<
जळगाव : ऍक्युपंक्चर थेरपीचा उगम हा भारतात झाला. मात्र त्याचा उपयोग हा इतर पाश्चात्य देशात अधिक प्रमाणात होत आहे. ऍक्युपंक्चरचा प्रचार व प्रसार व्हावा याकरिता शासन प्रयत्नशील असून इच्छुकांनी ऍक्युपंक्चर थेरपी शिकण्यासाठी पुढे यावे, असे प्रतिपादन प्रतिभा कोकंदे यांनी केले.
शहरात अक्युपंक्चर प्राथमिकता आणि उपचार प्रशिक्षण हि दोनदिवसीय कार्यशाळा नुकतीच घेण्यात आली. या कार्यशाळेत कोकंदे यांनी मार्गदर्शन केले. धकाधकीची जीवनशैली आणि जागतिक प्रदूषण ह्यामुळे विविध आजारांचे प्रमाण वाढत आहे. अक्युपंक्चर उपचाराद्वारे यावर उपचार करता येणे शक्य झाले आहे. यासाठी राज्य सरकारने अक्युपंक्चर उपचारासाठी एक कौन्सिलची स्थापना केली असून त्यामार्फत पात्रता परीक्षा घेण्यात येणार आहे. त्याला मुदतवाढ देखील देण्यात आलेली असून यामुळे तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.
प्रतिभा कोकंदे यांनी, दमा, सायटिका, विनाऔषधी पाठदुखी, कंबरदुखी, फ्रोजन शोल्डर, रक्तदाब, अर्धांगवायू या आजारावर उपचार घेता येतात. त्याला साईड इफेक्ट नाही असे सांगून अक्युपंक्चर उपचाराची प्राथमिक माहिती, करावयाचे विविध उपचार याविषयी देखील कार्यशाळेत प्रशिक्षण दिले. अक्युपंक्चर शास्त्र शरीरावर कसे कार्य करते आणि त्याद्वारे उपचार कसे करावे याची देखील माहिती डॉ. कोकंदे यांनी दिली. कार्यशाळेला प्रतिसाद मिळाला. यापुढील शिबीर मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात घेण्यात येणार असून त्यासाठी नावनोंदणी श्री हॉस्पिटल, रामानंद नगर रोड येथे सुरु आहे.