<
समाज प्रबोधन करण्या करीता शिक्षणाची गरज नाही.समाजसेवा हे सुशिक्षित माणसाचे काम नाही. ते फक्त नोकरी करून पैसा कसा कमाविता येतो आणि त्यासाठी किती खोटे बोलण्याचे कैशल्य त्याच्या अंगी आहे यावर ते ठरते. भारत कृषिप्रधान देश आहे या देशातील कृषिचे मालक असणारे शेतकरी आज जास्त आत्महत्या करतात. कारण ते सुशिक्षित नाही लिहण्या वाचन्या पुरते त्याचे शिक्षण असते. म्हणुन त्याला ऐनवेली कृषि उत्पन्न बाजार समितितील दलाल अडते व व्यापारी लुटतात. त्याच्या शेतातील उत्पादित मालाचा भाव पडतात. त्याच वेळी सुशिक्षित बँक अधिकारी आपले कैशल्य दाखवतात. त्यात कोणत्या ही धर्माची माणस मागे नसतात. का होते असे?. हा मोठा प्रश्न आहे. म्हणून संत गाडगेबाबा यांची आठवण येते. गाडगेबाबा चे शिक्षण आणि त्याच्या समाज प्रबोधन करण्याची किर्तनाची पद्धत पाहिली तर ते उच्च शिक्षित वाटतात. पण ते उच्च शिक्षित नव्हते असे आजच्या तरुणांना सांगितले तर पटणार नाही.
पोथी पुराणातील कथा सांगुन आजच्या विज्ञान युगात अंधश्रद्धा बनविणारे प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्त देशमुख महाराज इंदूरीकर आपल्या छोट्या गोष्टीमुळे राज्यात सोशल मीडियावर प्रिंट मीडियावर गाजत आहेत. त्यांचे प्रबोधन मार्मिक असते आणि सत्य परिस्थिती वर प्रहार करणारे असते. पण अतिउत्साही पणे अज्ञान, अंधश्रद्धेला खतपाणी घातल्यामुळे आज पर्यतच्या प्रबोधनावर पाणी फिरले. विज्ञान मान्य असेल तर धर्मानी नव्हे तर भटाब्रह्मणांनी निर्माण केलेले अज्ञान अंधश्रद्धा यावर वर केलाच पाहिजे. असे माणसाच्या मनातील घाण साफ करण्याचे काम नियमितपणे करणारे संत, बाबा, महाराज आज शोधूनही सापडणार नाहीत. सरकारच्या ग्राम स्वछता अभियानाच्या जाहिराती वर्षातुन दोन वेळा येतात.
एक जयंती दिनी दूसरी स्मुर्ती दिनी तेव्हाच सरकारला गाडगेबाबाची आठवण येते. गाडगेबाबाचे तत्वज्ञान मानव मुक्ति करणारे होते ते आजही सर्व समाजाला चिंता मुक्त करणारे आहे. ते समजुन घेण्यास सुशिक्षित समाज कमी पडतो. आज प्रत्येक जन आपला कुटुंबा पुरता विचार करतो. घर, परिसर, गांव स्वछ ठेवा हा मंत्र त्याकाळी गाडगेबाबानी सांगितला होता.आज कोणता ही सुशिक्षित माणूस असा विचार करीत नाही. पण गाडगे बाबा यांचा दहाकलमी कार्यकर्म १) भूकेलेल्यांना – अन्न, २)तहानलेल्याना – पाणी , ३) उघड्या नागड्या ना – वस्त्र,कपडा, ४) गरीब मुलामुलींना – शिक्षणा साठी मदत, ५) बेघरांना – आसरा, ६) बिमार लोकांना – औषधोपचार , ७) बेकारांना – रोजगार, ८) मुक्या प्राण्यांना – अभय , ९) गरीब मुलीमुलाचे – लग्न, १०) गोरगरीबना – शिक्षण, हा त्यांनी खेड्या पाड्यात राबविला.
