चौधरी, कमल कडु चौधरी यांचे गेल्या आठवड्यात निधन झाले त्यांच्या स्मृतींना वंदन करून आरंभी मान्यवरांच्या हस्ते बहिणाईंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे समन्वयन अशोक चौधरी, किशोर कुळकर्णी, देवेंद्र पाटील यांनी केले. यशस्वीतेसाठी राजु हरिमकर, प्रदीप पाटील, दिनेश थोरवे, यांच्यासह चौधरी परिवारातील सदस्यांनी सहकार्य केले. किशोर कुळकर्णी यांनी सुत्रसंचालन केले. विनोद रापतवार यांनी आभार मानले.
बहिणाई स्मृती संग्रहालयाची वैशिष्ट्ये
जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलालजी जैन यांच्या संकल्पनेतून भवरलाल अँण्ड कांताबाई जैन फाउंडेशनतर्फे जळगावच्या चौधरी वाड्यातील बहिणाबाईंच्या घराचे रूपांतर संग्रहालयात झालेले आहे. बहिणाबाई चौधरी यांच्या रोजच्या वापरातील शेतीची अवजारं, स्वयंपाकाच्या वस्तू, भांडी, पुजेचं साहित्य ह्यांची जपवणूक केली आहे. हा अलौकिक ठेवा पुढील पिढीला पाहता येत आहे. ‘अरे संसार संसार’ म्हणत संसारातील सुख दुःखांच्या साक्षीदार असलेल्या अनेक गोष्टी या संग्रहालयात बघायला मिळतात. याठिकाणी अनेक साहित्यीक व साहित्यावर प्रेम करणाऱ्यांनी भेटी देऊन स्मृतींचा जागर केला.