<
देशातील सर्वात मोठा शैक्षणिक क्षेत्रातील समृद्ध करणारा निष्ठा हा प्रशिक्षणाचा कार्यक्रम
एरंडोल(प्रतिनीधी)- येथील एकात्मिक विकास कार्यालयाच्या सभागृहात पाच दिवसीय निष्ठा प्रशिक्षण पहिल्या टप्प्याला आज ३० रोजी उत्साहात सुरुवात झाली. डायट जळगाव प्राचार्य डॉ.मंजुषा क्षीरसागर, प्रशिक्षणाचे जिल्हा समन्वयक डायट जळगाव चे ज्येष्ठ अधिव्याख्याता डॉ.राजेंद्र महाजन, शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, आदींनी या प्रशिक्षणाचे जिल्हास्तरावर नियोजन केले असून त्यांचे मार्गदर्शनात जिल्हाभरातील प्रशिक्षण प्रत्येक तालुक्यात राबविण्यात येणार आहे. एरंडोल येथे आज पासून सुरू झालेल्या पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षणाचे प्रस्ताविक डायट चे विषय तज्ञ भटू पाटील यांनी केले. प्रशिक्षण च्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात अध्यक्ष तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी विश्वास पाटील होते. यावेळी केंद्रप्रमुख रवींद्र लाळगे,नारायण बोरसे, सुनील महाजन, आदींची उपस्थिती होती. प्रशिक्षणाचे तालुका स्तरावर संपूर्ण नियोजन केलेले असून तालुक्यातील पहिली ते आठवी पर्यंत शिकविणाऱ्या शंभर टक्के शिक्षकांना टप्प्याटप्प्याने निष्ठा अंतर्गत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षण देण्याचे काम तालुक्यातील शिक्षक व प्रशिक्षण पूर्ण करून आलेले राकेश पाटील, राजेश सोनवणे, सुशील कुमार माळी, ललित कुमार पाटील, मनीषा पाटील, भटू पाटील आदी एरंडोल तालुका स्तरावर करत असून मोठ्या स्वरूपात सुरू झालेल्या या प्रशिक्षणा विषयी यावेळी प्रशिक्षणार्थी शिक्षकांमध्ये कुतूहल व चैतन्य होते. निष्ठा नावाने सुरुवात करण्यात आलेल्या केंद्र सरकारच्या माध्यमातून हे प्रशिक्षण पहिली ते आठवीपर्यंत शिकवणाऱ्या सर्व मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांना देण्यात येणार आहे. मुख्याध्यापक आणि शिक्षक यांच्या समग्र प्रगतीसाठी राष्ट्रीय पुढाकार घेण्यात येईल राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राष्ट्रीय शिक्षण संशोधन व प्रशिक्षण परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक प्रशिक्षण संच विकसित करण्यात आले असून शालेय शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी क्षमता बांधणी करणारा हा कार्यक्रम आहे असे यावेळी बोलताना एरंडोल तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी विश्वास पाटील म्हणाले. शिक्षक मुख्याध्यापक यामध्ये कार्यक्षमता निर्माण करणे हे निष्ठा चे ध्येय आहे. अशी माहिती एरंडोल तालुक्याचे शिक्षण विस्ताराधिकारी जे डी पाटील यांनी दिली. अध्यापन शास्त्रशुद्ध पद्धतीने पूर्ण करणे इत्यादी बाबत एकात्मिक पद्धतीने हे प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे केंद्र प्रमुख रवींद्र लांलगे यांनी म्हटले. या देशव्यापी प्रशिक्षण कार्यक्रमाची आखणी मानव संसाधन विकास मंत्रालय आणि राष्ट्रीय व राज्य स्तरावर राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली आणि राज्य स्तरावर राज्य शैक्षणिक व संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र द्वारा संपूर्ण नियोजन अनुक्रमे देश व राज्य स्तरावर करण्यात आले आहे. या निष्ठा प्रशिक्षण संदर्भात बोलताना विविध प्रशिक्षणात यापूर्वी राज्य, जिल्हा, तालुकास्तरावर कार्य करणारे व तालुक्यातील एरंडोल तालुका स्तरीय निष्ठा प्रशिक्षणातील सहभागी प्रशिक्षणार्थी तथा राज्य शासनाच्या आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक किशोर पाटील कुंझरकर म्हणाले की, एकाच वेळी देशातील शिक्षकांना तसेच मुख्याध्यापक केंद्रप्रमुख जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे अधिकारी विषय सहाय्यक विषय साधन व्यक्ती तसेच राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद अधिकारी या सर्वांना समृद्ध करणारा हा शिक्षकांसाठी निष्ठा प्रशिक्षणाचा देशातील अतिशय महत्त्वाचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम शिक्षण व्यवस्थेतील सर्वात मोठा प्रशिक्षणाचा नाविन्यपूर्ण व महत्त्वपूर्ण व कालसुसंगत उपक्रम आहे. देशातील ४२ लाख शिक्षकांना प्रशिक्षण या माध्यमातून दिले जाणार असून राज्यातील एकूण दोन लाख ५५हजार ८२३ शिक्षक व शाळा प्रमुख यांना अध्ययन निष्पत्ती व इतर विविध विषयांच्या अनुषंगाने कृतीयुक्त प्रशिक्षण देण्याचे कार्य या माध्यमातून सुरू झाले आहे. राज्याला व सर्व शिक्षकांना गुणवत्तेच्या दिशेने पाऊल टाकण्यासाठी अधिक समृद्धपणे गुणवत्तेचा आलेख उंचावून विद्यार्थी व शाळांचा विकास होण्यासाठी निष्ठा प्रशिक्षण महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचेही सहभागी प्रशिक्षणार्थी तथा शिक्षक संघटनांच्या राज्य समन्वय समितीचे राज्य समन्वयक किशोर पाटील कुंझरकर म्हणाले.