संत गाडगेबाबा यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील शेण गांव येथे झाला होता.त्यांचे पूर्ण नांव डेबूजी झिंगराजी जानोरकर असे होते, आईच्या माहेरी म्हणजे मूर्तिजापूर तालुक्यातील दापुरे गांवात मामाच्या घरी त्यांचे बालपण गेले होते.शेतीत काम आणि गुरांची राखणी करण्यात त्यांना विशेष आवड होती. ते परीट (धोबी) समाजाचे होते. गाडगेबाबा यांचा जन्म २३ फेब्रुवारी १८७६- मुत्यु २० डिंसेंबर १९५६ झाला. खेड्यापाड्यातील गावागावात मंदिरासमोर भजन करीत आणि विचारत बापो हो ईश्वर,देव कशात आहे?.देवा बाबत लोकात असणारी श्रद्धा, अंधश्रद्धा, अज्ञान, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने समाज प्रबोधन करणारे कार्य करीत होते. “तीर्थी धोंडापाणी देव रोकडा सज्जनी ” असे सांगत दीन, दुबळे, अनाथ, अपंगांची सेवा करणारे थोर संत म्हणजे गाडगेबाबा. “देवळात जाऊ नका, मूर्तिपूजा करू नका, सावकाराचे कर्ज काढू नका, अडाणी राहू नका, पोथी-पुराणे, मंत्र-तंत्र, देवदेवस्की, चमत्कार असल्या गोष्टींवर विश्वास ठेऊ नका.” अशी शिकवण आयुष्यभर त्यांनी लोकांना दिली.
आज ते असते तर डॉक्टर नरेंद्र दाभोलकर ऐवजी ते गेले असते माणसात देव शोधणार्या या संताने लोकांनी दिलेल्या देणग्यांतील पैशातून रंजल्या-गांजल्या, अनाथ लोकांसाठी महाराष्ट्रात ठिक ठिकाणी धर्मशाळा, अनाथालये,आश्रम आणि विद्यालये सुरू केली होती. तेव्हा ते शिक्षण सम्राट होऊ शकले असते. पण त्यांनी रंजले-गांजले, दीन-दुबळे, अपंग-अनाथ यांच्यात देव शोधला. या खऱ्याखुऱ्या देवांतच गाडगेबाबा अधिक रमत असत. डोक्यावर झिंज्या, त्यावर खापराच्या तुकड्याची टोपी, एका कानात कवडी, तर दुसर्या कानात फुटक्या बांगडीची काच, एका हातात झाडू, दुसर्या हातात मडके असा त्यांचा वेश असे.
दिनांक १ फेब्रुवारी, १९०५ रोजी त्यांनी घरादाराचा त्याग करून संन्यास स्वीकारला. त्यांनी तीर्थाटन केले, अनेक ठिकाणी भ्रमण केले. वनवासातही त्यांनी लोकसेवेचे व्रत सोडले नाही. कोठे कोणी अडचणीत सापडलेला असल्यास त्याला आपण होऊन मदत करायला धावायचे, मदत करून कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता आपल्या वाटेने निघून जायचे हा त्यांचा खाक्या असायचा. ते सतत एक खराटा जवळ बाळगायचे. अंगावर गोधडीवजा फाटके-तुटके कपडे आणि हातात एक फुटके गाडगे असा त्यांचा वेष नेहमी असे. त्यामुळेच लोक त्यांना ‘गाडगेबाबा’ म्हणू लागले. ते ज्या गावात जात तो गाव झाडून स्वच्छ करीत. सार्वजनिक स्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलन ही तत्त्वे समाजात रुजविण्यासाठी त्यांनी जिवापाड प्रयत्न केले.
