<
आहट सी कोई आए तो लगता है की तुम हो, साया कोई लहराए तो लगता है की तुम हो
यासह एकाहून एक सरस रचना करणारे शायर व गीतकार जानिसार अख्तर यांचा आज 14 फेब्रुवारी जन्मदिवस.
ग्वाल्हेर येथे 14 फेब्रुवारी 1914 ला जन्मलेले जानिसार अख्तर यांच्याकडे शायरी परंपरेने आली होती. त्यांचे पणजोबा फज्ले हक खैराबादी यांनी मिर्झा गालिब यांच्या सांगण्यावरून त्यांच्या दीवान चे संपादन केले होते. 1857 च्या स्वातंत्र्यसमरात ब्रिटिश सरकारच्या विरोधात जिहादचा फतवा काढल्याबद्दल त्यांना काळ्यापाण्याची शिक्षा झाली होती. त्यांचे पुत्र मुज्तर खैराबादी हे देखील प्रसिध्द शायर होते. जानिसार यांनी 1930 मध्ये व्हिक्टोरिया कॉलेज ग्वाल्हेर येथून मॅट्रीक केले. त्यानंतर अलीगढ विद्यापीठातून बीए व एमए केले. मात्र काही अडचणींमुळे त्यांना विद्यावाचस्पतीचे शिक्षण सोडावे लागले आणि त्यांनी व्हिक्टोरिया कॉलेजमध्ये उर्दू व्याख्याता म्हणून काम स्वीकारले.जानिसार यांच्या जीवनात अनंत अडचणी आल्यात पण आपल्या कणखर पण शायरी अंदाजाच्या नाजूक स्वभावाने त्यांनी या अडचणींवर मात केली. महाविद्यालयीन जीवनात झालेल्या प्रेमभंगामुळे त्यांनी लग्नाचा विचारदेखील सोडून दिला. आई आणि बहीणीच्या आग्रहाखातर प्रसिध्द शायर मजाज लखनवी यांची बहीण साफिया हिच्याशी 25 डिसेंबर 1943 ला निकाह झाला. लग्नानंतर मात्र पत्नी साफिया हिच्यावर जानिसार यांचे प्रेम जडले. या लग्नाच्या यशस्वीतेमध्ये त्यांची चुलत बहीण फातेमा हिचा मोठा हात होता. मात्र जानिसार यांचा स्वभावात संस्थानिकांचा आब होता. रात्री पाणीही प्यायचे झाले तरी ते स्वतः पाणी पिण्यास जात नसत. पत्नीला झोपेतून उठवून पाणी आणण्यास सांगत. 1945 आणि 1946 पुत्र जावेद अख्तर आणि सलमान अख्तर यांचा जन्म झाला. स्वातंत्र्यानंतर उसळलेल्या दंगलीदरम्यान जानिसार हे भोपाळ येथे राहण्यास आले. तेथे त्यांनी हमीदिया महाविद्यालयात उर्दू आणि फारसी विभागप्रमुख म्हणून कार्यभार सांभाळला. तसेच स्वतःची शिक्षीत पत्नी साफियालाही त्याच महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून रुजू करुन घेतले. याचदरम्यान प्रगतीशील लेखक संघाचे अध्यक्षपद त्यांच्याकडे चालून आले.
