<
या वर्षी असणार अनेक नव्या संकल्पनांचा समावेश
जळगाव – समाजातील वंचित, गरजू आणि उपेक्षित वर्गासाठी कार्य करणाऱ्या किंबहुना त्यांच्यासाठी झिजणाऱ्या सामाजिक संस्था आणि सेवामहर्षींच्या प्रदर्शनीचे म्हणजेच हेल्प-फेअर ३, मदतीचे हजारो हातचे आयोजन १५ ते १७ फेब्रुवारी २०२० दरम्यान सागर पार्क जळगाव येथे करण्यात आले आहे.
या संदर्भातील पत्रकार परिषद नुकतीच मल्हार कम्युनिकेशन्स येथे पार पडली.
सदर पत्रकार परिषदेस माध्यम क्षेत्रातील अनेक पत्रकारांसोबतच हेल्प-फेअर टीम मध्ये सहभागी झालेल्या अनेक संस्थांचे संचालक उपस्थित होते. यावेळी अनेकांनी हेल्प-फेअरमुळे गेल्या दोन वर्षात त्यांना झालेल्या लाभाची माहिती दिली.”सामाजिक सहभाग मिळवून देण्यासाठी हेल्प-फेअर आम्हांस पूरक ठरले आहे. पहिल्या हेल्प-फेअर पासून आम्ही येथे सहभाग नोंदवत आहोत. हेल्प-फेअरचे आयोजन दरवर्षी केले पाहिजे” अश्या भावना आनंदघरचे संचालक श्री. अद्वैत दंडवते यांनी बोलून दाखविल्या. दिव्यांगांसाठी कार्य करणाऱ्या उडान दिव्यांग प्रशिक्षण केंद्राच्या संचालिका सौ. हर्षाली चौधरी यांनी हेल्प फेअर मधील सहभागाबद्दल सांगितले की, ”आधी दिव्यांग मुलांकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन खूप वेगळा वा नकारात्मक होता. परंतु हेल्प-फेअरमध्ये अनेकांनी सहभाग नोंदवल्या पासून समाजाचा या विद्यार्थ्यांकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात काही प्रमाणात का असेना फरक पडला.” एचआयव्ही बाधीत मुलांसाठी कार्य करणाऱ्या संजीवनी या संस्थेच्या सौ. वंदना पवार म्हणाल्या की, ”एचआयव्ही पॉझिटिव्ह मुलांच्या न्यूट्रिशन स्पोर्टसाठी आधी मी मोजक्या दोन-चार मुलांना हे न्यूट्रिशन पुरवत असू, परंतु हेल्प-फेअरमध्ये सहभाग नोंदविल्यापासून ही संख्या आता पन्नास पर्यंत गेली आहे. कारण अनेक लोकांना आता हेल्प-फेअरच्या माध्यमातून या मुलांबद्दल माहित झाले.
गेल्या दोन वर्षांपासून मल्हार हेल्प फेअरचे आयोजन जळगावमध्ये करण्यात येत आहे. या दोन वर्षात हेल्प फेअरशी जिल्हा भरातील अनेक संस्था जुळलेल्या आहेत. गेल्या दोन वर्षात लाईफ इज ब्युटीफुल फाऊंडेशन व मल्हार कम्युनिकेशन्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हेल्प-फेअरच्या माध्यमातून अनेक सामाजिक संस्थांना मदत मिळाली आहे.
हेल्प-फेअरमध्ये जिल्ह्याभरातील विधायक, अलौकिक व समाजोपयोगी कार्य करणाऱ्या संस्थांची निवड प्रक्रियेद्वारे निवड करून त्यांना या प्रदर्शनीत सहभागी केले जाते. ही निवड हेल्प -फेअर मधील कोअर कमिटीद्वारे केली जाते. निवड झाल्यानंतर सहभागी संस्थांना येथे स्टॉल दिले जातात आणि गॅलरीमध्ये सेवाव्रतींची देखील माहिती दिली जाते. या सर्वांचे नियोजन हेल्प – फेअर टीमकडूनच विनामूल्य केले जाते. यासाठी आवश्यक असणाऱ्या निधीची उभारणी लोकसहभागातून केली जाते.
या वर्षी होत असलेल्या हेल्प – फेअर ३ मध्ये अनेक नव्या संकल्पनांचा समावेश असणार आहे.
