<
नोकरीला लागल्यानंतर सर्वसामान्य कर्मचारी आपापल्या कामात व्यस्त होतो.महिन्याच्या महिन्याला पगार मिळतो. दरवर्षाला नियमाप्रमाणे वेतनवाढ मिळते.वर्षातून दोनवेळेला उशीरा का होईना जाहीर झालेला महागाई भत्ता अगदी मागील फरकासकट मिळतो. रजा मिळतात.मंजूर ही होतात.मग संघटना हवीच कशाला? संघटनेचा सभासद नसलं तर काय अडणार आहे माझं? संघटना करतातच काय? संघटनांना विचारतोयच कोण ? संघटनेचा सभासद झालो नाही म्हणून माझ्या एवढ्या वर्षाच्या नोकरीत कायच अडलं नाही.आजवर मी संघटनेच्या एकाही मिटींगला गेलेलो नाही.एकाही मोर्चाला नाही.कोणत्याही आंदोलनात मी आजवर सामील झालेलो नाही.
काय अडलंय माझं ? मग कशाला हवी ती संघटना ? का द्यायची मी वर्गणी? सर्वसामान्य कर्मचारी च्या मनाला सहज पडणारे हे प्रश्न आहेत.आणि त्याच्या दृष्टीने ते कदाचित बरोबर ही असतील. हे उदाहरण झालं त्या कर्मचारी चे की ज्यांचं आजवर संघटनेवाचून काही तटलं नाही.दुसरीकडे असे लोक आहेत की त्यांना संघटनेबद्दल सगळं माहिती असून ही सोयीस्कररित्या बाजू काढणारे.तिकडं दुर्लक्ष करणारे.तिसरे असतात संघटना मानणारे पण कातडी बचाव करून लढाईत न उतरणारे. मित्रांनो, संघटना ही कोणी एक व्यक्ती नव्हे. बहुसंख्येनं एकत्र येवून सर्वांनी सर्वांसाठी केलेली ती एक सोय आहे.संघटना असावी की नसावी.संघटनेत सहभागी व्हावे की नको असा विचार करणा-या कर्मचारी ला कदाचित आजवर अडचणी आल्याही नसतील.पण भविष्यात येणार नाहीत याची काय शाश्वती.आणि या झाल्या व्यक्तिगत अडचणी.आपल्या व्यक्तिगत अडचणी सुटल्या की झालं का ? की आपली काही सामाजिक जबाबदारी ही बनते की आपण कर्मचारी समाजासाठी काही करावं. आपल्याला नियमित वेतन मिळतं,भत्ते ज्या त्या वेळेला मिळतात , रजा मंजुरी किंवा अशी आपली अनेक कामं परस्पर होतात ती संघटनेच्या जीवावरच.संघटना ही सर्वांसाठी काम करत असते.सर्वांना आंदोलनामध्यै सहभागाचं आवाहन करते.पण आपण त्या आवाहनाला कितपत प्रतिसाद देतो ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे.संघटना मात्र सर्वांचे प्रश्न मांडते.त्याची फळं मात्र आपण सर्वच जण चाखत असतो.मग आपलीही काही नैतिक जबाबदारी बनते की संघटनेसाठी योगदान देण्याची.
संघटनेशिवाय ही काही वेळेला आपली कामं होतात.एखादा पदाधिकारी,अधिकारी संबंधित असेल किंवा चिरीमिरी देवून एखादं काम कदाचित आपलं होत ही असेल.पण प्रत्येक वेळेस हे पदाधिकारी,अधिकारी उपयोगाला येतीलच याची काय खात्री.आणि ज्यावेळेस धोरणात्मक बाब असते त्यावेळेस आपल्याला उपयोगी पडते ती फक्त आपली संघटनाच..म्हणूनच संघटनेचे सभासद व्हावे. आपली संघटना आर्थिक दृष्ट्या मजबूत राहण्यासाठी वार्षिक सभासद वर्गणी,वेळो वेळी होणारी आंदोलने,मोर्चे,निदर्शने, सभा, यासाठी लढानिधी अवश्य देत राहावी.संघटना सर्वांच्या हितासाठी व कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात काम करते . माझी संघटना – महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय वीज कामगार संघटन संलग्न स्वतंत्र मजदूर युनियन तीचे राष्ट्रीय अध्यक्ष मान जे एस पाटील जे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकारी विचारधाराचे राष्ट्रीय पातळीवर ट्रेंड युनियन मान्यताप्राप्त करण्यासाठी पायाला भिंगरी , डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर ठेऊन देशभरातील मागासवर्गीय कामगार कर्मचारी अधिकारी यांना संघटित करीत आहेत.