<
सर्वाेत्तम एकांकिकांनी महोत्सवात भरले रंग;भाऊंना अभिनयातून वाहिली भावांजली
परिवर्तन आयोजित भवरलाल जैन भावांजली महोत्सवाच्या दुस-या दिवशी महाराष्ट्रभर गाजलेल्या दोन एकांकिकांनी जळगावकर रसिक प्रेक्षकांच्या मनाला भुरळ घातली.
रसिक प्रेक्षकांना हसवता हसवता डोळ्याच्या कडा ओलावल्या, अंतर्मुख करायला लावणारे सादरीकरण नुतन मराठा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी हलगी सम्राट एकांकिकेतून केले.
हनुमान सुरवसे लिखित व दिग्दर्शित या एकांकिकेतील हर्षा शर्मा, राहुल सोनवणे, प्रेम बडगुजर, हनुमान सुरवसे यांनी आपल्या अभिनयातून वातावरणात हलगी सम्राट एकांकिका खुलवली. हलगी सम्राट होण्याची अनावर इच्छा व ओढ यातून एकांकिका रंगते. वडिलांचे स्वप्न व कलेची आवड यातील कुचंबणा यात दिसून आली.
यानंतर प्रताप महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दत्ता पाटील लिखित व नितीन सावळे दिग्दर्शित “कस्टमर केअर” ही एकांकिका सादर केली. शेती आणि शेतक-यांच्या प्रश्नांना , तरूणाला साद घालत शहरी विचार व संस्कृतीचे दर्शन घडविले. कॉल सेंटरमध्ये काम करणारी एक तरुणी मोबाईलवर शेतीत काम करणाऱ्या तरूणाशी सवांद साधते, हाच संवाद प्रेक्षकांना प्रचंड भावला. यात प्रमुख भूमिका ज्ञानेश्वर पाटील व मेघा गौरी घोडके, मितूल पाटील यांच्या प्रमुख भूमिका होत्या.
आज या कार्यक्रमाला नगरसेवक व नाट्यकर्मी अनंत जोशी , शोभाताई पाटील, प्रसिद्ध चिकित्सक डॉ शशिकांत गाजरे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे वैशिष्ट्ये – सभागृह गर्दीने ओसंडून वाहत होते. जागे अभावी अनेकांना परत जावं लागत होतं.
उद्या रविवारी सायंकाळी ६ :३० वा
“वेणुत्सव” योगेश पाटील व सहका-यांचा ४५ बासरी वादकांचे बासरी वादन