<
प्रस्तावना
आमच्या अरविंद गंडभीर हायस्कूल – मुंबई शाळेच्या माजी-शालेय व्हाट्सअँप गटावर आम्ही २१ जण आहोत. या गटाचे नाव ठेवले आहे निर्धार. निर्धार गटातील डॉ. गिरीश यांनी १०० शब्दांच्या एका कथेला सुरुवात केली. ती त्या गटातील दुसऱ्या मित्रास त्याच्या व्यक्तीक व्हाट्सअप अकाउंटवर पाठविली. त्याने त्याच्या पद्धतीने ती कथा पुढे नेली. व गिरीश यांच्याकडे पाठविली. गिरीश यांनी ती तिसऱ्या कडे पाठविली. अशी साखळी २१ पर्यंत चालू ठेवली. केवळ गिरीश यांना सोडून इतरांना हे माहित नव्हते के आधीचे लेखक कोण आहे. दरवेळेस पुढच्या लेखकास पाठविण्या पूर्वी, गिरीश कथेमधील व्याकरण व थोडी शब्दरचना सुरळीत करत होतो. शेवटी सर्व बिंदू नीट जोडले जाऊन एक छान कथा तयार झाली. एक वेगळा उपक्रम नवीन निर्मितीचा. विविध अनुभवातून निर्माण झालेली ही कथा आपणास नक्की आवडेल.
कथा
सुमारे २० ते २५ वर्षा पूर्वीची हि कथा आहे. डोळ्यात उज्वल भविष्याची ओढ असलेल्या आणि निष्पाप चेहऱ्याच्या एका तरुणाने मुंबईत आगमन केले. त्याचे नाव जयंत. मराठवाड्यातील दूरच्या एका खेड्यात शिकलेला होता. जवळच्या एका तालुक्यात त्याने मराठी या विषयात बी.ए. पूर्ण केले होते. घरात २ उपवर बहिणी, १ लहान भाऊ, आई, वडील, विधवा आत्या, थोरले काका, आजोबा आणि आजी असे मोठे परंतु गरीब शेतकरी कुटुंबात तो लहानाचा मोठा झाला होता. अर्थात लगेच उपजीविकेचे साधन मिळविणे गरजेचे होते. पण आपल्या या हळव्या मनाच्या जयंतला लेखक होऊन नाव कमवायचे होते. या स्वप्नपूर्तीसाठी तो जादुई नगरी, मुंबईत आला होता. मुंबईत केवळ त्याची एकच ओळख होती, पक्या बरोबर. पक्या उर्फ प्रकाश मोरे त्याच्यापेक्षा सुमारे ५ ते ६ वर्षांनी मोठा पण मुंबईत भांडुप जवळ एका चाळीत गेली २ वर्षे राहत होता. त्याची चहाची गाडी होती. आणि बरं का मित्रानो जयंतच्या गावी आणखी एक गोड माणूस होत जे सतत जयंतचा ध्यास करी आणि त्याच्यावर जीवापाड प्रेम करीत होत. तीच नाव मीरा. त्यांच्या शेजारच्या शेतकऱ्याची एकुलती एक मुलगी. दिसायला लाखात उजवी आणि मनमोहक स्वभाव. अशा प्रेमिकेला सोडून शहरात येणे जयंतला हृदयावर दगड ठेवल्या सारखे होते. पण तिच्या वडिलांची अट, मुलगा खूप श्रीमंत आणि कामविणारा हवा.
मुबंईतील प्रवेश म्हणजे भूलभुलैया मध्ये शिरल्यासारखं वाटले. पक्या त्याला ठाणे एस. टी. स्टॅण्डवर घेण्यास आला होता, त्यामुळे त्याच्या घरी सहज पोचला. तिथे बसल्या बसल्या हळव्या जयंतला वाटू लागले “ती काय करत असेल अत्ता?” मीराच्या आठवणीने त्याला दाटून आले. तिच्या आठवणीने त्याला शालेय जीवनात नेल. ती तिची पाहिली नजर. तो पकडापकडी खेळत होता आणि मीरा शाळेच्या कट्ट्यावर बसून खात खात आपुलकीने त्याच्या खेळाकडे पाहत होती कारण जयंत चपळतेने आपल्या सवंगड्यां पकडून बाद करीत होता. ती त्याला म्हणाली “तू अमर अकबर अँथनी पिच्चरमधील अँथनी सारखा धावतोस, मस्त “. जयंतला एकदम अमिताभ झाल्याचा भास झाला. आणि शाळेची कर्णकर्कश्य घंटा वाजली. तो १० वित, ती ८ वित. सुंदर, गोरीपान, निळे डोळे, बॉबकट,आणि गालावरती खोल खळी. झाले,….आपल्या जयंतची दांडी गुल. तेवढ्यात खांदा धरून त्याला कोणीतरी जोरात हलविले, पक्याने. जयंत एका दिवाळी अंकाच्या संपादकाला भेटण्यास जाणार होता. आज बरच काही लिहायचं होते. पण काहीच सुचेना. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून पक्या म्हणाला ” आयला जयंत्या, वाहिनी दिसते काय डोल्या समोर कायम. गुमान चहा पी, बिस्कुट खा आणि तुझा तो संपादक वाट बघत असेल. मलाबी गाडीवर जायचंय”.
