<
रिंकू पाटील पासून सुरु झालेली प्रेयसीच्या खुनाची मालिका संपण्याची लक्षणे नाहीत. अधून मधून अशा त-हेच्या बातम्या सातत्याने कानावर येत असतात. म्हणून तरुण मुलींनी प्रथम पासून कोणती सावधानता बाळगावी याचा विचार करणे गरजेचे आहे.
आपला मित्र कसा आहे याची योग्य पारख तरुणींनी केली पाहिजे.
- तो मित्र आपल्या मैत्रीकडे केवळ मैत्री म्हणून पाहतो आहे काय? आपण व्यक्ती म्हणून त्याला आवडतो की, फक्त शारीरिक आकर्षण वाटते, याचा अंदाज प्रत्येक तरुणीला यायला हवा.
- मित्र आपल्या बाबतीत फार पझेसिव्ह आहे काय? आपल्यावर तो सतत मालकी हक्क दाखवतो आहे काय? यावर तुम्ही बारीक लक्ष ठेवा व तसे जाणवले तर लगेच सतर्क व्हा. याबाबतची स्वत:ची नापसंती स्पष्ट करा.
- एखादा मुलगा तुम्ही मित्रमैत्रिणींच्या गटात असल्यात की वेगळा वागतो व तुम्ही एकटया भेटलात की वेगळा वागतो. वागण्यातला हा फरक तपासून पहा. फक्त तुम्ही दोघेच वारंवार भेटता आणि तुमची मैत्री घट्ट होत जाते. तुम्ही त्याच्या दिसण्याला, राहण्याला, बोलण्याला भुलून जाता, त्याच्यावर भाळता, त्याच्यावर प्रेम करु लागता तर ही एक नैसर्गिक घटना मानावी लागेल. परंतु तरीही या कालखंडात त्याचे वागणे कसे आहे हे तुम्ही बारकाईने व सतत पाहायलाच हवे.
- तुमचा मित्र सभ्य, सुसंस्कृत वाटतो कां? त्याच्या तोंडात शिव्या सहजतेने येतात? तोदुसऱ्या एखाद्या मुलीबद्दल, स्त्रीबद्दल, त्यांच्या चारित्र्याबद्दल गलीच्छ भाषेत शेरेबाजी करतो? तसे असेल तर ही मैत्री वेळेवारी आवरती घ्या.
प्रेम प्रकरण चालू असतांना घडणारा हिंसाचार अनेकदा लक्षात घेतला जात नाही. मस्ती, गंमत, एकमेकांच्या फिरक्या घेणे या सदरात या गोष्टी खपून जाऊ शकतात. परंतु यातूनच कधीकधी शारीरिक व मानसिक हिंसाचार घडतो. उदाहरण म्हणजे तुम्ही तुमच्या मित्राबरोबर गंमत म्हणून मस्ती करता करता तो तुमचा हात तुमच्या पाठीकडे वळवून पिरगाळतो. तुम्ही किंचाळता, तो हसतो, कधी कधी तुमच्या डोळयातून अश्रू आल्याशिवाय तो हात सोडत नाही. तुम्हाला हे विचित्र वाटते, लाजिरवाणे वाटते थोडी भीती वाटते. बराच रागही येतो. पण तुम्ही हसून साजरे करता. कारण हसले नाही तर तुमचा मित्र, ‘तुला थोडीसुध्दा थट्टा कळत नाही’ म्हणून तुम्हालाच हिणवतो, मग तुम्हालाही वाटते यात काही फारसे गैर नाही.
काही वेळा चार चौघात त्याचे तुमच्याबद्दलचे बोलणे तुम्हाला खटकते. तुमच्याबद्दलकाही हीन पातळीवरचे विनोद तो जाहीरपणे करतो किंवा काही शारीर शेरेबाजी करतो. हे विनोद ही शेरेबाजी यात एकप्रकारचा पध्दतशीरपणा तुम्हाला जाणवतो. हा भावनिक हिंसाचार झाला असे तुमच्या लक्षात येण्यास मात्र उशिर लागतो. तुमची पर्स तो हक्काने खेचून घेतो, उघडतो. त्यातल्या खाजगी गोष्टींचेही सर्वांसमोर प्रदर्शन करतो. ही वास्तविक चीड आणणारी गोष्ट आहे. पण तुम्ही चारचौघात याबाबत काहीच करु शकत नाही. स्वत चा राग अपमान गिळून टाकता व हे देखील तुम्हाला सवयीचेच होऊन जाते.
काही गोष्टींना वेळेवर प्रतिबंध करायला हवा.
- तुम्हाला डबलसीट घेऊन स्कूटर, जोरात चालवणे, मोटारीचा वेग प्रचंड वाढवलेला ठेवणे व अगदी शेवटच्या क्षणी ब्रेक दाबणे हे हिंसाचाराचे प्रकार आहेत असे तुम्हाला वाटणे शक्य नाही. परंतु यातून तुमचा मित्र स्वत:चा पुरुषार्थ तुमच्या मनावर ठसवत असतो.
- थोडा मतभेद झाला की ढकलणे, अधिक राग आला तर फटकावणे, केस खेचणे, गदागदा हलवून आपले म्हणणे पटवणे, या कृतीतून तुम्हाला भले फारशी शरीरिक इजा होत नसेल. पण या सर्व कृती करण्यामागची जी वृत्ती असते ती वृत्ती लक्षात घेणे महत्वाचे आहे. शारीर बळ वापरून तुमच्यावर नियंत्रण ठेवण्याची त्याची वृत्ती यावर्तनावरुन दिसून येते. म्हणून अशा गोष्टींना तुम्ही वेळेवारी प्रतिबंध करायला हवा. तुम्ही असले प्रकार चालवून घेणार नाही हे त्याला स्पष्टपणे जाणवायलाच हवे. नाहीतर असले प्रकार व त्यांची तीव्रता वाढत जाईल.
याबद्दल त्याच्याकडे फकत निषेध नोंदवणे पुरेसे नाही. ही सवय चुकीची आहे व ही चूक, गंभीर प्रकारची व धोकादायक आहे हे त्याला पटले आहे की नाही याची खातरजमा करुन घ्या. तो पुन्हा तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न करेल.
‘मला तुझे पटते, पण मी स्वत:ला आवरु शकत नाही, मला तुझी पर्वा नाही असे म्हणू नकोस, पुन्हा असे घडणार नाही’ कधी तो असाही प्रतिवाद करेल की ‘या गोष्टी मी सहतुकपणे करत नाही, त्यावर माझा ताबा नाही म्हणून या सहजच घडतात.’ असे जर असेल तर जे थांबवणे त्याच्या हातात नाही ते थांबवण्याचे वचन त्याने दिले तरी त्याला काहीही अर्थ नाही; हे नीट लक्षात घ्या सावध व्हा !
संदर्भ : पुस्तक “मी माझीच” – मीना देवल
‘स्रोत – तथापि ट्रस्ट निर्मित Let’s Talk Sexuality – सेक्स