<
साक्षरतेचे कार्य रेडिओ करीत असल्याने ते पॉवरफुल माध्यम- प्रा.डॉ.श्रीकांत चौधरी
जळगाव : रेडिओचा जनक गुग्लीमो मार्कोनी यांच्या शोधामुळे जगात संवाद क्षेत्रात क्रांती झाली. रेडिओच्या विकासामुळे ज्ञानाची गंगा वाहू लागली. अशिक्षित, अर्धशिक्षित नागरिकांना रेडिओमुळे उपयुक्त माहिती मिळू लागली आहे.त्यामुळे एक प्रकारे साक्षरतेचे कार्य रेडिओ करीत असल्याने ते पॉवरफुल माध्यम आहे, असे प्रतिपादन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील गणितशास्त्र प्रशाळेचे संचालक प्रा.डॉ.श्रीकांत चौधरी यांनी केले.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील जनसंवाद आणि पत्रकारिता विभागातर्फे दि. १४ व १५ फेब्रुवारी रोजी जागतिक रेडिओ दिनानिमित्त “रेडीओ कार्यक्रम निर्मिती,वृत्तसंपादन आणि कौशल्य” याविषयावर द्विदिवसीय विद्यापीठस्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेचे उद्घाटक म्हणून डॉ.चौधरी बोलत होते.अध्यक्षस्थानी कला व मानव्यविद्या प्रशाळाचे संचालक डॉ.अनिल चिकाटे होते. मंचावर आकाशवाणीचे वार्ताहर राजेश यावलकर, विभागप्रमुख डॉ. सुधीर भटकर, कार्यशाळा समन्वयक डॉ. विनोद निताळे उपस्थित होते. प्रारंभी रेडिओचे बटन सुरु करून जळगाव आकाशवाणी केंद्राचे प्रसारण ऐकवून कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर प्रस्तावनेत डॉ. सुधीर भटकर यांनी, रेडिओच्या कार्यक्रम निर्मिती आणि बातमी लेखनातील माहिती सविस्तरपणे विद्यार्थ्यांना मिळावी यासाठी कार्यशाळेचे आयोजन केल्याचे सांगितले.
प्रा.डॉ.चौधरी यांनी पुढे बोलताना सांगितले की, पूर्वीच्या काळी रेडिओचे आकर्षण होते.पहिल्या जागतिक युद्धात माहिती प्रसारणासाठी रेडिओचा प्रथमच वापर झाला. युद्धाची माहिती रेडीओमार्फ़त लोकांना कळत होती. विविध क्षेत्रातील माहिती व शासकीय योजना रेडिओमुळे माहिती होतात, असेही डॉ.चौधरी म्हणाले.
अध्यक्षीय भाषणात डॉ. चिकाटे यांनी, रेडिओ ज्ञानसंवर्धनाचे काम करीत असून या क्षेत्रात रोजगाराच्या संधी देखील खूप आहेत. भाषा प्रभुत्व, चौफेर वाचन असेल तर या क्षेत्रात कौशलप्रवण होता येते, असे सांगितले.सूत्रसंचालन धनश्री राठोड हिने केले. आभार मयूर पाटील याने मानले. यावेळी डॉ.सोमनाथ वडनेरे, डॉ.गोपी सोरडे, प्रा.विश्वजीत चौधरी, धुळे येथील एसएसव्हीपीएस महाविद्यालयातील पत्रकारिता विभागाचे प्रा.प्रतिक कुळकर्णी,डॉ. मिलिंद पाटील उपस्थित होते.
दिवसभरातील मार्गदर्शन
कार्यशाळेत प्रथम सत्रात राजेश यावलकर यांनी “रेडिओसाठी बातमी व वार्तापत्र लेखन” याविषयी मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की,आकाशवाणी वर बातमी लेखन करताना वाक्य रचना सोपी असावी. बातमीचा फक्त गाभा लिहावा. आकाशवाणीचे बातमीपत्र ८० ते १०० शब्दात असते. वाक्ये सुसंगत असावी, असे सांगत वार्तापत्र कसे लेखन करतात आणि बातम्या कशा दिल्या जातात त्याबाबत सविस्तरपणे यावलकर यांनी सांगितले. बातम्यांची निवड करताना ती नागरिकांच्या जिव्हाळ्याची, स्वारस्याची, महत्वाची असेल असे पाहावे लागते, असेही त्यांनी सांगितले.परिचय गणेश साळुंखे याने करून दिला तर सूत्रसंचालन वैशाली पाटील हिने केले.
द्वितीय सत्रात डॉ.उषा शर्मा यांनी “रेडिओसाठी लेखन व उदघोषणा तंत्र” याबाबत बोलताना विद्यार्थ्यांना सांगितले की,उदघोषकाचा आवाज शांत, संयमी आणि मधुर हवा. वाणी शुद्ध हवी. वाचन, मनन, स्मरण यामुळे आत्मविश्वास दुणावतो. भाषेचे सौदर्य, अलंकारिता आली पाहिजे असे सांगून डॉ.शर्मा यांनी मुलाखत तंत्र, संहिता लेखन, नाट्यलेखन यातील बारकावे विद्यार्थ्यांना सांगितले. परिचय मनिष मराठे याने करून दिला.
कार्यशाळेत आज
कार्यशाळेच्या दुसर्या दिवशी सकाळी १०.३० वाजता पहिल्या सत्रात जळगाव आकाशवाणी केंद्राचे कार्यक्रम अधिकारी ज्ञानेश्वर बोबडे हे तर द्वितीय सत्रात औरंगाबाद येथील 94.3 माय एफ एम केंद्राचे आर.जे.अभय हे मार्गदर्शन करणात आहेत. या कार्यशाळेस इच्छुकांनी उपस्थिती द्यावी असे आवाहन विभागप्रमुख डॉ.सुधीर भटकर, डॉ.विनोद निताळे यांनी केले आहे.