जयंतने चहा संपवला आणि संपादकांच्या कार्यालयात जाण्यास निघाला. त्याला हातची संधी दवडायची नव्हती. निवडीचा भाग म्हणून संपादकाने त्याला एक भावनात्मक कहाणी लिहिण्यास सांगितले. त्याने त्याची व मीराची कहाणी लिहायचे ठरवले. त्याने एक सुंदर प्रेम कथा लिहली पण संपादकास ती फारशी रुचली नाही. त्यामुळे तिथे काही त्याला संधी मिळाली नाही. चरीतार्थ चालविण्यासाठी काही तरी दुसरे काम करावे हा विचार त्याचा मनाला भेडसवू लागला, कारण डोळ्यासमोर भावी सासऱ्याची अट दिसत होती. दुसऱ्याच दिवशी त्याने एक जाहिरात बघितली. एका ग्रंथ संग्रहालयात ग्रंथपालाची गरज होती. ग्रंथ संग्रहालयाचे मालक मेहता साहेब श्रीमंत व सज्जन माणूस. त्यांची सौभाग्यवती काही वर्षांपूर्वी स्वर्गवासी झाल्या होत्या. ते त्यांच्या मुलीसोबत रहात होते. जयंतला त्यांनी नेाकरीवर रुजु करुन घेतले. जयंतलाही नेाकरी दोन कारणांसाठी उत्तम वाटली. एक म्हणजे पोटाची सोयआणि दुसर, लेखन क्षेत्राशी निगडीत काम. काहीच दिवसात तो तिथे रमला. त्याचा कामात जम बसायला लागला. राधा त्याला कामात खुप मदत करू लागली होती. राधा म्हणजे मेहताची कन्या. ती साधारण मीराच्या वयाची होती. तिला आपल्या जयंतचा लळा लागला होता. तिकडे मीरा पण १२ वी पर्यंत शिक्षण पुर्ण करुन तालुक्याच्या शाळेत बालगट शिक्षीकेच्या पदावर रुजु झाली होती. एकीकडे तीच पुढील बी.ए. चे शिक्षण पण चालु होते.
पण इथे मुंबईत मात्र लिखाणाची गोडी असलेला आपला जयंत त्रासला होता. म्हणुन फावला वेळ मिळताच तो आपल्या लिखाणाची आवड जोपासु लागला आणि या लिखाणाची पहीली प्रशंसक म्हणजे मेहताची राधा. त्याच्या लिखाणात आणि हळव्या स्वभावात राधा त्याच्यात गुंतत जात होती आणि तीलाही कळल नाही की ती जयंत च्या प्रेमात केव्हां पडली. मात्र जयंत मीराच्या आठवणीतच गुरफटत होता म्हणुन त्याने तीला पत्र लीहीले पण त्यात मीराचे नाव लीहीले नाही आणि अनायसे ते पत्र राधाला मिळाले. तिने ते वाचले आणि ते पत्र तीच्यासाठीच जयंत लीहीले असा गोड गैरसमज झाला. आणि राधा जयंतच्या प्रेमात आणखीनच गुरफटुन गेली. त्याच दरम्यान जयंतला त्याच्या विधवा आत्याच पत्र आलं. त्यात असे लीहीले होते, “लवकरात लवकर पैशाची जमवाजमव करून गावी ये आणि मीराचा हात तीच्या बाबांकडे मांग कारण मीराच्या वडीलांनी तीच्यासाठी स्थळ पहावयास सुरुवात केली आहे”. जयंत कावराबावरा झाला. तेवढयात राधा, जयंत ने मीराला लीहीलेल पत्र घेऊन समोर आली जयंतला झालेला घोळ लक्षात आला पण त्याने राधाला सत्यता सांगण्याऐवजी तो तीच्यासमोर प्रेमाचे नाटक करु लागला. आता प्रश्न पडला की मीराच्या प्रेमात असलेला आपला जयंत असे का वागु लागला………!
त्याला असे वाटू लागले की जर त्याला मीराच्या वडिलांची अट पूरी करायची असेल तर लवकरात लवकर श्रीमंत होणे भाग आहे. जर प्रामाणिक काम करून जगायचे ठरवले तर या निष्ठुर जगात त्याचे स्वप्न पूर्ण होणार नाही, व मीराचे लग्न होऊन ती त्याच्या आयुष्यातून दूर निघून जाईल. म्हणून त्याने आधी राधाला प्रेमात गुंतवून नोकरी व्यवस्थीत टिकून ठेवण्यासाठी व योग्य पगारवाढ करून घेण्यासाठी त्याने राधाशी प्रेमाचे नाटक सुरू ठेवले.
मेहता साहेब सामाजिक कार्यतही खूप सक्रिय होते. त्यांनी गुणवत्तेच्या आधारे मुंबईत उच्च शिक्षणासाठी त्याच्या बंगल्यात रहाण्यासह शिष्यवृत्तीची जाहीरात एका वृत्तपत्रात दिली. मीराने ही जाहिरात पाहिली आणि जयंत मुंबईत असल्याने उच्च शिक्षणासाठी मेहता साहेबांकडे अर्ज केला, पण जयंतला न कळविता कारण तिला त्यास आश्चर्यचकित करावयाचे होते. हे करत तीने तिच्यासाठी पालकांनी आणलेल्या स्थळांच्या प्रस्तावाना टाळले. मेहतासाहेबांना मीराच्या उच्च शिक्षणासाठीच्या (एल.एल.बी.) समर्पणाने प्रभावित केले आणि तिच्या आर्थिक पार्श्वभूमीचा विचार करून, राधाच्यासमवेत त्यांच्या घरी रहाण्यासह तिचा अर्ज स्वीकारला. मन चंचल असते. ते वयाशी निगडित असतेच असे नाही. काही महिन्यांनंतर मेहता साहेबाना मीरा आवडू लागली आणि तिच्यावर ते प्रेम करू लागले. ते पंचेचाळीसच्या आसपास असल्याने मीरा त्यांची जीवनसाथी होऊ शकते असा विचार त्यांनी केला. दिवाळीच्या सणाच्या वेळी मेहता साहेबांनी जयंतला राधामार्फत घरी आमंत्रित केले. जयंत घरी पोहोचला आणि जेव्हा राधा त्याला आपल्या हाताने गोड खाऊ घालत होती, तेव्हा मेहतासाहेब मीराचा हात घट्ट धरून हॉल मध्ये आले. जयंत व मीरा एकमेकांना पाहून आणि विशेषतः विभिन्न अवस्थेत पाहून स्तब्ध झाले.
