<
जळगाव-(प्रतिनिधी) – येथील समाजकल्याण संचालनालय, पुणे संचलित शासकीय मागासवर्गीय तथा आर्थिकदृष्ट्या मागास मुलांचे शासकीय वस्तीगृह ह्या ना त्या कारणाने नेहमीच चर्चेत असते, कधी घाणीचे साम्राज्य तर कधी विद्यार्थ्यांच्या भोजनाच्या तक्रारी या वसतिगृहातील नित्याचे झाले आहे. असाच प्रकार आज देखील घडलेला आहे, निकृष्ट दर्जाचे भोजन असल्याने विद्यार्थ्यांनी अधीक्षकांकडे तक्रारी केल्या, विद्यार्थ्यांनी दुपारचे जेवण देखील घेतलेले नाही, संध्याकाळी विद्यार्थ्यांनी भोजनाची तक्रार अधीक्षकांकडे केली की, भोजन चांगल्या दर्जाचे दिले जात नाही,परंतु अधीक्षकाने अरेरावीच्या भाषेमध्ये विद्यार्थ्यांना सांगितले की जेवायचे तर जेवा नाही तर घरी जा असे सांगून अधिक्षक निघून गेले. परंतु विद्यार्थी अजून देखील उपाशीच आहेत, असे वस्तीगृहातील काही विद्यार्थ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. तसेच विद्यार्थ्यांनी सांगितले की रोजचे भोजन हे शासन नियमानुसार व मेनुनुसार देण्यात येत नाही. भोजनाचा ठेका धुळ्याच्या ठेकेदाराला दिल्याने अशा घटना वारंवार घडत आहेत असे मत काहींनी व्यक्त केले. तर अधिक्षकांना मॅनेज करुन निकृष्ट दर्जाचे भोजन पुरवठादार पुरवत असल्याचे देखील विद्यार्थ्यांनी सांगितले. याबाबत माहिती घेण्यासाठी अधिक्षक एस आर पाटील यांना संपर्क साधला असता होऊ शकला नाही. विद्यार्थी उपाशी असल्याने सर्वच स्तरावरून संताप व्यक्त केला जात आहे. समाज कल्याण अधिकारी यांचा वसतिगृह अधिक्षकांवर वचक नसल्याने अशा घटना नेहमीचेच झाल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणी वस्तीगृह अधिक्षक व भोजन ठेकेदारांवर कारवाई होईल का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.