<
जळगाव(प्रतिनिधी)-दापोरा येथील गिरणा नदीपात्रात अवैद्य वाळूचा उपसा मोठ्या प्रमाणात सुरूच असून शनिवार दिनांक २० रोजी ग्रामस्थांनी महसूल पथकाच्या ताब्यात दिलेले वाळूचे ट्रॅक्टर चालकाने महसूल प्रशासनाच्या समोरून पळवून नेले. दिनांक ५ रोजी देखील अश्याच प्रकारे ग्रामस्थांनी पकडलेले ट्रॅक्टर पळविले होते मात्र त्यावेळीदेखील कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. असे ट्रॅक्टर, डंपर पळवल्याच्या घटना महसूल विभागासाठी नवीन नाहीत.
दिनांक २० रोजी नदीपात्रात वाळूचा उपसा सुरू असतानांच नदीपात्रात माजी सरपंच गोविंदा तांदळे यांच्यासह ग्रामस्थ नदीपात्रात पोहचले. त्यावेळी नदीपात्रात ट्रॅक्टरमध्ये अवैधरित्या वाळू उपसा करत असल्याचे आढळून आले. त्यांनी ट्रॅक्टर मालक विकास ऋषिदास कोळी, रा.दापोरी, ता.एरंडोल यांच्या मालकीचे ट्रॅक्टरवाळू भरत होते, या ट्रॅक्टरवर क्रमांक एम.एच. १९. एपी.९४४५ क्रमांक होता तर ट्रॉलीवर क्रमांक एम.एच१९, डीएन ८८३७ क्रमांक होता. ग्रामस्थांनी भरलेले वाळूचे ट्रॅक्टर नदीपात्रातून गावात आणले व दापोरा तलाठी सारिका दुरगुडे यांना माहिती दिली. तलाठी यांच्यासोबत मंडल अधिकारी अक्षय वाघ, तलाठी प्रवीण बेंडाळे, वनराज पाटील व बावीस्कर महसूल यंत्रणेचे पथक आले व पंचनामा करत असतानांच चालक ऋषिदास कोळी याने ट्रॅक्टर सुरू करून पथकाच्या समोरुन पळवून नेले.
महसूल पथकाला न जुमानता समोरून ट्रॅक्टर पळवून नेल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे. वाळू माफियाकडून अशाच प्रकारे नेहमी पकडलेले वाहने पळून नेत असल्याच्या घटना घडत असून महसूल विभाग ठोस कारवाई करत नसल्याने अशा घटनांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. कारवाई करतांना पोलीस यंत्रणादेखील सोबत ठेवावी अशी मागणी देखील ग्रामस्थांमधुन होत आहे. या प्रकरणी तालुका पोलिस स्टेशन ला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तलाठी सारिका दुरगुडे यांच्या फिर्यादीवरुन तालुका पोलिस स्टेशन ला चालक विकास ऋषिदास कोळी, रा.दापोरी, ता.एरंडोल यांच्याविरुद्ध अवैध वाळू चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महसूल विभागात कारवाई साठी पकडून ठेवलेले वाहने देखील थातुर मातुर कारवाई करुन चिरीमिरी घेऊन सोडून देण्यात येतात अशी देखील परिस्थिती महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी निर्माण करून ठेवली आहे.