मेहता साहेबांनी मीराचा हात घट्ट धरून ठेवला आहे की मीरानी मेहता साहेबांचा हात धरून ठेवला हे जयंतला काही केल्या कळेना, पण हे सर्वच बघुन तो फार बेचैन झाला. काय बोलावे हे त्याला सुचेना त्यांनी लगेचच स्वतःला सावरले. कारण मीरा जयंतला शाळेत असल्यापासूनच आवडत होती. बालपणापासून केलेल प्रेम हे खरं आणि सात्विक असतं. त्याचवेळी मीरा जयंतला ह्या अवस्थेत राधा बरोबर पाहून कमालीची अस्वस्थ झाली. मीराला वाटलं जयंत हे सगळे नाटक तिला जळवण्यासाठी करत आहे कारण ती त्याला न सांगता मुंबईत आली होती. जयंतला पण काहीस असंच वाटलं की मीरानी मेहता साहेबांचा पकडलेला हात हा सर्व दिखावा मला जळवण्यासाठी केलेला आहे. मीरा काही बोलायच्या आत जयंतनी राधाला गोड खाऊ भरवण्यास सुरवात केली. मीरानी मात्र मेहता साहेबांनि धरलेला हात सोडवून घेत नकळत डोळ्यात आलेले अश्रू हाताने पुसू लागली. मीरा आपल्यासमोर अशी अचानक येईल असा विचारच जयंतने कधी केला नव्हता. मीराच्याही मनातून तिने पाहिलेले सत्य काही केल्या जात नव्हते. विचारांचे काहूर दोघांच्याही मनात थैमान घालत होते.
मीराच्या अंतर्मनाने तिच्याशी संवाद साधला. तिने स्वतःच आत्मपरीक्षण केल. जयंतच तिच्यावरील प्रेमावर ती जराही साशंक नव्हती. आणि जर जयंत आणि राधा यांच्यात तस काही असेल तर आपलाही हात मेहता साहेबांच्या हातात होता. हे पाहून जयंतला काय वाटल असेल? जोपर्यंत सत्य परिस्थिती आपल्याला माहित नाही तोपर्यंत वाईट विचारांना मनात स्थान का द्यावे? आपल प्रेम इतकं तकलादू आहे? आणि प्रेम हे मागून मिळत नसत…. मीराला अश्रू अनावर झाले होते. या क्षणी तिला जयंतची खूप आठवण येत होती. इकडे जयंतची अगदी द्विधा मनस्थिती झाली होती. काय करावे काहीच सुचत नव्हतं. अचानक हातून सगळं निसटून जातय कि काय अस काहीस त्याला वाटू लागलं….योग्य अयोग्य, चूक की बरोबर या सगळ्याच्या तो पलिकडे गेला होता. मीराचा जणू त्याने ध्यास घेतला होता. पण आता मीराच आपल्याबद्दल काय विचार करत असेल? तीच आणि मेहता साहेबांच काय नात असेल? मीरा मला विसरली असेल का? माझी मीरा कुणा दुसऱ्याचा विचार करू शकते? एक नाही हजार विचार जयंतच्या डोक्यात घोंघावत होते.
या प्रसंगानंतर जयंत आणि मीरा एका विचित्र वळणावर येऊन थांबले होते. दोघांचीही द्विधा मनस्थिती होती. परंतु अशा वेळी मेहताच्या मनांतील हेतू काय आहे हे समजलेली मीरा, एका विशिष्ट निर्णयावर येऊन पोहोचते व ती मेहताचे घर सोडून निघून जाते. जयंतने आयुष्यात राधेच्या साथीने पूढे जावे ही इच्छा बाळगून व स्वत:चे पुढचे शिक्षण पूर्ण करून स्वताःच्या पायावर एक वकील म्हणून उभे राहण्यासाठी, जयंतचे प्रेम आपल्या मनात ठेवून ती तिथून निघून जाण्याचा निर्णय घेते. प्रेम ही मुळातच सुंदर भावना आहे. पण जर ते मिळाले नाही तर माणसाने जगणं सोडून देणं हे ही चुकीचं आहे. मीरा गावी न जाता एक अर्धवेळाची नोकरी करत आपलं शिक्षण पूर्ण करण्याच्या निर्णय घेते. मीरा आता पेईंग गेस्ट म्हणून एका छानश्या कुटुंबात रहाण्यास गेली. या कुटुंबाला सुद्धा मीरा त्यांच्या घरातील सदस्य वाटू लागली होती. मीराने शिक्षणाचा प्रवास सुरु ठेवला. स्वतःला शिक्षणाच्या प्रवासात गुंतवू लागली पण मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी जयंतच्या स्वप्नांना जपून पुढे जात होती. इथे जयंतचे चित्त काही थाऱ्यावर राहीना सतत मीराची काळजी वाटत होती. राधा, जयंत ची स्वप्ने पाहू लागली पण जयंतच एकच स्वप्न आणि ध्यास; मीरा आणि फक्त मीरा. जयंतने हे नाटक पुढे न्यायचे ठरवले. दरम्यान मेहताना काहीच कळायला मार्ग नाही कि मीराला अचानक काय झाल ते. बराच काळ लोटला आणि तो दिवस उजाडला ज्याची वाट राधा पहात होती, “लग्न” … राधा आणि जयंतच. मेहता साहेबानी हा विषय राधा आणि जयंतकडे सहज बोलून दाखविला. पण एके दिवशी अचानक एक धक्कादायक बातमी जयंतच्या कानी पडते. राधा शिर्डीहुन दर्शन करून येताना तिचा अपघात झाला आणि तिला आपली दृष्टी कायमची गमवावी लागली. बाकी शरीरावर कुठे फार इजा झाल्या नव्हत्या. नियतीचा एक विचित्र खेळ अनुभवास येत होता, जयंतच्या जीवनात. मेहता, लेकीच्या काळजी पोटी फार बेचैन होतात आणि जयंतला लग्नाची शपथ घालतात, आणि त्यांचे जे काही आहे ते त्यांच्यापश्चात जयंत आणि राधाचे असेल असे आवर्जून सांगतात. जी श्रीमंती, मीराच्या वडिलांना अपेक्षित होती ती राधाचे वडील त्याला देवू पाहत होते पण राधाच्या अटीवर. वडील म्हणून दोघांच्या अपेक्षा रास्त होत्या. इथे मीराचे शिक्षण पूर्ण होते पण मनात दडवलेली जयंतची स्वप्ने पुन्हा डोकावू लागतात. मीरा नोकरी करायची अस ठरवते आणि एका चांगल्या ऍडव्होकेट कार्यालयात तिला नोकरीही मिळते.