अचानक जानिसार यांच्या मनात चित्रपटविश्वाविषयी आकर्षण निर्माण झाले आणि 1949 च्या दरम्यान काम मिळविण्यासाठी त्यांनी स्वप्ननगरी मुंबईचा रस्ता पकडला. तिथे कृष्णचंदर, इस्मत चुगताई आणि मुल्कराज आनंद यांच्या संपर्कात ते आले. पण काम मिळविण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. या संघर्षाच्या दिवसात पत्नी साफिया हिने भोपाळ येथून आर्थिक मदत केली. मात्र 1953 मध्ये कर्करोगाने साफिया यांचे निधन झाले. 1956 मध्ये त्यांनी खदीजा तलत यांच्याशी लग्न केले. 1955 मध्ये आलेल्या यासमीन या चित्रपटाद्वारे जानिसार यांची चित्रपटसृष्टीतील कारकिर्द सुरु झाली. यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. यानंतर त्यांनी लिहिलेल्या गीतांमधील आखों ही आखोंं में इशारा हो गया, गरीब जान के हमको न तुम दगा देना, ये दिल और उनकी निगाहों के साये, आप यू फासलों से गुजरते रहे, आ जा रे ओ नूरी या गाण्यांनी त्यांना यशस्वी गीतकारांच्या यादीत नेऊन ठेवले. कमाल अमरोही यांच्या रजिया सुल्तान या चित्रपटाकरिता ए दिले नादां हे त्यांनी लिहिलेले शेवटचे गीत होते.
विखुरलेले केस, त्यांना कायम सावरणारे हात, ओठात असलेली जळती सिगरेट, पायजमा आणि त्यावर जाड कापडाचे नेहरु जॅकेट या वेशातील जानिसार यांचे व्यक्तिमत्व समोरच्यावर एक वेगळाच प्रभाव टाकत असे. ए दिले नादां या गाण्यासाठी त्यांनी कमाल अमरोही यांना शंभर अंतरे लिहून दिले होते. आपल्या हळूवार आवाजात ते आपले गीत वाचून दाखवत असत. जानिसार हे मुशायरांमध्ये शायरी करणारे शायर नव्हते. त्यांचा नाजूक आवाज त्यासाठी योग्य नव्हता. साहिर लुधियानवी यांच्याशी त्यांची पक्की मैत्री होती. मात्र ही मैत्री तुटल्यानंतर त्यांच्या शायरीमध्ये परिवर्तन झाले आणि त्यानंतर त्यांनी लिहिलेले शब्दांनी उर्दू शायरी संपन्न झाली.
‘जब शाख कोई हाथ लगाते ही चमन में,
शर्माए लचक जाए तो लगता है कि तुम हो,
ओढ़े हुए तारों की चमकती हुई चादर,
नद्दी कोई बलखाये तो लगता है कि तुम हो’
आपल्याच लिहिलेल्या ‘आदमी जिस्म से नही दिलो दिमाग से बूढा होता है’ या वाक्यानुसार ते आयुष्याच्या अखेरपर्यंत जवान होते. तारुण्यातील उत्साहाने ते महफिल आणि मुशायरांमध्ये आपली शायरी गाजवत राहिले, रसिकांना आनंद देत राहिले.
‘और क्या इस से ज्यादा कोई नर्मी बरतूं,
दिल के जख्मों को छुआ है तेरे गालों की तरह।
और तो मुझको मिला क्या मेरी महनत का सिला,
चन्द सिक्के हैं मेरे हाथ में छालों की तरह।’
साफिया यांच्या अचानक झालेल्या मृत्यूने त्यांच्या भंगलेल्या भावविश्वातून लिहिलेल्या रुबाया उर्दू शायरी समृध्द करून गेल्यात…
आहट मेरे क़दमों की सुन पाई है,
इक बिजली सी तनबन में लहराई है,
दौड़ी है हरेक बात की सुध बिसरा के
रोटी जलती तवे पर छोड़ आई है,
डाली की तरह चाल लचक उठती है,
खुशबू हर इक सांस छलक उठती है,
जूड़े में जो वो फूल लगा देते हैं
अन्दर से मेरी रूह महक उठती है,
हर एक घडी शाक (कठिन) गुज़रती होगी,
सौ तरह के वहम करके मरती होगी,
घर जाने की जल्दी तो नहीं मुझको मगर…
वो चाय पर इंतज़ार करती होगी
अशा या नर्मदिल शायराने 9 ऑगस्ट 1976 ला या दुनियेला अलविदा म्हटले. त्यांचा मुलगा जावेद अख्तर याने त्यांच्या शायरीची परंपरा पुढे सुरु ठेवली आहे.
– योगेश शुक्ल (9657701792)