<
जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी बांधील राहणार-पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील
जळगाव, दि. 26 (जिमाका) :- भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 70 वा वर्धापन दिन समारंभानिमित्ताने ध्वजारोहणाचा समारंभ राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी उपस्थिताना मार्गदर्शन करतांना पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले की, राज्यातील शेतकरी केंद्रबिंदू मानूण शेतकऱ्यांना कर्जमुक्तीबरोबरच चिंतामुक्त करण्यासाठी व त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मुख्यमंत्री श्री. उध्दवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास अघाडीचे सरकार कटिबध्द आहे. शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी शासनाने महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहे. या योजनेनुसार 30 सप्टेंबर, 2019 पर्यंत दोन लाख रुपयांपर्यंत थकीत व परतफेड न करू शकलेल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. प्रथमदर्शनी जळगाव जिल्ह्यातील 2 लाख 11 हजार 118 शेतकरी पात्र ठरले आहेत. या शेतकऱ्यांचे अंदाजे 1 हजार 127 कोटी 25 लाख 59 हजार रुपयांचे कर्ज माफ होणार आहे.
गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात अवकाळी पाऊस व वादळामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. नुकसानग्रस्त क्षेत्राचे तातडीने पंचनामे करुन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 421 कोटी 21 लाख रुपये इतके अनुदान 4 लाख 59 हजार बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आले आहे. आपल्या जिल्ह्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतंर्गत 4 लाख 24 हजार 389 शेतकऱ्यांची पी. एम. किसान पोर्टलवर नोंदणी करण्यात आली आहे. यापैकी 2 लाख 86 हजार 6 शेतकऱ्यांना पहिला हप्ता, 2 लाख 74 हजार 482 शेतकऱ्यांना दुसरा हप्ता, 2 लाख 8 हजार 163 शेतकऱ्यांना तीसरा हप्ता मागीलवर्षी देण्यात आला आहे. तर 57 हजार 440 पात्र शेतकऱ्यांना यावर्षीच्या पहिल्या हप्त्याचाही लाभ मिळाला आहे, हे सांगताना मला आनंद होत आहे.
गरीब व गरजू जनतेला सवलतीच्या दरात शिवभोजन उपलब्ध करुन देण्याची महत्वकांक्षी योजना राज्य शासनाने आजपासून सुरु केली आहे. पहिल्या टप्प्यात प्रायोगिक तत्वावर तिमाहीसाठी आपल्या जिल्ह्याच्या मुख्यालयी दरदिवशी 700 भोजन थाळींच्या मर्यादेपर्यंत गर्दीच्या 8 ठिकाणी 9 भोजनालये सुरू करण्यात येत आहे. शिवभोजन थाळीमध्ये दोन चपात्या, एक वाटी भाजी, वरण- भाताचा समावेश असलेली जेवणाची थाळी फक्त दहा रुपयांमध्ये उपलब्ध होणार आहे.
मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांनी नागपूर येथील विधीमंडळ अधिवेशनाचे वेळी विभागीय स्तरावर मुख्यमंत्री सचिवालय कक्ष स्थापन करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार विभागीय महसुल आयुक्त कार्यालय, नाशिक येथे मुख्यमंत्री सचिवालय कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. शासनस्तरावर असलेल्या कामांशी संबंधीत अर्ज, निवेदने विभागीय आयुक्त कार्यालयातील मुख्यमंत्री सचिवालय कक्षात स्वीकारण्यात येणार असल्याने नागरीकांना आपल्या कामासाठी मुंबईला जाण्याची आवश्यक भासणार नसून नागरिकांचे प्रश्न सोडविण्याच्या कामातही गतिमानता येणार आहे.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेतंर्गत खरीप हंगामात जिल्ह्यातील 1 लाख 1 हजार 403 शेतकऱ्यांनी 1 लाख 12 हजार 126 हेक्टर क्षेत्राचा, रब्बी हंगामात 4 हजार 186 शेतकऱ्यांनी 3 हजार 869 हेक्टर क्षेत्राचा तर हवामान आधारित फळपीक विमा योजनेतंर्गत 42 हजार 752 शेतकऱ्यांनी 5 लाख 43 हजार 222 हेक्टर क्षेत्राचा पीक विमा काढला आहे, ही आनंदाची बाब आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतीसाठी मुबलक पाणी उपलब्ध व्हावे, याकरीता जिल्ह्यातील अपूर्ण सिंचन प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असून जिल्ह्यातील नागरीकांना पुरेसे व शुध्द पिण्याचे पाणी मिळावे, याकरीता ग्रामीण पाणीपुरवठ्याच्या योजना पूर्ण करण्यासाठीही मी प्रयत्नशील राहणार आहे.