मीरा आता ऍडव्होकेट कार्यालयाच्या कामात व्यस्त झाली होती. पण तिच्या मनातून काही जयंतची ओढ कमी होत नव्हती. त्याला भेटण्याची आतुरता दिवसेंदिवस वाढत होती. तिने निर्धार केला त्याला भेटण्याचा. तीथे जयंतही आपल्या कामात व्यग्र झाला होता. आणि आता तर राधाच्या वडिलांनी दिलेल्या आमिषांनी त्याच्या मनात एक वेगळाच विचार डोकाऊ लागला होता. राधाशी लग्न करून मीराशी सुखाचा संसार कसा करता येईल यासाठी काय करता येईल याच सतत करत होता. प्रेम कधी इतके स्वार्थी विचार करू शकते याची प्रचिती त्याला येऊ लागली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा जाग आली त्यावेळी एका निर्धाराने तो आपल्या कामाला लागला. राधा आता जिला प्रत्येक कामात दुसरऱ्यावर अवलंबून रहावे लागत होती तिला आपल्या आयुष्यातील सर्वात महत्वाची व्यक्ती म्हणजे जयंत याची सतत आठवण येत होती. तीही लग्नासाठी आतुर झाली होती. पण जयंत आपल्या कामांत व्यस्त असल्यानं राधाला त्याला भेटण्याची संधी मिळत नव्हती. आपल्याला जयंत ह्या अवस्थेत स्विकारेल का या अनामिक भितीने तिला ग्रासले होते. शेवटी आज तिनेही हुंकार भरला आणि नवीन निर्धार केला, जयंतशी बोलूनच हा आपला प्रश्न सोडवण्याचा निर्धार पक्का केला. निर्धार केला तरीही, जयंतला पुढे काय करावे ते सुचत नव्हते. एकीकडे राधाच्या वडिलांची अट आणि दुसरीकडे मीरावरील अथांग प्रेंम, अगदी त्याला बुचकळ्यात टाकत होते. मार्ग काही सापडत नव्हता. मीराची सतत आठवण त्याला वेड लावत होती. तो तिच्या पासून जास्त दिवस लांब राहू शकत नव्हता. पण तिच्यासाठी त्याने जो मार्ग निवडला होता तो ही त्याला संभ्रमात टाकत होता. कारण ती एक प्रकारे फसवणूक होती राधा आणि तिच्या बाबाची पण दुसरीकडे हेही खरे होते की त्याने मीराला वचन दिले होते की तो तिच्या बाबांची अट पूर्ण करून तिच्याशी लग्न करणार होता. जयंत खूप प्रामाणिक होता. त्याने ठरवले की जे काही सत्य आहे त्यावर ठाम राहणार आणि त्याने राधा आणि तिच्या बाबांशी बोलायचे ठरवले. त्याला पूर्ण विश्वास होता की जो सत्याच्या मार्गाने चालतो देव सदैव त्याच्या पाठीशी राहतो. परंतु, जयंत जसा प्रामाणिक असतो तसाच मनाने हळवा सुध्दा असतो. तो मीरा वर जरी प्रेम करत असला तरी राधाची अवघङ परिस्तिथी नजरेतुन सुटलेली नसते. प्रदीर्घ विचार करून शेवटी तो मीराला विसरून जाण्याचा निर्धार करतो व राधा बरोबर संसार करण्याचा ठरवितो. मीराला ही राधाची अवस्था कळून चुकली होती त्यामुळे तीही जयंत व राधा ला एकत्र करण्याचा निर्णय घेते. प्रामाणिक जयंत, मेहतासाहेब व राधाच्या समोर मीरा व त्याची सत्य परिस्थिति मांडतो. राधाच्या मनात त्याच्या प्रामाणिक सांगण्याने प्रेम आणखीन द्रुढ होते. मेहता यांचे आपल्यावर अनंत उपकार आहेत हे समजून चुकलेला जयंत राधाला जवळ करतो. मेहतानाही आपल्या मुलीच्या मनाची कल्पना असते म्हणून सत्य जाणूनही ते लग्नास होकार देतात. राधाला ही वाटते की जयंत लग्नानंतर मीराला विसरुन जाईल व तिच्या प्रेमाने ती त्याला जिंकून घेईल आणि सगळे सुरळीत होईल.
इथे मीरा शिकाऊ वकिलांच्या टीम बरोबर ट्रेनिंग साठी पंधरा दिवसासाठी बाहेर जाते. बऱ्याच कंपनींमधील मान्यवर मंडळी तिथे ट्रेनिंग साठी आलेले असतात आणि ह्याच ट्रेनिंग कालावधीत तिची मैत्री होते रुबाबदार अणि देखण्या अश्या “दर्श”बरोबर. दर्श एम. बी. ए. करून तेथे मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून आलेला असतो.
