<
प्रशासनाकडून स्वच्छतेसह अतिक्रमण व आरोग्याकडे दुर्लक्ष
जळगाव-(चेतन निंबोळकर)- शहरात येणार जाणार्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु त्यामानाने नागरी सुविधांचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जिवंत असल्याचे चित्र प्रत्यक्ष दर्शनी दिसून येत आहे. असेच शहरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रिडा संकुलातील विविध दुकानांमध्ये नागरिकांची नेहमीच वर्दळ असते. मात्र, याठिकाणी असणार्या सार्वजनिक शौचालयांची अवस्था बिकट झाली आहे. याठिकाणी बाहेरून जरी स्वछ भारत अभियानाचे बॅनर दिसत असले तरी प्रत्यक्षात मात्र दुर्गंधीचे व समस्यांचे साम्राज्य आहे.
तसेच कामासाठी घराबाहेर पडणार्या स्त्रियांना नैसर्गिक विधीसाठी स्वच्छ आणि सुरक्षित मुतारी नसल्यानं त्यांची देखील कुचंबना याठिकाणी होत आहे.
छत्रपती शिवाजी महाराज क्रिडा संकुल (स्टेडीअम) हे शहराच्या मध्यवर्ती भागात आहे. या संकुलातील गाळ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री चे दुकाने आहेत तसेच शालेय विद्यार्थ्यांचे देखील क्लासेस याठिकाणी चालतात. त्यामुळे शहरासह तालुक्यातील नागरिक रोजची खरेदी, विविध कामे करण्यासाठी तसेच विद्यार्थी ही मोठ्या प्रमाणात याठिकाणी येत असतात. मात्र, याठिकाणी फिरतेवेळी किंवा कुठे जाताना नैसर्गिक विधी करायचे झाल्यास कुठे जावे? हा प्रश्न त्यांना पडतो. मग अक्षरशः पोट दाबूनच त्यांना हा त्रास सहन करावा लागतो. विशेषतः महिला, वृद्ध व विद्यार्थ्यांनींची याठिकाणी गैरसोय होत असते. क्रीडा संकुलाला मोठ्या प्रमाणात अस्वच्छतेने विळखा घेतलेला आहे.
महिलांची होते गैरसोय
या संकुलात एकूण पाच मुताऱ्या असून त्यापैकी एकच मुतारी ही वापरण्या सारखी असून त्या ठिकाणी ही फक्त पुरुषांची सोय आहे व इतर चार मुताऱ्या ह्या कायमस्वरूपी बंद आहेत. त्यामुळे येथील गाळेधारकांसह बाहेरून येणाऱ्या महिला, वृद्ध व विद्यार्थ्यांनींची मोठ्या प्रमाणात गैरसोय होते. बहुतेक सर्वसामान्य महिलांना याठिकाणी आल्यावर एक अत्यंत कटु अनुभव येत असतो. येथे काम करणाऱ्या महिला, सर्वसामान्य महिलांपासून ते विद्यार्थींनींपर्यंत अशा प्रसंगांना सामोरे जावे लागत आहे. याचा विपरीत परिणाम महिलांच्या आरोग्यावर होत असल्याची देखील बतावणी एक ते दोन महिलांनी सांगितली आहे.
मुताऱ्यांच्या गेट ला अतिक्रमणाचा विळखा
छत्रपती शिवाजी महाराज क्रिडा संकुल (स्टेडीअम) हे शहराच्या मध्यवर्ती भागात असून देखील प्रशासनाचे याकडे लक्ष जाऊ नये हे नवलच म्हणावे लागेल. या क्रीडा संकुलात मुताऱ्यांकडे जाणाऱ्या मुख्य प्रवेश द्वारालाच ( शटर ला ) अतिक्रमित करून त्याला मोठे होर्डिंग लावण्यात आले आहे. होर्डिंग लावल्याने मुख्य द्वारच झाकले गेले आहे. नको तिथे अतिक्रमण विभाग कारवाई करायला पुढे असतात पण येथे का कारवाई केली जात नाही, असा देखील सवाल याठिकाणी उपस्थित होत आहे. मुताऱ्या सुरु होऊन नागरी सुविधा सुरळीत होतील अशी आशा कायम जळगाव करांना लागून आहे.
प्रशासनाकडून मात्र याकडे मुद्दाम तर डोळेझाक केली जात नाही ना? असा देखील सवाल निर्माण होत आहे. एकीकडे जळगाव शहराचा विकास झाल्याचे जनतेवर बिंबवले जात आहे मात्र प्रत्यक्षात याठिकाणी मुताऱ्यांची देखील सोय नसल्याने विकास झाला आहे असे सांगणाऱ्यांनी आधी मुताऱ्यांची व्यवस्था करावी असा सूर शहरात बाहेरून येणाऱ्या महिलांमध्ये तर आहेच त्याचबरोबर शहरातील महिला देखील याबाबत दबक्या आवाजात बोलत आहेत. प्रशासन याकडे लक्ष देऊन याबाबत स्वछता मोहीम राबवणार का?