<
अभिषेकचे सुरुवातीचे शिक्षण मुंबईत झाले. त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी अभिषेक परदेशात गेला होता. मुंबई, नवी दिल्ली, स्वित्झर्लंड आणि बोस्टन युनिव्हर्सिटीमध्ये अभिषेकने आपले शिक्षण पूर्ण केले. बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन व जया बच्चन ह्यांचा मुलगा असलेल्या अभिषेकने सन 2000 मध्ये जे.पी.दत्ता यांचा रिफ्युजी या चित्रपटाने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. हा करिना कपूरचाही पहिला चित्रपट होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अयशस्वी ठरला पण प्रेक्षकांनी अभिषेक आणि करिना या जोडीला पसंती दिली. त्यानंतर करिनाला मिळालेले चित्रपट गाजले पण चार वर्षात अभिषेकने केलेले चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरत होते. आपल्या करियरमध्ये यश पाहण्यासाठी 2004 साल उजाडावे लागले. मणिरत्नमच्या युवा या चित्रपटातून अभिषेकच्या अभिनय क्षमतेवर शिक्कामोर्तब तर झालेच पण चित्रपटही यशस्वी ठरला. त्याचवर्षी आलेला धूम हा चित्रपटही गाजला. 2005 मध्ये आलेल्या बंटी और बबली, सरकार, दस आणि ब्लफमास्टर या चित्रपटांनीही चांगले यश मिळविले. सरकार चित्रपटाकरिता अभिषेकला सर्वश्रेष्ठ सहाय्यक अभिनेत्याचे फिल्मफेअरही मिळाले.
दरम्यान, ऑक्टोबर 2002 मध्ये अमिताभ बच्चन यांच्या 60 व्या वाढदिवशी अभिषेक आणि करिश्मा कपूर यांचे लग्न ठरले मात्र लगेचच काही कारणांमुळे जानेवारी 2003 मध्ये हे लग्न मोडले.
2006 मध्ये आलेला कभी अलविदा ना कहना हा चित्रपट त्या वर्षाचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट होता. याचदरम्यान मणिरत्नमसोबत वेगवेगळ्या ठिकाणी स्टेजशोही अभिषेक करत होता. याचवर्षी आलेला उमरावजान हा चित्रपट बॉक्सऑफिसवर आपटला. या चित्रपटानंतर ऐश्वर्या राय आणि अभिषेकविषयी गॉसिप पसरण्यास सुरुवात झाली होती. या वर्षी आलेला तिसरा चित्रपट धूम 2 ने कमाईचा इतिहास घडविला मात्र चित्रपटाचे यशाचे श्रेय चित्रपटात खलनायक असलेला ऋत्विक रोशनला मिळाले.
2007 मध्ये आलेला गुरु चित्रपटाने पुन्हा एकदा अभिषेकच्या अभिनय क्षमतेवर शिक्कामोर्तब केले. हा चित्रपट यशस्वी ठरला. मे 2007 ला आलेला शूटआउट अॅट लोखंडवाला या चित्रपटातील एक छोटी भूमिका अभिषेकने केली. चित्रपटाने यश मिळविले. याचवर्षी आलेला झूम बराबर झूम हा चित्रपट मात्र जोरदार आपटला. यश अपयशाच्या लाटेवर अभिषेकची नाव हेलकावे घेत होती. याचदरम्यान वडील अमिताभ बच्चन यांची कंपनी ए.बी.सी.एल. तोट्यात गेली. या कंपनीच्या पुरुध्दारासाठी अभिषेकने प्रयत्न सुरु केले. 2008 मध्ये या कंपनीद्वारे अभिषेकने प्रिती झिंटा, रितेश देशमुख, अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय यांच्यासोबत एक वर्ल्ड टूरचे नियोजन केले. अमेरिका, कॅनडा, लंडन आणि त्रिनिदाद या ठिकाणी झालेल्या या शो ची सर्वच तिकीटे मोठ्या दराने विकली गेल्याने हा टूर यशस्वी ठरला आणि कंपनीला भांडवल उभे करणे शक्य झाले.
अभिषेक बच्चनचे गुरु या सिनेमाच्या सेटवर ऐश्वर्या राय बच्चन सोबत सुत जुळले आणि काही काळ डेटिंग केल्यानंतर 14 जानेवारी 2007 ला साखरपूडा तर 20 एप्रिल 2007 ला दक्षिण भारतीय पारंपारिक हिंदू रितीरिवाजानुसार लग्न संपन्न झाले त्यानंतर उत्तर भारतीय आणि बंगाली पध्दतीनेही त्यांचे लग्न करण्यात आले. विशेष म्हणजे ऐश्वर्या अभिषेकपेक्षा ३ वर्षांनी मोठी आहे. त्यांना आराध्या नावाची एक मुलगी आहे.
– योगेश शुक्ल (9657701792)