शेतकऱ्यांना आपल्या शेतापर्यंत जाण्याकरीता कुठल्याही प्रकारची अडचण येवू नये याकरीता जिल्ह्यात शेत पाणंद रस्ते योजना मिशनमोडवर राबविण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा वार्षिक योजनेत आवश्यक त्या निधीची तरतुद करण्यात आली आहे. येत्या वर्षभरात या योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेत पाणंद रस्ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.
ग्रामीण भागातील कुटूंबाला हक्काचे घर मिळावे याकरीता प्रधानमंत्री आवास योजनेतून यावर्षी जिल्ह्यातील 1 हजार 784 कुटूंबांना हक्काचे घर देण्यात आले आहे. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत जिल्ह्यात यावर्षी 35 कामे पूर्ण करण्यात आली आहे. मुख्यमंत्री सौर कृषी योजनेचा लाभ जिल्ह्यातील 351 लाभार्थ्यांना मिळाला आहे. तर उच्चदाब विद्युत वितरण प्रणालीद्वारे कृषीपंप योजनेचा लाभ जिल्ह्यातील 1 हजार 88 शेतकऱ्यांना मिळाला आहे. जिल्ह्यातील नागरीकांच्या हाताला काम मिळावे याकरीता रोजगार हमी योजनेतंर्गत जिल्ह्यात 3 हजार 600 कामे पूर्ण करण्यात आली असून प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा लाभ जिल्ह्यातील 47 हजार 888 महिलांना मिळाला आहे. जिल्ह्यातील नागरीकांना आरोग्याच्या चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, याकरीता प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालये आदि ठिकाणी एक्स रे मशीन, आवश्यक ती औषधी उपलब्ध करुन देण्यासही प्राधान्य देण्यात येणार आहे.
बेटी बचाओ बेटी पढाओ या राष्ट्रीय अभियानात आपल्या जळगाव जिल्ह्याने सातत्यपूर्ण कामगीरी केल्याने जिल्ह्याचे स्त्री-पुरूष प्रमाण 841 वरून 925 पर्यंत पोहचले आहे. त्यामुळे आपल्या जळगाव जिल्ह्यास केंद्र शासनाचा पुरस्कारही प्राप्त झाला आहे. ही आपल्या जिल्हावासियांकरीता अभिमानाची बाब आहे. यानिमित्ताने जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे व संबंधित यंत्रणेचे पालकमंत्र्यांनी मनापासून कौतूक केले.
जळगाव जिल्ह्याच्या विकासासाठी मी नेहमीच प्रधान्य दिले आहे. भविष्यातही जिल्ह्याचा सर्वांगीण विकास व्हावा, याकीरता जिल्हा नियोजन समितीने सन 2020-21 या वर्षीच्या 436 कोटी 77 लाख 51 हजार रुपयांच्या प्रारुप आराखड्यास मंजूरी दिली आहे. यामध्ये ग्रामीण भागातील नागरीकांना चांगले शिक्षण, आरोग्य, वीजेची सोय मिळण्यासाठी तसेच शेती क्षेत्राशी निगडीत कामांचा प्राधान्याने समावेश असून या कामांच्या माध्यमातून व जिल्हावासियांच्या सहकार्याने जिल्ह्याची विकासाची घोडदौड यापुढेही सुरु ठेवण्यासाठी बांधील असल्याचेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
येथील पोलीस कवायत मैदानावर प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ पार पडला. त्यानंतर राष्ट्रगीत झाले. यानंतर पालकमंत्री ना. पाटील यांनी उपस्थित स्वातंत्र्यसैनिक व मान्यवरांना त्यांच्या जागेवर जाऊन प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
शानदार संचलन आणि सांस्कृतिक कार्यक्रम