हळूहळू त्यांची मैत्री फुलू लागते. दर्शचा प्रेमळ व समजूतदार स्वभाव मीराला आवडू लागतो. नकळत ती दर्शमध्ये गुंतत जाते. मीराचा हसरा व मनमिळाऊ स्वभावामुळे दर्श ही तिच्या प्रेमात पडतो. पण… मनातल्या भावना ओठावर येण्यास उशीर होतो. त्याच दरम्यान मीराच्या बाबांनी तिच्यासाठी एक मुलगा पसंत केलेला असतो. ती वडिलांच्या शब्दाबाहेर नसते. पण…गावी गेल्यावर पाहते तर काय!!! तिच्या स्वप्नातलाच ‘राजकुमार’ दर्श. दोघही एकमेकांना समोरासमोर बघून हरखून जातात. “हम आपके, आपके है कौन….” असं म्हणत दर्श मीराला प्रपोज करतो. दोघांचं शुभमंगल होत. दोघं एकमेकांचा आदर व स्वातंत्र्य जपत, कधीही अंतर न देण्याचे वचन घेतात. पण एक मात्र नक्की मीराला जाणवायचे की दर्श तिच्या विषयी खूपच वेडा झाला आहे. अर्थात असा अति प्रचंड आणि उत्कट प्रेम करणारा नवरा कुणाला आवडणार नाही. पण तरीही मीराला त्याच्या अति प्रेमाचे व कधी अति पसेसिव्ह पणाची जाणीव व्हायची. इकडे जयंत व राधा यांचाही संसार सुरळीत सुरु असतो. तो राधाची पूरेपूर काळजी घेत असतो, तरीही बाबांच्या जाण्याने तिला त्यांची पोकळी जाणवत असते. त्याचवेळी त्यांना एका गोड बातमीची चाहूल लागते….
ती गोड बातमी ऐकताच जयंत हरखून गेला. राधेच्या निर्जीव डोळ्यातही आनंदाचे कारंजे उसळू लागले. पण पुढच्याच क्षणी जयंत भानावर आला त्याला ह्या नात्यात अडकायचे नव्हते. केवळ उपकाराची फेड आणि राधाच्या अंध पणामुळे त्याने हे लग्न केले होते. तो मग राधाला ती ही जबाबदारी कशी पेलू शकणार नाही हे सांगायचा प्रयत्न करू लागला. पण राधा म्हणाली तू जसं माझे डोळे होऊन मला सांभाळतोस तसाच आपल्या बाळालाही सांभाळशील याची मला खात्री आहे. मला आपल्या बाळाला तुझ्या डोळ्यांनी बघायचं आहे. जयंतला पुढे काय करावं ते सुचेना. इकडे आड तिकडे विहीर अशा परिस्थितीत तो अडकला. त्याला मीराची खूप आठवण येऊ लागली. तिला प्राप्त करण्यासाठी त्याने केलेले नाटक त्याच्याच अंगाशी आल्याचे त्याला कळून चुकले. नाईलाजाने तो येतील तसे दिवस ढकलू लागला. बाळ हळूहळू त्याचे अस्तित्व दाखवू लागले होते. अखेर बाळाच्या आगमनाची चिन्हे दिसू लागली. राधा वेदनेने कळवळू लागली तसा जयंत तिला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेला. हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी तिची तपासणी करून सांगितले की थोडी समस्या निर्माण झाली असून बाळाला वाचवण्यासाठी तिच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करावी लागेल. जयंतने त्यास संमती दिली. बराच वेळ तो तिथे ताटकळत उभा राहिला आणि काही वेळाने डॉक्टरांनी त्याला बातमी दिली की बाळ सुखरूप आहे पण राधाला ते वाचवू शकले नाहीत. जयंतला कळेना की बाळाच्या सुखरूप असण्याचा आनंद मानू की राधा गेल्याचे दुःख की मीराला प्राप्त करायची संधी. पण जयंतला माहीत नव्हतं नियतीने त्याच्या पुढे काय वाढून ठेवलंय…..
नियती समोर कुणाचे खरच काही चालत नाही. राधा गेल्यानंतर जयंत एकटाच बाळाचे संगोपन करू लागला. आता जयंत पूर्णपणे एकटा पडला होता. त्याला मीराची आठवण येत असे,परंतु ह्या गोष्टीचा आता काहीच उपयोग नव्हता. मीरा तीच्या संसारात खुश होती.दर्श हा खरच समजूतदार ,मनमिळाऊ असा जोडीदार होता, जरी थोडा पसेसिव्ह तरीही. लग्न म्हणजे ‘फ़क्त बहरण ‘ह्याचाच अनुभव दोघ घेत होती. कोण म्हणत प्रेम फ़क्त एकदाच होत, स्त्री ला आवश्यक असलेल मान सन्मान, आदर, वेळ, व स्वातंत्र्य मिळाल तर ती पुन्हा एकदा प्रेमात पड़ु शकते. जयंतला ही कळून चुकले होते की मीराला मिळवण्याची लालसा म्हणजेच वाईट हेतूने त्याने राधाला जवळ केले व तेच त्याला भारी पडले. आज आपण केलेली घोर चुक तो समजुन चुकला होता व त्याचा त्याला पश्चाताप ही होत होता.परंतु वेळ निघून गेली होती. जयंतच्या आयुष्यातल्या दोन्ही स्त्रिया कायमच्याच निघून गेल्या होत्या. तिथे मीराला राधाच्या मृत्यूची बातमी कळते व ती जयंतला भेटण्यास येते.आपल्या बालपणीच्या मित्र व प्रियकराला खुप दिवसानी भेटल्यावर ती भावुक होते. जयंतची सुध्दा तीच अवस्था होते. जयंत आपली चुक मान्य करतो व मीरा ही त्याला माफ करते. शेवटी माणुस म्हटल्यावर चुका ह्या होणारच .जयंत बरोबर निखळ मैत्रीचा हात पुढे करत व त्याच्या भावी आयुष्यात तो मोठा लेखक होण्याच्या शुभेच्छा देत मीरा त्याच बाळ बघुन निघुन जाते. मीराच्या पाठमोऱ्या आकृती कडे बघत व हुबेहुब राधा च प्रातिबिब असणाऱ्या आपल्या छोट्या सोनुकली च्या कानात बोलतो “मीरा “. हो ,जयंतच्या आयुष्यात पुन्हा एकदा वेगळ्या रुपात मीरा चे आगमन.( मीरा मधला ‘मी ‘ आणि राधा मधला ‘रा ‘ घेऊन पुन्हा एकदा त्याची लाडकी “मीरा”).
