<
सोमाणी दाम्पत्यांकडून प्रतिकूल परिस्थितीत जगणे शिकविण्यासारखे – अशोकजी तापडीया
जळगाव दि. 2 (प्रतिनिधी) – प्रतिकूल परिस्थितीत कसे जगावे याचा परिपाठ सोनेरी काठपदर या पुस्तकात वाचावयास मिळतो. ज्यांच्यावर हे पुस्तक लिहिले गेले त्या सोमाणी दाम्पत्याकडून प्रतिकूल परिस्थितीत कसे जगावे हे नव्या पिढीला शिकण्यासारखे आहे असे भावपूर्ण उद्गार अशोकजी तापडीया (नाशिक) यांनी व्यक्त केले. येथील सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती स्वाती सोमाणी लिखीत व किशोर कुळकर्णी संपादीत ‘सोनेरी काठपदर’ या पुस्तकाचे प्रकाशन 1 फेब्रुवारी 2020 रोजी दुपारी 4 वाजता डिमार्ट येथील अगस्ती अपार्टमेंट, आदर्श नगर जळगांव येथे पार पडले त्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी सारडा व सोमाणी परिवाराचे सदस्य उपस्थित होते. आरंभी चिंतामणी नांदेडकर यांनी आपल्या प्रास्ताविकात अरुण सोमाणी यांच्या आठवणींना उजाळा दिला. लेखिका स्वाती सोमाणी, पुस्तकाचे संपादन करणारे किशोर कुळकर्णी, श्रीमती भारती कुळकर्णी यांचे देखील यावेळी यथोचित भाषण झाले. शहरातील सुप्रसिद्ध अशा ओरियंट सिमेंटचे सेवानिवृत्त महाव्यवस्थापक स्व. अरुण सोमाणी व सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती स्वाती सोमाणी यांच्या जीवनावर आधारीत हे पुस्तक आहे. प्रकाशन क्षेत्रात नावाजलेल्या जळगाव येथील कृपा प्रकाशनने प्रकाशित केले आहे. सोनेरी काठपदर या पुस्तकाचे मुखपृष्ठ सुप्रसिद्ध कलाकार मीलन भामरे यांनी साकारले आहे. प्रतिकूल आरोग्य असून देखील त्यावर खंबीरपणे सकारात्मक दृष्टीकोन ठेवत केलेली मात. पती-पत्नीचा प्रेरणादायी जीवन संघर्ष सहज सोप्या पद्धतीने शब्दबद्ध केला आहे. सोमाणी दाम्पत्याच्या या पुस्तकातुन नव्या पिढीला शिकण्यासारखे, प्रेरक असे उत्तम साहित्य वाचायला मिळेल. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेणुका भूषण मालाणी (औरंगाबाद ) यांनी केले.