ध्वजारोहण समारंभानंतर राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना पोलीस दलामार्फत मानवंदना देण्यात आली. तसेच त्यांनी उघड्या जीप मधून संचलनाची पाहणी केली. संचलनाचे नेतृत्व सहाय्यक पोलीस अधिक्षक डॉ.निलाभ रोहण यांनी तर संचलनाचे सह नेतृत्व पोलीस मुख्यालयातील राखीव पोलीस निरीक्षक सुभाष कावरे यांनी केले. यावेळी झालेल्या संचलनात पोलीस मुख्यालयातील पुरूष पथक, महिला पथक, शहर वाहतुक शाखा, होमगार्ड महिला, आर. आर. विद्यालयाचे एनसीसी, आरएसपी मुले/मुली, ला. ना. विद्यालयाचे एनसीसी, बहिणीबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे एनएसएस, श्रीराम माध्यमिक विद्यालयाचे आर.एस.पी (मुले) सेंट टेरेसा स्कुलचे आर.एस.पी (मुली) आरएसपी मुले, प.ना.लुंगड कन्या शाळेच्या आर.एस.पी (मुली) जळगाव पोलीस बँड पथक, जळगाव पोलीस दलाचे श्वान पथक, जळगाव पोलीस दलाचे निर्भया पथक, पोलीस दलाचे बॉम्ब शोधक व नाशक पथक, पोलीस दलाचे मोबाईल फॉरेन्सिक इव्हेस्टिगेशन व्हॅन, पोलीस दलाचे वरूण पथक, महानगर पालिका, जळगावचे अग्निशामक दल, रेस्क्यु व्हॅन, जिल्हा महिला व बाल कल्याण विभागाचा मुलगी वाचवा मुलगी शिकवा, महानगरपालिकेचा स्वच्छ भारत अभियानाचा चित्ररथ, मुद्रा कर्ज योजना, रेडक्रॉस सोसायटी, सामाजिक वनीकरण विभागाच्या चित्ररथांचा समावेश होता.
यावेळी आर. आर. विद्यालय, प. न. लुंकड विद्यालय, किड्स गुरुकुल इंटरनॅशनल स्कुल. नंदिनीबाई वामनराव मुलींचे विकास विद्यालय, ओरीऑन इंग्लिश स्कुलच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर नृत्य सादर केले. तर योगा प्रशिक्षक श्रीमती अनिता पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या चमुने महात्मा गांधी थिम भारतीय योगशास्त्र योगासने सादर केली. ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ लोककलेतुन लोकजागर कार्यक्रम, जिल्हा महिला बाल विकास विभाग, जळगाव व रिजनल आऊटरेज ब्युरो गीत नाटक विभाग, पुणे द्वारा प्रस्तुत. फिजिकल डेमो आणि वेपन टॅक्टिस QRT ग्रृप पोलीस मुख्यालय, जळगाव यांनीही विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण केले. पोलीस दलाच्या वाद्यवृंदाने वाजविलेल्या देशभक्तीपर गीतांच्या धुनवर झालेल्या शिस्तबद्ध आणि जोशपूर्ण संचलनाने कार्यक्रमस्थळावरील वातावरण भारावले होते. तर सांस्कृतिक कार्यक्रमांचे उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.
मान्यवरांचा सन्मान व पुरस्कार वितरण
परेड निरिक्षणानंतर ना. पाटील यांच्या हस्ते मा. राष्ट्रपती महोदयांचे गुणवत्ता सेवा पदक जाहिर झाल्याबद्दल जळगाव पोलीस दलातील सहायक पोलीस उपनिरिक्षक श्री. भिकन सोनार आणि श्री. चंद्रकांत पाटील यांचा तर नक्षलग्रस्त भागात दोन वर्षे समाधानकारक सेवापुर्ण केल्याबद्दल विशेष सेवा पदक सहाय्यक पोलीस निरिक्षक स्वप्नील कचरु उनवणे यांचा सत्कार करण्यात आला.
बेटी बचाव बेटी पढाव कार्यक्रमाची जिल्ह्यत प्रभावी अंमलबजावणी केल्याबद्दल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी.एन.पाटील, जळगाव शहर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. उदय टेकाळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांचा उद्दिष्टापेक्षा अधिक सैनिक कल्याण निधी जमा केल्याबद्दल सैनिक कल्याण विभागातर्फे निवासी उपजिल्हाधिकारी तथा प्रभारी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी वामन कदम, कल्याण संघटक, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जळगाव अनुरथ वाकडे यांचा सत्कार करण्यात आला.