खर म्हणजे राधाच्या अशा अचानक जाण्याने जयंतचे एकटेपण खूपच वाढले. मीरा ला प्राप्त करावयाची त्याची इच्छा पुन्हा जागृत झाली. एकदा मीराला त्याने घरी निमंत्रित केले. “आपण कुठे तरी दूर निघुन जाऊ” असे म्हणाला.
मीराने नकार दिला. मीराच्या या नकारने व्यथित होऊन जयंत चाक़ूने आपल्या हाताची शीर कापून घेण्याचा प्रयत्न करतो. जयंत च्या या विचित्र वागणूकी ने मीरा किंचित घाबरते. मीरा जयंत च्या हाताला पट्टी बांधते आणि असे वेड्या सारखे नको वागु असे सांगून निघुन जाते. जयंत पुन्हा पुन्हा मीरा ला फोन करून विनवणी करीत राहतो. मीरा ही त्याला खुप समझ देते पण जयंत काही केल्या ऐकत नव्हता व सतत फोन करतो. जिच्या करीता आपण इतके सोसले तीच आपल्या आयुष्यात नाही याची सतत त्याला खंत वाटू लागली. डोक्यात विचाराचे थैमान मांडले होते. आपले काही बरे वाईट करायचे विचार त्याच्या मनात येत होते. पण आपल्या बाळाकडे पाहून हळू हळू त्या भावनिक वेडसर पणातून स्वतःला सावरतो.
एके संध्याकाळी मीरा बाजारातून तिच्या बंगल्या वर परत येताना तिला जयंत घाई घाईत बंगल्यातुन बाहेर जाताना दिसला. तिच्या काळजा चा ठोकाच चुकला.घरात जाऊन बघते तर काय,,,,
दर्श रक्ताच्या थारोळ्यात पडलेला.
मीरा मूर्च्छा येऊन खाली कोसळते.
थोड्या वेळाने जेव्हा मीरा शुद्धीवर येते तेव्हा विचारांचे काहूर माजले होते. एकीकडे समंजस जोडीदाराचा मृत्यू आणि आयुष्यभर ज्याच्याबरोबर सहजीवनाची स्वप्ने पहिली त्याचे अविश्वसनीय असे अघोरी कृत्य. पोलीस आले होते पंचनामा झाला. निष्पाप दर्शला अखेरचा निरोप देताना मीराला अश्रू अनावर झाले होते. जयंत च्या मनातील तिच्या प्रेमाची तिला कल्पना होती परंतु प्रेम असे स्वार्थी व विकृत रूप धारण करेल याची तिने कल्पनाही केली नव्हती. दुःख , संताप, आणि राग नियतीचा क्रूर खेळ तिच्याभोवती पिंगा घालत होता पण तिने निर्धाराने डोळे पुसले भानावर आली. ती एक सुशिक्षित सक्षम मीरा होती. आजची बदलत्या युगाची आधुनिक स्त्री. तिची सदविवेक बुद्धी जागृत होती. तिने कायद्याचे शिक्षण पूर्ण केले होते. आज वेळ निर्णायक होती. न्यायाचे पारडे जड जड होत होते. सूचक मनाने निर्धारित मार्गावर जाण्यासाठी तिने काळा कोट चढवला. कोर्टात केस उभी राहिली आणि जयंतची विरोधक वकील म्हणून मीरा कोर्टाची पायरी चढली ती सौ.स्मिता दर्श माधव म्हणून.
मीरा कोर्टात उभी होती. समोर न्यायाधीश होते आणि आरोपीच्या पिंजर्यात खाली मान घालून जयंत उभा होता. एक क्षण मीराच्या मनात काहूर उठले, हाच का तो जयंत ज्याच्यावर आपण जिवापाड प्रेम केले. ज्याच्याबरोबर सुखी संसाराची स्वप्ने पाहिली तिचे मन उद्ध्वस्त झाले होते, परंतु दुसऱ्याच क्षणी तिने स्वतःला सावरले, वर मान करून तिने एक कटाक्ष टाकला आणि न्यायाधीशांकडे पाहून निश्चयी स्वरात म्हणाली ” माय लॉर्ड, यानेच माझ्या पतीच्या दर्शचा खून केला आहे. माय लॉर्ड माझा सुखी संसार, दर्शचे आणि माझे एकमेकांशी असलेले नाते याला खटकत होते केवळ स्वार्थापायी याने हे कृत्य केले आहे.” व्यथित मनाने मीरा जयंतच्या गुन्ह्याची कारणे देत होती. एकीकडे तिचे दुःखी झालेले मन मात्र दर्शला न्याय मिळावा म्हणून आटोकाट प्रयत्न करत होते.
इथे जयंतच्या डोळ्यातील अश्रु ही काही थांबत नव्हते. त्याचा चेहराही सुजून काळा निळा पडला होता. सात दिवसांपूर्वी पोलिसांनी त्याला अटक केली त्या दिवसापासून त्याला कस्टडी मध्ये रोज मारहाण केली जात होती. मीराच्या घरापासून थोड्या अंतरावर एका बागेतून त्याला अटक करण्यात आली होती. संपूर्ण शरीरावर आणि कपडयांवर रक्ताचे डाग कावरा बावरा होऊन एका झाडाखाली रडत बसलेला कोणी तरी पाहिला होता त्याला. पोलिसांना खबऱ्याकडून तशी टिप मिळताच तात्काळ कारवाई केली होती त्यांनी. पोलिस कस्टडी मध्ये अगदी थर्ड डिग्री चा पाहूणचार मिळून सुद्धा अजून त्याने गुन्हा कबूल केला नव्हता …. त्याचे एकच रडगाणे सुरु होते पोलिसांसमोर “मी दर्शचा खून केलेला नाही, मी फक्त त्याच्याकडे मीराबद्दल बोलण्यासाठी गेलो होतो”.
