<
पुसद-(प्रतिनीधी) – तालुका विधी सेवा समिती व वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा 9 जानेवारी 2020 ते 15 जानेवारी 2020 या पंधरा दिवसाच्या कालावधी मध्ये तालुका विधी सेवा समितीच्या माध्यमातून पुसद तालुक्यातील विविध ठिकाणी कार्यक्रम होत असुन त्याच अनुषंगाने आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह पुसद येथे हा कार्यक्रम घेण्यात आला. तेथे विद्यार्थ्यांना लोप पावत असलेली मराठी भाषा आणि मराठी भाषेचे संवर्धन कसे करायचे त्यासंदर्भात माहिती सांगण्यात आली.
मराठी भाषा संवर्धन पंधरवडा कार्यक्रमात वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी आपआपले मत व्यक्त केले. सध्या बालवाडी पासुन ते उच्चशिक्षणापर्यंत पाश्चिमात्य भाषेचा वाढता प्रभाव व देण्यात येणारं अवाजवी महत्व यामुळे महाराष्ट्राची मातृभाषा मराठी लोप पावत आहे . मराठी भाषेला सांस्कृतिक वारसा लाभलेला असताना तिच्याकडे नवीन पिढी दुर्लक्ष करतांना दिसून येते आहे असे मत तालुका विधी सेवा समिती स्वयंसेवक राजु गायकवाड यांनी व्यक्त केले . तर मराठी भाषेच्या संवर्धनाची जबाबदारी विद्यार्थी व युवकांनी घेतली पाहिजे असे मत शिलानंद श्रावणे यांनी व्यक्त केले .सदर कार्यक्रमाचे आयोजन तालुका विधी सेवा समिती स्वयंसेवक राजू गायकवाड, शिलानंद श्रावणे, प्रशांत गुव्हाडे, राहुल धनवे यांनी केले होते .तसेच या कार्यक्रमात आदिवासी मुलांचे वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला .सदर कार्यक्रम तालुका विधी सेवा समिती समन्वयक प्रा. डॉ.भालचंद्र देशमुख सर यांच्या मार्गदर्शनात पार पडला.