जिल्हा प्रशासन व प्रसार माध्यमांशी उत्कृष्टपणे समन्वय ठेवून शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची जिल्ह्यात व्यापक प्रमाणात प्रचार व प्रसिध्दी केल्याबद्दल जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM-KISAN) तसेच अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी अनुदान वाटप करण्याकरिता माहिती तंत्रज्ञानाचा वापर केल्याबद्दल जिल्हा सुचना व विज्ञान अधिकारी, प्रमोद बोरोले यांचा प्रशस्तीपत्र देवुन सन्मान करण्यात आला. पोलीस पाटील मौजे. धानोरा, प्र. अ. ता. चोपडा दिनेश चंपालाल पाटील, पोलीस पाटील मौजे, कुऱ्हाळदे सुरेश राजाराम नेहाळदे, पोलीस पाटील मौजे. शिरसोली प्र.न. श्रीकृष्ण रामदास बारी, पोलीस पाटील मौजे. शिरसोली प्र. बो. शदर राजाराम पाटील, पोलीस पाटील मौजे. वावडदा विनोद तुळशीदास गोपाळ यांना पोलीस प्रशासनात गंभीर गुन्ह्यात तसेच कायदा व सुव्यवस्था राखणे संदर्भात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल प्रशस्तीपत्रक देवुन सत्कार करण्यात आले आहे.
जिल्हा क्रिडा पुरस्कार सन 2019-20 – जिल्हा गुणवंत क्रिडा मार्गदर्शक प्रविण कनकसिंग राजपूत, जिल्हा गुणवंत क्रिडा संघटक/कार्यकर्ता प्रविण वसंतराव पाटील, जिल्हा गुणवंत खेळाडू विशाल निवृत्ती फिरके (खेळ-आटयापाटया), जिल्हा गुणवंत खेळाळू (महिला) श्रीमती. अनिषा बन्सी निर्मल (खेळ-आटयापाटया).
3 री खेलो इंडिया युथ गेम गोहाटी, आसाम 2020 – राष्ट्रीय 17 वर्षे मुली बॉक्सींग स्पर्धेत 63 कि. ग्रॅम वजनगटात प्रथम क्र. दिशा विजय पाटील. राष्ट्रीय 17 वर्षे मुले वेटलिफटिंग स्पर्धेत 55 कि. ग्रॅम वजनगटात तृतीय क्र. प्रशांत सुरेश कोळी, राष्ट्रीय 21 मुले वेटलिफटिंग स्पर्धेत 73 कि. ग्रॅम वजनगटात विजयी किरण रविंद्र मराठे, राष्ट्रीय 21 मुले वेटलिफटिंग स्पर्धेत 49 कि. ग्रॅम वजनगटात द्वितीय क्र. उदय अनिल महाजन.
14, 17 व 19 वयोगटातील मुले व मुली जिल्हास्तरीय शालेय क्रिडामध्ये प्राविण्य प्राप्त करणाऱ्या शाळांना प्रोत्साहनात्मक अनुदान. 14 वर्षाआतील मुले व मुली प्रथम क्रमांक सेंट टेरेसा स्कुल, जळगाव (रोख रक्कम 1 लाख), द्वितीय क्रमांक- विवेकानंद इंग्लीश मिडियम स्कुल, जळगाव (75 हजार), तृतीय क्रमांक- सेंट लॉरेन्स स्कुल, जळगाव (50 हजार). 17 वर्षाआतील मुले व मुली प्रथम क्रमांक- सेंट टेरेसा स्कुल, जळगाव (रोख रक्कम 1 लाख), द्वितीय क्रमांक सेंट लॉरेन्स स्कुल, जळगाव (रोख रक्कम 75 हजार), तृतीय क्रमांक डॉ. काकासाहेब पूर्णपात्रे माध्यमिक विद्यालय, चाळीसगाव (रोख रक्कम 50 हजार).
19 वर्षाआतील मुले व मुली प्रथम क्रमांक स्वामी विवेकानंद ज्यु. कॉलेज, जळगाव (रोख रक्कम 1 लाख), द्वितीय क्रमांक प्रताप कॉलेज, अमळनेर (रोक रक्कम 75 हजार), तृतीय क्रमांक- के. आर. कोतकर कॉलेज, चाळीसगाव, प्रताप कॉलेज, अमळनेर (रोख रक्कम 50 हजार)
कॅन्सर आजाराबाबत जनजागृती शिबीर राबविलेबाबत डॉ. निलेश चांडक, कॅन्सर स्पेशालिस्ट यांचाही पालकमंत्र्यांच्या सत्कार करण्यात आला.
