<
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांची एपिक सिझन टू प्रदर्शनास भेट
“माझ्या वाढिवसानिमित्त माझ्याच सहकाऱ्यांनी दिलेली ही (एपिक महाकाव्य) मेजवानी माझ्यासाठी फुलासारखी आहे. अस म्हणतात जेवण शरीरासाठी असत आणि कला आत्म्यासाठी असते, मला मिळालेली ही कलारूपी मेजवानी मला ताजातवाना करून गेली. खरं म्हणजे ह्यापेक्षा माेठी मेजवानी दुसरी कोणती असू शकते, ” असे भावपूर्ण उद्गार जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी काढले. भाऊंच्या उद्यानात सुरू असलेल्या ‘एपिक सिझन टू’ छायाचित्र प्रदर्शनास त्यांनी दि. 11 रोजी सायंकाळी भेट दिली, त्या प्रसंगी त्यांनी उपस्थितांशी सुसंवाद साधला.
अशोक जैन यांच्या जन्मदिनाच्या औचित्याने पूर्वसंध्येला 9 फेब्रुवारी रोजी ‘एपिक सिझन टू’ प्रदर्शनाचे उदघाटन कविवर्य ना.धो. महानोर यांच्या हस्ते व सेवादास दलुभाऊ जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले होते.
एपिक अर्थातच महाकाव्य किंवा epic म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स पिक्चर असेही नाव आजच्या परिभाषेनुसार समर्पक असेच आहे. 58 छायाचित्रांबद्दल बोलायचे झाले तर, एक एक छायाचित्र हे महाकाव्यच म्हणायला हवे. गत वर्षाच्या तुलनेत यावर्षी आणखी दर्जेदार छायाचित्रे संकलित झाली आहेत. तंत्रज्ञानात झालेली सुधारणा, कॅमेरात अघिक मेगापिक्सलची प्रगत अवस्था या सगळ्या बाबींमुळे एक एक फोटो हा उत्तमच आहे, असेही त्यांनी आवर्जून सांगितले. अशोक जैन यांच्या 10 छायाचित्राच्या दालनात त्यांनी काढलेल्या छायाचित्रांची पार्श्वभूमी व छायाचित्र क्लिक करण्याचा प्रसंगही त्यांनी उपस्थितांना सांगितला.
गत वर्षी या स्वरूपाचे प्रदर्शन भरविण्यात आले होते, मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे यावर्षी देखील हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. कलेवर प्रेम करणारे आणि कलेला आश्रय देणारे जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांचा 10 फेब्रुवारी रोजी जन्मदिवस असतो. त्या निमित्ताने सहकाऱ्यांनी मोबाईलवर काढलेल्या छायाचित्रांचे प्रदर्शन ‘एपिक सिझन टू’ आयोजित केले आहे. या प्रदर्शनासाठी एकूण 58 छायाचित्रे (ज्यांना व्होट देता येईल), 10 छायाचित्र अशोक जैन यांची, 3 छायाचित्रे अतुल जैन यांची(वेगळी छायाचित्र) मांडलेली आहेत. जैन परिवारातील सदस्यांनीदेखील या प्रदर्शनात छायाचित्राच्या माध्यमातून उत्साहाने सहभाग घेतला आहे. 16 फेब्रुवारीपर्यंत रसिकांनी प्रस्तुत प्रदर्शनास भाऊंच्या उद्यानातील वसंत वानखेडे कला दालनात अवश्य भेट द्यावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे.