<
रसिकांच्या आग्रहास्तव ‘एपिक सिझन टू’ प्रदर्शनास मुदतवाढ
जळगाव- प्रतिनिधी – ‘मी मोबाईल वापरत नाही. मोबाईल विषयी माझे मत फारशे चांगले नव्हते; मात्र दृष्यकलेला महत्त्व देणाऱ्या एपिक प्रदर्शनाला भेट दिल्यानंतर मोबाईलचा असाही सुंदर उपयोग होऊ शकतो हे समजले. मोबाईलच्या या कलाकृतींमुळे दृष्यकलेला महत्त्व देणारा मोबाईल वापरावा की, काय असाही विचार मनात येतोय’ असे विचार ज्ञानपीठ पुरस्कार विजेते पद्मश्री डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी मांडले.
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या 57व्या वाढदिवसानिमित्त सहकाऱ्यांनी मोबाईलद्वारे काढलेल्या उत्कृष्ट छायाचित्रांचे सलग दुसऱ्यावर्षी भाऊंच्या उद्यानामध्ये प्रदर्शन अयोजित केले आहे. या प्रदर्शनातील पब्लिक पोलच्या उत्कृष्ट पाच आणि अशोक जैन यांनी निवड केलेल्या पाच छायाचित्र विजेत्यांना डॉ.भालचंद्र नेमाडे यांच्याहस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान ज्येष्ठ कलाशिक्षक व छायाचित्रकार सुधाकर संधानशिवे यांनी भूषविले. जाहिरात क्षेत्रातील ज्येष्ठ मार्गदर्शक आनंद गुप्ते, जैन फार्मफ्रेश फूड्स लि. चे कार्यकारी संचालक सुनील देशपांडे, जैन परिवारातील सदस्य अमोली जैन व जैन इरिगेशनचे वरिष्ठ सहकारी, तसेच प्रदर्शनात सहभागी सर्व सदस्य परिवारासह उपस्थित होते. वानखेडे गॅलरीतील प्रदर्शनाला भेट दिल्यानंतर डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी प्रदर्शनाचे कौतुक केले. महिला फोटोग्राफरला विशेष पारितोषिक देण्याच्या सूचना देत समाजातील महिला शक्तीचे महत्त्व डॉ. नेमाडे यांनी अधोरेखित केले.
वोटिंगच्या माध्यमातून छायाचित्रांची निवड
कलेची दृष्टी असलेल्या रसिकांनी ‘एपिक सीझन टू’ प्रदर्शनाला उत्फूर्त प्रतिसाद दिला. रसिकांना वोटिंगच्या माध्यमातून पाच छायाचित्र निवडण्याची विनंती आयोजकांनी केली होती. पिरॅमिड आणि प्रीझमच्या परावर्तित प्रकाशाचा अन्वयार्थ उलगडणारी सुंदर ट्रॉफी व जैन फार्मफ्रेश फूड्स लि.ची उत्पादने गिफ्ट देऊन विजेत्यांना गौरविण्यात आले. प्राधान्यक्रमाने निवडलेले विजेते (पब्लिक पोल) अनुक्रमे असे प्रथम अक्षय भंडारी, रवींद्र कुलथे, हिमांशू पटेल, शशिकांत महानोर, तुषार बुंदे तर अशोक जैन यांनी निवड केलेल्या उत्कृष्ट छायाचित्र अनुक्रमे प्रथम ज्ञानेश्वर सोनोने, अभंग जैन, अक्षय भंडारी, ललित हिवाळे, विक्रम अस्वार हे ठरले. महिला विभागातून विशेष फोटोग्राफीचा सन्मान आशुली जैन यांना प्राप्त झाला.
रसिकांच्या आग्रहास्तव प्रदर्शनास 19 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
अशोक जैन यांच्या वाढदिवसानिमित्त मोबाईलच्या डिटेल्ससह आयोजित एपिक सीझन टू छायाचित्र प्रदर्शनाला जळगावकर रसिकांनी उत्फूर्त प्रतिसाद दिला आहे. दि.9 फेब्रुवारीपासून आयोजित प्रदर्शनाचा रविवारी समारोप होणार होता मात्र; कलेची दृष्टी असलेल्या रसिकांच्या आग्रहास्तव दि. 19 फेब्रुवारीपर्यंत या प्रदर्शनास मुदतवाढ देण्यात आली असल्याने जळगावकरांना या कलाकृती अनुभवता येणार आहे.
पारितोषिक वितरण सोहळ्याचे प्रास्ताविक विजय जैन यांनी केले. सूत्रसंचालन ज्ञानेश्वर शेंडे यांनी केले. यशस्वीतेसाठी जैन इरिगेशनच्या सर्व सहकाऱ्यांनी सहकार्य केले.