या गुह्यात तपास करणारे पोलिस अधिकारी सब इंस्पेक्टर राठोड यांना काही त्याचे म्हणणे पटत नव्हतं. “पक्का सराईत आहे हा … पट्टयाने फोडून काढ़ा साल्याला” मागच्या संपूर्ण आठवड्यात कित्येक वेळा त्यांनी आपल्या कनिष्ठ अधिकारयांना तश्या सूचना दिल्या होत्या. कारणसुद्धा तसंच होतं. सर्व पुरावे जयंतच्या विरुद्धच होते. तक्रार देताना मीराने जयंतला घरातून बाहेर पडताना पहिल्याचे रडत रडतच राठोड साहेबांना सांगितले होते. सोबतच घटनेची पार्श्वभूमि सुद्धा अगदी बालपणापासून कसे एकत्र आले, कशी ताटातूट झाली, जयंतचा अधाशीपणा, त्याने तिच्यासोबत बाहेर जाण्याचा केलेला हट्ट, तिने नकार देताच केलेला आत्महत्येचा प्रयत्न सर्व सर्वच सांगून टाकले होते तिने. विरह, क्रोध, दुखः,भीति, आश्चर्य अगदी सगळ्या नकारात्मक भावना तिच्या मनातून एकत्रितपणेओसांडून वाहत होत्या. दर्शच्या मृत्युला कारणीभूत ठरलेल्या चाक़ूवर जयंतच्या बोटांचे ठसे सापडले होते. घटनेच्या वेळी जयंतने घातलेला शर्ट दर्शच्या रक्ताने माखला तर होताच पण त्याची काही बटणेसुद्धा तूटली होती. “नक्कीच झटापट झाली असणार … दर्शने आपला जीव वाचवण्यासाठी केलेला अंतिम आणि केविलवाणा प्रयत्न” राठोड पुरावे तपासताना स्वतःशिच कुजबुजले होते.
दोन्ही पक्षाच्या वकिलांना खटल्याची पार्श्वभूमि समजावून द्यायला योग्य तेवढा वेळ दिल्यानंतर न्यायाधीश साहेबांनी आरोपिच्या पिंजऱ्याकडे अलगद नजर वळवली. जयंत खाली मान पाडून तसाच मुकाटयाने उभा होता. धीरगंभीर मुद्रेने त्याच्या कड़े पाहत न्यायाधीश महोदय म्हणाले “जयंत, तुमच्यावर दाखल केलेले आरोप तुम्हाला मान्य आहेत का?” पोलिसांच्या रोजच्या पाहुणचाराने थकलेली, अतीव दुःखाने आणि आरोपिच्या पिंजार्यात उभे आहोत या शरमेने खाली झुकेलेली मान हलकेच वर करत जयंतने उत्तर दिले ..”नाही जजसाहेब, मी नाही मारलं त्याला…त्याने आत्महत्या केली” आणि न्यायाधीशांनी पुढील तारीख दिली.
मीरा विचार करू लागली, काय होणार आता. जजसाहेबांनी दोन दिवसासाठी निर्णय राखून ठेवला, काय असेल दैव गती? तिच्या डोळ्यासमोर जयंतचा हतबल, दयनीय चेहरा सारखा दिसू लागला. त्याच्या डोळ्यातली विनवणी तिला अस्वस्थ करू लागली तीच मन तिला खाऊ लागलं. आपल्याला समजून घेणारा हा जयंत खरंच खुन करेल? राधावरचा प्रेमही त्यानं लपविले नाही. तो जर खरं बोलत असेल तर….. तिच्या पायाखालची जमीनच सरकली, एका निरपधराचा बळी जाईल का? त्याच्या बरोबर त्या गोंडस बाळाचं काय? आपल्या मागे आई, वडील, दोन बहिणी,एक लहान भाऊ, विधवा आत्या ,थोरले काका, आजी आजोबा आहेत हे माहित असून तो खून करेल का? तो पळून न जाता झाडाखाली बसून रडत होता. कदाचित नसेल केला त्याने खून. हळू हळू प्रेयसी मीराने वकील मीरावर विजय मिळवत तिच्या मनाचा कब्जा घ्यायला सुरुवात केली होती. ती खूप अस्वस्थ होत होती.
तो किती प्रेमळ आहे,आपल्यावर किती प्रेम करतो आपल्यामुलीचे नाव सुद्धा मीरा च ठेवले भले त्यात राधा असेल, म्हणजे तो राधाशीसुद्धा प्रामाणिक होता. मग तो असत्य नाही बोलणार.तिला तो शाळेतला जयंत आठवला त्याची असे नवी शब्द तयार करायची खुबी आठवली आणि ह्याही स्थितीत तिला हसू आलं. “मी”मिरातील “रा” राधातला असेच त्यांनी केलेली कविता तिला आठवली ,”तू हि मेरी सुंमीरा हो ।…..” (सुंदर-मीरा). हो…हो… जयंत म्हणजेच खरा माधव आहे. व्हायचं त्याची सुंमीरा?!!!आपल्या आडनावात असलेला माधव आत्ता या क्षणी तिच्या लक्षात आले. या योगायोगाने ती सुखावून गेली. त्या क्षणी तिने ठरविले कि माधवला म्हणजेच जयंतला न्याय द्यायचाच. छोट्या मीराला वडील आणि ह्या वेड्या मीराला तिचा माधव द्यायचा. आणि त्या माधवाची सुंमीरा त्याला परत करायची. खरच माणसाच्या आशा अती दुःखद क्षणी कधी कधी अनमोल सुखद क्षण असतात. मनं शांत ठेवल्यास सर्व दिसू लागते.तिने मनाशी खूणगाठ बांधली अन ठरिवले कि मीरा आता परत कोर्टाची पायरी चढेल ती “मधवाची सुंमीरा म्हणूनच….”.