या असतील नव्या संकल्पना :
सेवाकार्या सोबतच समाज प्रबोधन आणि त्या सोबतच वंचित, गरजू घटकांना मदत करीत असतांनाच हेल्प-फेअर मध्ये आणखी काय वेगळे करता येईल याचा समावेश आजवर करण्यात आलेला आहे. त्या अनुषंगानेच या वर्षाच्या हेल्प-फेअर ३ मध्ये पुढील अभिनव संकल्पनांचा समावेश असणार आहे.
* सेवाकार्य करणाऱ्या सामाजिक संस्थांना यामध्ये सहभागी तर होता येणारच आहे, त्या सोबतच एखादी अनोखी, अभिनव, समाजोपयोगी संकल्पना ज्यांच्याकडे आहे अशा व्यक्ती वा संस्थेला स्टार्ट-अप साठीसुद्धा सहभाग नोंदविता येणार आहे.
* आजवर जळगाव जिल्ह्यातील संस्था किंवा सेवामहर्षींनाच यात सहभागी होता येत होते परंतु ज्या संस्था बाहेरील आहेत आणि त्या देत असलेली सेवा जळगाव जिल्ह्यात नसेल अशा संस्थांना देखील हेल्प-फेअर ३ मध्ये स्थान देण्यात येणार आहे.
* संपूर्ण हेल्प-फेअर पाहण्यास व अनुभवण्यास साधारणतः दोन ते तीन तास सहज लागतात. तदनंतर कडकडून भूक लागल्यावर हेल्प-फेअरला भेट देणाऱ्या खवैय्या खान्देशकरांची भूक शमविण्यासाठी जळगावमधील विविध बचत गटांचे खाद्य पदार्थांचे विविध स्टॉल येथे असणार आहे. खवैय्या खान्देशकरांना या निमित्ताने खाद्य पदार्थांची मेजवानीच अनुभवता येणार आहे. महिला बचत गटांच्या या उपक्रमाच्या माध्यमातून एकप्रकारे महिला सक्षमीकरणास हातभारच लागणार आहे.
* हेल्प फेअर ३ मध्ये आलेल्यांना विविध माहिती, मदत मिळण्यासोबतच करमणुकीच्या कार्यक्रमांचा देखील आस्वाद येथे घेता येणार आहे. या दरम्यान राष्ट्रभक्तीपर समूहगान व नृत्य स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात येणार असून यामध्ये जळगाव जिल्ह्यातील विविध शाळा, महाविद्यालय तसेच संस्थांना सहभागी होता येणार आहे.
* हेल्प फेअर हा प्रकल्प म्हणजे व्यवस्थापनाच्या व समाज महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांना त्यांचे व्यवस्थापन कौशल्य विकसित करण्यासाठीचे मोठे प्लॅटफॉर्म असणार आहे. यासाठी एमबीए, बीबीएम, एमएसडब्ल्यू आणि व्यवस्थापनाची आवड असणाऱ्या इतर विद्यार्थ्यांसाठी येथे व्यवथापनाचे धडे प्रत्यक्षात गिरविण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या दरम्यान विद्यार्थ्यांना व्यवस्थापना सोबतच सोशल आंत्रप्रिनरशिप आणि मार्केटिंगचे देखील प्रॅक्टिकल नॉलेज येथून मिळविता येणार आहे. हेल्प फेअर ३ मध्ये सहभागी सर्व विद्यर्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येतील. त्यासाठी नाव नोंदविणे आवश्यक आहे.
या सोबतच सामाजिक संस्थांसाठी प्रशिक्षण वर्गांचे देखील आयोजन या दरम्यान करण्यात येणार आहे. हेल्प फेअर ३ सर्व दृष्टीने अधिकाधिक चांगले व यशस्वी करण्यासाठी समाजातील विविध क्षेत्रातील घटकांनी आपला सहभाग नोंदवावा व या कामी तन-मन-धनाने आपले योगदान द्यावे असे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे.
सदर पत्रकार परिषदेस विविध संस्थांचे संचालक, माध्यम क्षेत्रातील पत्रकार तसेच श्री. गनी मेनन, श्री. अमरभाई कुकरेजा, श्री. चंदू नेवे, व मल्हार कम्युनिकेशन्सचे श्री. आनंद मल्हारा यांची उपस्थिती होती. यावेळी दै. तरुण भारत तर्फे नुकत्याच प्रकाशित करण्यात आलेल्या सेवाभावे उजळो जीवन या पुस्तकाची प्रत श्री. मनोज बोरसे यांच्या हस्ते श्री. आनंद मल्हारा यांना भेट देण्यात आली.
अधिक माहितीसाठी ९३७०० ७७३११ व ८४४६१ ०१७५२ या क्रमांकांवर संपर्क साधावा.