<
जळगांव(प्रतिनीधी)- चढाओढीन चढवीत होते गं बाई, मी पतंग उडवीत होते..! सर्वच जण मकर संक्रांतीचं सुट्टी घेतात आणि पतंग उडविण्याची मजा करतात. लहानग्यांपासून पासून ते मोठ्यांपर्यंत सर्वच पतंग उडवण्याचा मनसोक्त आनंद लुटतात. पतंग कटली की ‘वक्काट वक्काट’ असे म्हटले जाते. वक्काट वक्काटचा उच्चाराचा आवाज तर सर्वच पतंगप्रेमींचे लक्ष वेधून जाते. आणि पतंगप्रेमींचा उत्साह ही यात भर टाकतो. शाळकरी मुले तर आपली तहानभूक विसरून फक्त आपल्या पतंग आकाशात उडविण्यासाठी लक्ष ठेवून असतात. असाच पतंगोत्सव साजरा करण्यात आला तो आव्हाणे शिवारातील श्री समर्थ प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात. या पतंगोत्सवाला प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे तथा ग स सोसायटीचे अध्यक्ष मनोज पाटील उपस्थित होते. यावेळी मकरसंक्रांतीच्या पूर्वसंध्येला शाळेच्या आवारात पतंगोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांनी या पतंगोत्सवात सहभागी होऊन मनमुराद आनंद लुटला. यावेळी शाळेच्या परिसरात एकच उत्साह दिसून आला. यानंतर शाळेतील शिक्षिका मोहिनी सुरवाडे यांनी आपल्या भारतीय सण मकरसंक्रांती बद्दल माहिती दिली तसेच आभार चैताली पवार यांनी मानले. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका हर्षाली पाटील यांच्यासह शिक्षक राहुल पाटील, जयश्री पाटील, सद्दाम तडवी आदी शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.