ती तडक जयंतला जेलमध्ये भेटायला गेली अर्थात बरोबरच तिने छोट्या मीराला पण घेतले. ती उभी राहिली आणि जयंतला विचारले तू आमच्या दोघांच्या डोक्यावर हात ठेव आणि खरं काय ते सांग.कारण मला अजूनही असं वाटतं की तू खून नाही करू शकत आणि तसेच आमच्या डोक्यावर हात ठेवून खोटेही बोलू शकत नाही. जयंत गहिवरला, मीरा च्या प्रेमाने, तिच्या या सहानुभूतीने आणि विश्वासाने. त्याच्या डोळ्यात पाणी आले त्याने आपले दोन्ही हात त्या दोघींच्या डोक्याला लावून सांगितलं की मी खरोखरच खून केला नाही जे घडलं ते असं- मी मनात ठरवलं की आपण सर्व दर्शला सांगाव आणि म्हणून मी त्याला भेटावयास गेलो. त्याला सर्वकाही सांगितले आणि हे देखील सांगितले आता मीरा आणि त्याचा एक चांगला मित्र यापलीकडे कोणताही नात नाही त्यांच्यात. तसेच माझ्या मुलीला घेऊन मी परत गावी जाणार आहे. त्याने नुसतं हुंकार भरला आणि एकही शब्द बोलला नाही. मी परत निघालो त्याच्याकडे पाठमोरा होऊन. घराबाहेर पडल्यावर मला अचानक किंकाळी ऐकू आली. मी परत तुमच्या घरी वर गेलो.पाहतो तर काय दर्श हातामध्ये सुरी घेवुन उभा होता व त्याने हाताची नस कापली होती हातातून थोडं रक्त येत होतं. मी त्याला विचारलं तू काय करत आहे. तो म्हणाला माझ्याकडून काही चुका झाल्या आणि मी जगू इच्छित नाही म्हणून मी आज माझा आयुष्य संपवून टाकत आहे .मी त्याला विचारले अरे पण झाले काय ?
तो म्हणाला मी काहीही सांगण्याच्या मनस्थित नाही आणि चाकूने परत वार करायला सुरुवात केली .मी पटकन त्याच्या हातात तुमचा खूप घ्यायचा प्रयत्न केला आमच्यात झटापट झाली मला सुद्धा येथे छातीला चाकू लागला शर्टाची बटणे तुटली. पण मी त्याच्या हातातुन चाकू घ्यायला यशस्वी झालो होतो पण त्याने पटकन माझ्या हातातून चाकू घेऊन आपल्या अंगावर वार करून घेतले यापेक्षा आणि काही घडलं नाही. कुणाला तरी बोलवावे म्हणून मी बाहेर भेदरलेल्या अवस्थेत बाहेर पडलो आणि आपणच भेटलो. मी तिथे जाण हा माझ्या आयुष्यातील सर्वात दुर्दैवी क्षण होता आणि मी त्याला वाचवू शकलो नाही हे सगळ्यात मोठं दुर्दैव. मला खात्री आहे तुम्हाला हे सर्वांनाही खरं वाटणार नाही पण हेच सत्य आहे आणि मी हे पुराव्यासकट सिद्ध करू शकत नाही हे दुसरे दुर्दैव आहे आणि तो एकदम शांत झाला.
मीराने त्याचं हे बोलणं ऐकून एक निश्वास सोडला. तिचा एक ठाम विश्वास झाला आणि तिचा निश्चय आणखीनच दृढ झाला की जयंत निष्पाप आणि खूप प्रामाणिक आहे. तिच्या अंगात एक वेगळेच बळ आले.आता तिला खात्री होती जयंत आणि ज्युनिअर मीरा सुंमीराचे आहेत. पत्नी म्हणून दर्श बरोबर राहिल्याने तिला दर्श किती हळवा व तिच्या बाबत किती वेडा आणि मालिकांना आहे हे माहित होतं. असा अतिप्रसंग त्याने यापूर्वी केला होता पण ती जवळ असल्याने निभावले होते. त्याच्या समोर तिचे कोणी वर्णन म्हणजे तिच्या सौंदर्याची तारीफ केल्यास त्याला ते सहन होत नसे. त्याला समजावून एकदा ती त्याला जवळच्या मनोविकार तज्ज्ञ कडे कौन्सिलिंग करीत गेली होती. पण त्याने ते पुढे फार गंभीरपणे घेतले नाही. आणि आज जयंतने हे सगळे सांगितल्यावर तिला हे सगळे प्रकर्षाने आठविले. तिने त्या मनोविकारतज्ञाच्या भेटीचा कागद घेऊन थेट पोलिसस्थानाक गाठले व सर्व स्पष्टीकरण दिले आणि सुंमीराचा माधव मुक्त झाला.
नियती दोन खऱ्या प्रेमिकांचे मिलन घडविण्यापूर्वी किती अडथळे आणते हे सांगू शकत नाही हे खरे. तर मंडळी अखेर आपला जयंत आणि मीरा एकत्र आले. कालांतराने एक पिटुकला राजपुत्र ही या प्रेमळ त्रिकोणात सामील झाला.
लेखक आणि लेखिका– गिरीश ब. महाजन, अविनाश शिरोडकर, काव्यश्री जोगळेकर, सुहास गवस, किरण वैद्य, संतोष नाईक, महेश सामंत, छाया दिपक मोहिते, गीतांजली राजेश सावंत, जयश्री सुनील मोकल, राजन चंद्रकांत घाग, अनिता प्रशांत मोहिते, नेहा खाड्ये, लता दिवेकर राऊळ, नम्रता नंदकुमार लब्दे, विद्या नायक, मानसी राणे, स्मिता माधव, अरुण बेडेकर, प्रलय पाटील, माधव देशपांडे -संपर्क [email protected], 9821628179