<
रायसोनी महाविध्यालयात मिरवणुकीने व प्रा. शेख यांच्या व्याख्यानाने “शिवमहोत्सवाचा” समारोप
जळगाव, ता. २९ : छत्रपती शिवराय केवळ स्वराज्याचेच संस्थापक होते असे नाही, तर जाती, धर्मात व वतनदारीत अडकलेल्या भारताच्या राष्ट्रनिर्मितीचे संस्थापकही आहेत, असे प्रतिपादन शिवव्याख्याते व प्रा. जावेद शेख यांनी केले. शिवरायांनी शेतकरी व स्त्रिया या दोन्ही घटकांचा प्रचंड सन्मान केला. आजच्या राज्यकर्त्यांनी हा वारसा जतन करण्याचेही कार्य करावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त जी. एच. रायसोनी व्यवस्थापन व अभियांत्रिकी महाविध्यालयात ता. १९ ते २९ पर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. येथील शिवमहोत्सवातील समारोप कार्यक्रमात भव्य मिरवणूक काढण्यात आली तसेच नाशिक येथील प्रा. जावेद शेख यांचे ‘युवकांचे राजे-छत्रपती शिवाजी’ या विषयावर व्याख्यान झाले. यावेळी अध्यक्षस्थानी रायसोनी तंत्रनिकेतनचे प्राचार्य तुषार पाटील होते. प्रा. शेख आपल्या मनोगतात पुढे म्हणाले की, शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वी शेकडो वर्षांपासून भारतात राजेराजवाडय़ांची जुलमी राजवट होती. मोगलकर्त्यांनी जनतेवर अत्याचार, लूट केली. या प्रस्थापित राज्य व्यवस्थेविरोधात संघर्ष करण्याचे सामर्थ्यही तत्कालीन प्रजेत नव्हते. जुलमी राजवटीविरोधात लढण्याऐवजी निपचित पडलेल्या प्रजेच्या मनात स्वराज्याचा अंगार शिवरायांनी चेतविला. यापूर्वी कोणत्याही जुलमी राजाविरोधात साधा दगड भिरकावण्याची हिंमतही कोणी दाखवली नाही. अशा पीडित जनतेला शिवरायांनी जागृत केले. शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होणार नाही याची काळजी शिवरायांनी घेतली. शत्रूकडील स्त्रीचाही सन्मान केला. जाती-पातीत वाटल्या गेलेल्या लोकांमधून केवळ गुणवत्तेच्या आधारावर मावळे, सेवेत अधिकारी नेमले. महात्मा फुले यांनी शिवरायांची समाधी शोधून पोवाडा लिहिला. कारण ते कुळवाडीभूषण होते. आजच्या राज्यकर्त्यांनी किमान शेतकरी आणि स्त्रियांचा सन्मान, गौरव करण्याचे देखील काम केले. छत्रपती शिवाजी महाराज हे तीन शब्द नुसते उच्चारले की सर्रकन अंगावर काटा उभा रहातो. महाराष्ट्रातच नाही,भारत देशातच नाही तर संपुर्ण विश्वात अतुलनीय्,अद्वितीय्,अलौकीक असा दुसरा शिवाजी राजा सापडण अवघड आहे.जगातल्या साहसी,पराक्रमी आणि सफल अशा राजांमध्ये शिवाजी महाराजांचा समावेश करावाच लागेल असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. रायसोनी कनिष्ट महाविद्यालयाचे प्राचार्य प्रल्हाद खराटे, सिव्हील विभागाचे प्रा. शंतनू पवार हे व्यासपीठावर उपस्थित होते तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भूषण अडकमोल व प्रगती पाटील यांनी केले. सदर शिव महोत्सवासाठी सागर सावंत, यश पाटील, अजिंक्य वडनेरे, प्रथमेश पाटील, प्रज्वल पाटील, संदीप सोनार, ध्रुव अग्रवाल, उज्वल जा, तेजस अत्तरदे, गणेश पाटील, अंकेश गुप्ता, गणेश शर्मा या विध्यार्थ्यानी मेहनत घेतली.