गाडगेबाबाना डॉ.बाबासाहेब आंबेडकर गुरु मानत तेव्हा त्यांनी सांगितले मी कुणाचा गुरु नाही आणि माझा कोणी चेला नाही. १४ जुलै १९४१ ला गाडगेबाबांची प्रकृती ठीक नव्हती. महानंदसामी नावाच्या त्यांच्या चाहत्याने मुंबईत आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना गाडगेबाबांची माहिती दिली. बाबासाहेब तेव्हा भारताचे कायदेमंत्री होते. आणी त्यांना संध्याकाळच्या ट्रेनने दिल्लीला रवाना व्हायचे होते. गाडगेबाबांचा निरोप मिळताच त्यानी सर्व कामे बाजूला ठेवली. आणि दोन घोंगड्या विकत घेऊन ते महानंदसामीसह रुग्णालयात गेले. कोणाकडून काही न घेणार्या गाडगेबाबांनी बाबासाहेबांकडून दोन घोंगड्या स्वीकारल्या. आणि म्हणाले “डॉ. तुम्ही कशाला आले? मी एक फकीर. तुमचे एक मिनिट महत्त्वाचे आहे. तुमचा किती मोठा अधिकार आहे. तेव्हा बाबासाहेब म्हणाले बाबा माझा अधिकार दोन दिवसाचा. उद्या खुर्ची गेल्यावर मला कोणी विचारणार नाही. तुमचा अधिकार मोठा आहे. या प्रसंगी बाबासाहेबांच्या डोळ्यात अश्रू होते. कारण असा प्रसंग पुन्हा जीवनात येणार नाही हे दोघेही जाणत होते. तेव्हा पासून बाबासाहेबाला मानणारा समाज प्रत्येक ठिकाणी गाडगेबाबाचा आदर्श गुरु म्हणुन उल्लेख करू लागला. कोणते हि कार्यक्रम असो भाषणाची सुरवात बाबासाहेबाच्या आदर्श गुरुच्या विचाराला आणि प्रतिमेला वंदन केल्या शिवाय पुढे भाषण करीत नाही. हि पद्धत बहुजन आंबेडकरी चळवळीत निर्माण झाली आहे. त्यामुळे बाबासाहेबाच्या फोटो बरोबर गाडगेबाबाचा फोटो घराघरात असतो. उलट गाडगे बाबाच्या समाजाने आज ही बाबांना स्वीकारले नाही. ९० टक्के लोकाच्या घरात गाडगेबाबाचा फोटो नसतो. लग्न कार्य किंवा कोणताही कार्यक्रमत त्याच्या नांवाचा उल्लेख नसतो. फोटोचा प्रश्नच नाही. म्हणजे ज्यासामाजातील एक संत सर्व समाजा करिता एवढा आदर्श निर्माण करतो त्याचा आदर्श त्याच्या समाजाने न घेणे हे खुप दुर्दव्य म्हणावे लागेल. काही संघटना जनजागृतीसाठी प्रयत्नशील आहेत. पण हिंदुत्वाची चौकट रूढी-परंपरा दूर करण्यासाठी त्यांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले. त्याचा उल्लेख टाळून काम करतात. गाडगेबाबा आपल्या कीर्तनात ते श्रोत्यांनाच विविध प्रश्न विचारून त्यांना त्यांच्या अज्ञानाची, दुर्गुण व दोषांची जाणीव करून देत असत. तसाच प्रयत्न त्याच्या समाजातील संघटना नी करायला पाहिजे. त्यांचे उपदेशही साधे, सोपे असत. चोरी करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, व्यसनांच्या आहारी जाऊ नका, देवा-धर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका, जातिभेद व अस्पृश्यता पाळू नका असे ते आपल्या कीर्तनातून सांगत.
देव दगडात नसून तो माणसांत आहे हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला.त्यामुळे बहुजन चळवळीत आदर्श संत म्हणून कायम आहेत आणि राहतील त्याच्या जयंती निमित्य त्यांना विनम्र अभिवादन व सर्वाना हार्दिक शुभेच्छा !. आजचा रोकडा धर्म आहे ! हीच खरी भक्ती व देवपूजा आहे !!
सागर रामभाऊ तायडे – ९९२०४०३८५९ ,भांडूप मुबई,