<
अभिनेता आणि दिग्दर्शक महेश कोठारे यांनी निर्माण केलेल्या “झपाटलेला’ या चित्रपटाचे संगीतकार अनिल मोहिले, हे झपाटलेले संगीतकार होते. हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत पन्नास वर्षे ते टिकून तर राहिलेच, पण शास्त्रीय संगीतापासून ते नव्या प्रवाहातल्या संगीताच्या बाजाचेही संगीत नियोजन करायचे तंत्र त्यांनी आत्मसात केले होते. 1 फेब्रुवारी त्यांचा स्मृतिदिन.
वडिलांच्या तालमीत बालपणीच त्यांनी संगीताचे धडे घेतले. 1960 मध्ये यशवंत देव यांच्यामुळे ते मुंबई आकाशवाणीत दाखल झाले. महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी ही नोकरी करीतच पूर्ण केले. आकाशवाणीत वाद्यमेळाच्या संयोजनाची हातोटी त्यांनी आत्मसात केली. शिवकुमार पुंजाणी यांनी अचूक आणि शेकडो वाद्यांच्या संयोजनात त्यांना तरबेज केले. आकाशवाणीतली नोकरी सोडल्यावर अरुण पौडवाल यांच्यासह त्यांनी काही मराठी चित्रपटांना दिलेले संगीत विलक्षण गाजले आणि लोकप्रियही झाले. “अष्टविनायक’ चित्रपटातली गीते पं. वसंतराव देशपांडे यांनी गायिली आणि त्या शास्त्रीय गाण्यांना अविट संगीत दिले होते ते, या दोघांनीच! शास्त्रीय संगीताचा पाया पक्का असल्याशिवाय, अन्य कोणत्याही संगीताच्या प्रवाहाचे अंतरंग समजत नाही, श्रोत्यांना उलगडूनही दाखवता येत नाही, असे अनिल मोहिले सांगत असत. कोणताही संगीत प्रकार त्यांनी त्याज्य मानला नाही. संगीतकार खय्याम, मदन मोहन, आर. डी. बर्मन, एस. डी. बर्मन, लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्यासह अनेक संगीतकारांचे ते संगीत नियोजक होते. थोडीसी बेवफाई, कयामत से कयामत, लेकिन, शराबी, डॉन, अभिमान यांसह 86 हिंदी चित्रपटांचे संगीत नियोजन त्यांनी केले होते. शुभमंगल सावधान, दे दणादण, थरथराट यांसह अनेक मराठी चित्रपटांचेही संगीत नियोजक तेच होते.
प्यारेलाल, बाळ पार्टे, सोनिक मास्तर अशा दिग्गजांकडून त्यांनी संगीत नियोजनाची शिस्त आत्मसात केली. पाच वादकांच्या ते शंभर वादकांच्या विशाल वाद्यवृंदांपर्यंत अचूक स्वर-सूर मेळाचे नियोजन ते अत्यंत अचूकपणे करीत असत. मेंडोलियन, सतार, जलतरंग, पखवाज, बासरी या वाद्यांवरही त्यांची हुकमत होती.
कोणत्याही संगीतकाराने दिलेल्या चालीनुसार गाण्यांचे संगीत नियोजन करायसाठी अनिल मोहिले यांनी, संगीताचे नोटेशन करायचे तंत्र शिकून घेतले होते. यशवंत देव यांच्यासह अनेक संगीतकारांनी त्यांच्या या शिस्तबध्द संगीत नियोजनाची मुक्त कंठाने प्रशंसाही केली होती. नव्या संगीतकारांनाही ते प्रोत्साहन देत. वयाची सत्तरी ओलांडल्यावरही संगीताच्या क्षेत्रात झालेल्या नव्या प्रवाहांचा ते वेध घेत, अभ्यास करीत. नवे संगीत सारेच काही बाजारू नाही. त्यातही काही उत्तम आहे, दर्जेदार आहे, याची जाणीव त्यांना होती. शास्त्रीय आणि लोकसंगीताचा प्रचंड व्यासंग त्यांनी केला होता. त्यामुळेच गाण्याचे संगीत नियोजन करताना ते गीताचे शब्द, त्याचा अर्थ, भाव समजून घेत, त्याआधारेच वेगवेगळ्या वाद्यांचा कसा उपयोग करून घ्यायचा, हे ठरवत आणि त्याचे पूर्णपणे नोटेशन करीत. वादकांनाही त्यांनी संगीत नोटेशनची ही कला शिकवलेली होती.
लता मंगेशकर यांच्या देश-विदेशात झालेल्या कार्यक्रमांचे संगीत नियोजक अनिल मोहिले हेच असत. लताबाईंचा त्यांच्यावर प्रचंड विश्वास होता. अनिल मोहिले यांच्यामुळेच आपल्याला अमेरिका, इंग्लंडसह विदेशातल्या संगीत कार्यक्रमात प्रचंड लोकप्रियता मिळाल्याचे त्या आवर्जून सांगत. “अभिमानाने मीरा वदते’, “असाच यावा पहाट वारा’, “कानात सांग माझ्या’, “चिमुकले घर आपुले’, “नयन तुजसाठी अतुरले’, “श्रीरंग सावळा तू’, “मज सांग सखे तू सांग’, यांसह शेकडो मराठी गाणी त्यांनी संगीतबध्द केली. “परी कथेतील राजकुमारा स्वप्नी माझ्या येशील का?’ हे गेली दोन पिढ्या लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या गाण्याला मोहक संगीत त्यांनीच दिले आहे. प्रचंड लोकप्रियता आणि पैसा मिळूनही अनिल मोहिले यांचे पाय जमिनीवर राहिले. आपण संगीत क्षेत्रात नाव मिळवले त्याचे श्रेय, आपल्याला घडवणाऱ्या संगीतकार श्रीनिवास खळे, बाळ पार्टे, सोनिक मास्तर यांच्यासह आपल्या गुरुंनाच असल्याची कृतज्ञ भावना त्यांनी वेळोवेळी व्यक्त केली होती. त्यांच्या निधनाने गुणी आणि पूर्वसुरींचा जादूमय संगीताच्या परंपरेचा वारसा जपणारा संगीतकार कायमचा काळाच्या पडद्याआड गेला आहे.
– योगेश शुक्ल (९६५७७०१७९२)