जळगाव जिल्ह्यात लघु उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या उद्योजकांना जिल्हा पुरस्कार वितरण करण्यात आले. यामध्ये प्रथम पुरस्कार- सन 2015 मध्ये श्री. धनराज गोपाळ कासट, संचालक मे. सुगोकी, नमकीन ॲन्ड फुडस प्रा. लि. सन 2016 मध्ये श्री. मनोजकुमार सत्यनारायण डागा, मालक, मे. मारुती केमिकल इंडस्ट्रिज, जळगाव. सन 2017 मध्ये डॉ. प्रशांत दिवाकर सरोदे, मालक, मे. महालक्ष्मी बायोजिनिक्स, सन 2018 मध्ये श्री. गिरीष नंदु खडके, मालक, मे. हिरा ॲग्रो इंडस्ट्रिज, जळगाव यांना प्रत्येकी रक्कम रुपये 15 हजार, शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह देवुन गौरविण्यात आले आहे. तर द्वितीय पुरस्कार- सन 2015 मध्ये श्री. जसप्रीत ब्रिजेंद्रसिंग चंडोक, मालक मे. जय अंबे पॉलीमर्स, सन 2016 मध्ये श्री. दामोदर पुरुषोत्तम वाघेला, संचालक मे. जय जलाराम ओव्हरसीज, जळगाव. सन 2017 मध्ये श्री. अभिनव अशोक सिन्हा, मालक, मे.अेस बायोमेटॅलिक कॉपोंरेशन, जळगाव. सन 2018 मध्ये श्री. गोपाल बाबुराव गंगतीरे, मालक, मे. जय माता दी जिनींग ॲन्ड प्रेसिंग फॅक्टरी, बोदवड, ता. बोदवड, जि.जळगाव यांना प्रत्येकी रक्कम रुपये 10 हजार, शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह देवुन गौरविण्यात आले आहे.
मान्यवरांची उपस्थिती
या सोहळ्यास आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जळगाव शहर महानगरपालिकेचे आयुक्त उदय टेकाळे, पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले, अपर पोलीस अधिक्षक भाग्यश्री नवटके, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. नीलभ रोहन, उप वनसंरक्षक दिगंबर पगार, अपर जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे, निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता प्रशांत सोनवणे, उपजिल्हाधिकारी रविंद्र भारदे, शुभांगी भारदे, प्रसाद मते, उप विभागीय अधिकारी दीपमाला चौरे, जिल्हा कोषागार अधिकारी प्रवीण पंडित, जिल्हा पुरवठा अधिकारी सुनिल सुर्यवंशी, जिल्हा सुचना व विज्ञान अधिकारी प्रमोद बोरोले, नायब तहसीलदार रवी मोरे यांचेसह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर, स्वातंत्र्य सैनिक, विद्यार्थी, नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते. या सोहळ्याचे सुत्रसंचालन जी. एम. उस्मानी आणि राजेश यावलकर यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणातही जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी अपर जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे, निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम, उपजिल्हाधिकारी रविंद्र भारदे, शुभांगी भारदे, प्रसाद मते, उप विभागीय अधिकारी दीपमाला चौरे, जिल्हा कोषागार अधिकारी प्रवीण पंडित, जिल्हा पुरवठा अधिकारी सुनिल सुर्यवंशी, जिल्हा सुचना व विज्ञान अधिकारी प्रमोद बोरोले, नायब तहसीलदार रवी मोरे यांचेसह जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व शाखांचे प्रमुख अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते.
तत्पूर्वी जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्या हस्ते त्यांच्या शासकीय निवासस्थानीही ध्वजारोहन करण्यात आले.
मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात ध्वजवंदन
मध्यवर्ती प्रशासकीय इमारत टप्पा क्रमांक 3 च्या आवारातही सकाळी आठ वा. ध्वजवंदन करण्यात आले. जळगाव वन विभागाचे उप वनसंरक्षक दिगंबर पगार यांच्या हस्ते ध्वजवंदन करुन सामुहिक राष्ट्रगीत गायन करुन राष्ट्रध्वजास अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर, जिल्हा उपनिबंधक मेघराज राठोड, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विजसिंग परदेशी, कृषि उपसंचालक अनिल भोकरे, सहायक मुद्रांक अधिकारी सुनील पाटील, रेशीम अधिकारी श्री. बडगुजर यांचेसह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी, आंगणवाडी पर्यवेक्षिका व सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
यावेळी सर्व उपस्थितांनी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले. घेतली.