<
जळगाव – (प्रतिनिधी) – ‘भाऊंना भावांजली’ ह्या महोत्सवाच्या आठव्या दिवशी डॉ. अपर्णा भट-कासार संचालित प्रभाकर कला संगीत अकॅडमीच्या कलाकारांनी नृत्य सादर केले.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जैन उद्योग समूहाचे आ. अशोक जैन, उद्योजक अनिल माळी, आनंद मल्हारा, जयश्री वानखेडे व मनोज गोंविंदराव हे उपस्थित होते.
‘महिषासुर मर्दिनी स्त्रोत’, ‘कृष्ण भजन’, ‘चंद्रभागेच्या तीरी’, ‘श्रीरामचंद्र’, ‘विठू माझा लेकुरावाळा’, ‘सुंदर ते ध्यान’, ‘प्रभू मेरे’ या सारख्या भक्ती रसाने ओथंबलेल्या व वारकरी परंपरेतील अनेक संतांच्या रचना सादर करण्यात आल्या. मुळात या महोत्सवाचं वैशिष्ठे म्हणजे महोत्सवाची सुरुवात ‘तीर्थ विठठल क्षेत्र विठ्ठल’ याने झाली. शेती माती पाणी यांच्याशी नातं आणि वारकरी परंपरेचं नातं घट्ट आहे. त्या परंपरेशी मोठ्या भाऊंची नाळ ही देखील पक्की होती. या संत परंपरेचा परीघ काल शबनम विरमानी यांच्या ‘संत कबीर’ यांची भजने व दोहे ह्यांनी विस्तारला आणि आज संत मिरेच्या ‘मेरे ते गिरीधर गोपाल’ ह्या भजनावरचे नृत्य अशा गोष्टींमुळे एक अध्यात्मिक परिमाण या महोत्सवाला लाभले आहे. परिवर्तनाचा हा भाऊंना भावांजली महोत्सव केवळ करमणूक नाही, तर अध्यात्मिक प्रगल्भ जाणिवेचा प्रबुद्ध आविष्कार आहे, असा सूर मान्यवर व रसिकांमध्ये होता. जैन उद्योग समूहाची चेअरमन श्री अशोक भाऊ जैन पूर्ण वेळ कार्यक्रमाचा आस्वाद घेत होते.
राधिका सरोदे, शिवानी जोशी, ऋतुजा महाजन, दिशा ढगे, शलाका कानगो, मृण्मयी कुलकर्णी, रूची महाजन व मृणाल सोनवणे ह्या कलाकारांनी अप्रतीम नृत्याविष्कार सादर करत रसिकांची दिलखुलास दाद मिळवली.
उद्या ह्या महोत्सवाची सांगता ‘गांधी नाकारायचाय पण कसा?’ ह्या शंभु पाटील लिखित नाटकाच्या अभिवाचनाने होणार आहे. विठ्ठलापासून सुरू झालेला प्रवास गांधी पर्यंत येऊन थांबणार आहे. परवा एक मार्च रोजी चित्रकला प्रदर्शनात परिवर्तन चित्र साक्षरता हा परिसंवाद होणार आहे.