<
सत्तरच्या दशकात अस्तंगत होत असलेल्या गझल गायकीला पुनरुज्जीवन देणारे गझलसम्राट जगजित सिंह यांची 8 फेब्रुवारी जयंती.पत्नी चित्रा सिंगच्या समवेत त्यांनी गझल गायनाचे जाहीर कार्यक्रम करायला सुरूवात केली. रसिकांचा त्याला उदंड प्रतिसाद मिळत गेला आणि आपल्या चाळीस वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी आपले लक्षावधी चाहते गावोगावी घडवले.
बडे गुलाम अली खॉं, आमीर खॉं, अब्दुल करीम खॉं आदी बुजुर्गांच्या आवाजापासून प्रेरणा घेत गायकीकडे वळलेल्या जगजितसिंह यांचा जन्म ८ फेब्रुवारी १९४१ रोजी राजस्थानमधील श्रीगंगानगरला झाला. त्यांचे वडील अमरसिंग धीमान हे सरकारी नोकर होते. चार बहिणी व दोन भाऊ अशा कुटुंबातील जगजीत यांचे शीख परंपरेनुसार पालनपोषण झाले व त्यांचे मूळ नाव ‘जगमोहन’ बदलून ‘जगजित’ ठेवण्यात आले. पं. छगनलाल शर्मा या अंध संगीत शिक्षकाने त्यांना संगीताचे प्राथमिक धडे दिले. पुढे सैनिया घराण्याच्या उस्ताद जमाल खॉं यांच्याकडे त्यांनी सहा वर्षे पुढील संगीत शिक्षण घेतले व ख्याल, ठुमरी आणि ध्रुुपदवर प्रभुत्व मिळवले. जालंधरच्या डीएव्ही कॉलेजमधून त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण झाले. तेथील आकाशवाणीवरही त्यांनी काही काळ गायक म्हणून सेवा बजावली.
चित्रपटसृष्टीत गायक म्हणून नशीब आजमावण्यासाठी ते १९६१ साली मुंबईत आले, परंतु तेथे अपेक्षेनुसार कामे न मिळाल्याने ते जालंधरला परत गेले. परंतु संगीत त्यांना स्वस्थ बसू देईना. त्यांनी पुन्हा नव्या उमेदीने १९६५ साली मुंबईत पाऊल ठेवले, छोट्या छोट्या मैफली करण्यास प्रारंभ केला. त्यांच्या गझल गायकीचा लौकीक ऐकून एचएमव्हीने त्यांच्या दोन गझलांचे ध्वनिमुद्रण केेले. मात्र पार्श्वगायनाची संधी न मिळाल्याने त्यांनी जाहिरातींसाठी जिंगल्स वगैरे करायला सुरूवात केली. अशाच एका ध्वनिमुद्रणावेळी त्यांची भेट चित्रा यांच्याशी झाली. १९७० साली त्यांचा विवाह झाला व दोघांनी संयुक्तपणे मैफली करायला सुरूवात केली.
१९७५ साली एचएमव्हीने त्यांची ‘अनफर्गेटेबल’ ही पहिली एलपी रेकॉर्ड काढली. तिला उत्तम प्रतिसाद मिळाला व नंतर या दांपत्याने मागे वळून पाहिले नाही. मात्र, आपल्या एकुलत्या एका मुलाच्या अपघाती मृत्यूनंतर चित्रा यांनी कायमचे गाणे थांबवले.
जगजितसिंह यांनी हिंदीप्रमाणेच ऊर्दू, पंजाबी व नेपाळीमधूनही गझल व गीते गायिली आहेत. आपल्या ‘बियॉंड टाइम’ या अल्बमसाठी भारतात प्रथमच त्यांनी मल्टी ट्रॅक डिजिटल ध्वनिमुद्रणाचा वापर केला. त्यांचे अल्बम रसिकांमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरले. ‘सिलसिले’ (जावेद अख्तर) ‘मरासीम’ (गुलजार), फेस टु फेस’, ‘आइना’, ‘क्राय फॉर क्राय’, ‘मुंताझीर’ असे त्यांचे असंख्य अल्बम रसिकांनी डोक्यावर घेतले. लता मंगेशकर यांच्यासमवेत त्यांचा ‘सजदा’ हा अल्बमही आला होता. आपल्या मखमली आवाजात त्यांनी शायरांच्या गझलांचे सोने केले.
जगजितसिंह यांच्या काही लोकप्रिय गझल
• वो कागज की कश्ती, • चिठ्ठी न कोई संदेस,
• तुम इतना जो मुस्कुरा रहे हो, • होठोंको छू लो तुम,
• झुकी झुकी सी नजर, • कल चौदहवी का चॉंद,
• होशवालोंको खबर क्या, • तेरे आनेकी जब खबर महके
• आहिस्ता आहिस्ता, • वो जो हममे तुममे करार था,
जगजितसिंह यांनी आशीश उबाळे यांच्या ‘आनंदाचे डोही’ या चित्रपटासाठी गायिलेले गीत हे त्यांचे चित्रपटातील शेवटचे पार्श्वगायन ठरले. ‘‘तुझ्यामुळे आला नवा अर्थ माझ्या जीवनाला’’ हे मराठी गीत जगजितसिंह यांनी त्यात गायिले आहे.
– योगेश शुक्ल (९६५७७०१७९२)