<
जळगाव : शहरात जागतिक अग्निहोत्र दिनानिमित्त १५ मार्च रोजी सामुहिक अग्निहोत्रचे आयोजन करण्यात आले आहे. हे अग्निहोत्र वैज्ञानिक कसोटीवर उत्तीर्ण झाले नसून ते अवैज्ञानिक आहे. या अग्निहोत्राद्वारे आजार बरा होतो हा दावा नागरिकांची दिशाभूल करणारा असल्याचे मत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जळगाव शाखेसह मराठी विज्ञान परिषदेने प्रसिद्धीपत्रकाद्वारे व्यक्त केले आहे.
अग्निहोत्र हे सिद्ध सायन्स म्हणजे विज्ञान म्हणुन पुढं येत आहे. एखादं विधान आपण विज्ञान म्हणुन सिद्ध करा, असे म्हणतो तेव्हा ते विधान अनेक कसोट्यांवर तपासावे लागते. पहिली कसोटी निरीक्षण, ती वस्तु तपासावी. अग्निहोत्र प्रक्रियेत गायीचे शेण, गाईचे तूप व चिमूटभर तांदुळ वापरतात. यांचे परिक्षण केले असता, हे सर्व पदार्थ जैविक व सेंद्रिय आहेत. त्यात कार्बनी संयुगे असतात. अग्निहोत्र करताना त्या पदार्थांचे ज्वलन केले जाते. ज्वलनासाठी आक्सिजन या वायुचा वापर होतो. ज्वलनाने कार्बन-डाय आक्साईड, कार्बन मोनाक्साईड व इतर प्राणघातक आॅक्साईड यासारखे वायु बाहेर टाकले जातात. स्वाभाविकच वायुप्रदूषण होते. प्रदुषण कमी होत नाही,हे सत्य आहे. अग्निहोत्र केल्याने वातावरण शुद्ध होते (खरं म्हणजे होतच नाही) असे क्षणभर मानू, पण दोन चिमुट तांदुळ, थोडं तूप आणि थोडं शेण यांच्या ज्वलनाने पृथ्वीवर असलेल्या भल्यामोठ्या क्षेत्रफळावर प्रभाव कसा असेल? असा सवाल अंनिस आणि मविपने विचारला आहे.
विज्ञानात एखाद्या विधानाची चिकित्सा करावी लागते. चिकित्सेच्या अभावामुळे खरं ज्ञान आणि विचार पुढे जावू शकत नाहीत याचे भान आपण हरपून बसलो. झापडबंद शिक्षणपद्धतीमुळे आमचा नागरिक सुशिक्षित होत नाही. आधुनिकता ही विचारात व आचारात यावी लागते. वैज्ञानिक दृष्टिकोन जपणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे.हे विसरता कामा नये. विज्ञानाच्या कसोट्यामध्ये तर्क, अनुमान, प्रचिती व नंतर प्रयोग असे येते. अग्निहोत्र या प्रक्रियेत जंतुविघातक, रोगप्रतिबंधक गुणधर्म असलेले पदार्थ बाहेर टाकले जातात व विश्र्वशांती प्राप्त होते, हा दावा विज्ञानाच्या कसोटीवर तपासून पाहणे आवश्यक आहे. एखाद्या व्यक्तीस आलेली प्रचिती सार्वत्रीक व वारंवारीता असावी लागते.या विधानावर अग्निहोत्र टिकणार नाही.
वैज्ञानिक संकल्पनांचा वापर करून अवैज्ञानिक समज पसरविण्याचा प्रयत्न करणं योग्य नाही .विज्ञानाच्या साहाय्याने देवी,प्लेग,कालरा आणि आता पोलिओ इ.रोग आटोक्यात आलेत. अग्निहोत्र तर फार प्राचीन आहे, मग जीवघेणे आजार, रोग कां बरे हटवू शकले नाहीत? अग्निहोत्रला शास्त्रीय आधार नाही. अग्निहोत्र माणसाला निरोगी व दिर्घायुषी राहण्यासाठी मदत करते, या विधानाची विज्ञानाच्या कसोटीवर तपासणी झाली पाहिजे असे म्हणणे महाराष्ट्र अंनिसतर्फे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा.डी.एस.कट्यारे, जिल्हा प्रधान सचिव सुनील वाघमोडे, अशोक तायडे, मोहन मेढे, आर.वाय.चौधरी यांनी तर मराठी विज्ञान परिषदेतर्फे सचिव प्रा.दिलीप भारंबे, प्रा.आर.ए.पाटील आदींनी मांडले आहे.